1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 मे 2023 (20:36 IST)

मान्सून कुठंवर आलाय, हवामान विभागाने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

monsoon
मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. मान्सूनने अंदमान आणि निकोबारची संपूर्ण बेटे व्यापली आहेत. केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास काही दिवस लागणार आहेत. दरवर्षी केरळमध्ये मान्सून एक जून रोजी दाखल होतो. यंदा मात्र केरळमध्ये मान्सून दाखल होण्यास 4 जून ते पाच जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग येत्या दोन-तीन दिवसात मान्सूनने व्यापणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. यावर्षी मान्सून हा सात ते आठ दिवस संथ गतीने सुरू आहे. सध्या मान्सून अंदमान निकोबार बेटे पार करुन बंगालच्या उपसागरात आहे. केरळच्या भूमीवर पोहचायला मान्सूनला चार किंवा पाच जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरवर्षीच मान्सून 1 जूनला केरळात पोहोचतो. आता, मात्र काही दिवस मान्सून लांबणीवर पडला आहे.
 
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार, याबाबत आताच अंदाज व्यक्त करता येणार नाही. केरळपासून मान्सूनची प्रगती कशी होते यावर, मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल, हे निश्चित होणार आहे. यावर्षी मान्सून उशीरा येत असला तरी तो सर्वसाधारण जेवढा पाऊस देतो तेवढ्याच प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे. यंदा 96 टक्के पावसाचा अंदाज आहे.
 
जूनमधे सरासरीच्या कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. जूनमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या मोचा चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती संथ गतीने सुरू असल्याची माहिती आहे. मान्सूनच्या दोन शाखा आहेत. एक बंगालच्या उपसागरातून येते आणि दुसरी अरबी समुद्रातून येते. बंगालच्या उपसागरातून येणारा मान्सून संथ गतीने पुढं सरकत आहे. तर, अरबी समुद्रातुन येणाऱ्या शाखेसाठी अजून पोषक वातावरण तयार झालेले नाही.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor