गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:16 IST)

पत्र लिहून पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्याची मागणी

maharashtra police
“मुख्यमंत्री तुम्हाला सगळे अनाथांचा नाथ एकनाथ म्हणतात. तुम्ही दयाळू आहात. त्यामुळे पोलिसांच्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या,” असे म्हणत धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्याची मागणी केली आहे. सध्या हे पत्र राज्यभर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.
 
पत्रातील मजकूर
महोदय,
 
सादर की मी आपणांस नम्रपणे विनंती करू इच्छितो की, शासनाच्या धोरणानुसार पोलीस दल वगळून इतर कर्मचान्यांसाठी फक्त ५ दिवसांचा आठवडा आहे याप्रमाणे वर्षात ५२ शनिवार येतात तसेच प्रत्येक इतर सर्वासाठी २४ शासकीय सुट्ट्या असतात. परंतु, पोलीस मात्र या ५२+२४७६ दिवस बारा-पंधरा तास दररोज कर्तव्यावर असतो, तस कायद्याने व माणुसकीने बघायला गेलं तर पोलिसांना ७६ दिवसांचा पगार दिला पाहिजे, परंतु आम्हा पोलिसांना व आमच्या कुटुंबीयांना संपूर्ण आयुष्य तडजोड करायची सवय असल्यामुळे तडजोड करून फक्त एक महिन्याचा पगार आम्हाला दिवाळी बोनस म्हणून मिळावा अशी विनंती शासनाला अनेक वर्षापासून करत आहे.! पण पोलिसांची संघटना नसल्याने व पोलिसांना कोणी वाली नसल्यामुळे शासनामार्फेत दखल घेतली जात नाही. पोलीस दलाची अवस्था अनाथा सारखी झाली आहे.
 
सध्या महाराष्ट्रातील सर्व जनता म्हणते आहे की महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे दयाळू “अनाथांचा नाथ एकनाथ” आहे ! तसेच माननीय गृहमंत्री देवेंद्र फडनवीस साहेब हे देखील पोलिसांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देतात! त्यामुळे आम्हा पोलिसांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व माननीय गृहमंत्री देवेंद्रजी साहेब यांच्याकडून ७६ दिवस बारा-पंधरा तास जास्तीचे कर्तव्य केल्यामुळे मोबदल्यात दया दाखवून देशातील इतर राज्यांप्रमाणे एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याची कृपा करावी अशी आपल्याकडून आम्हा पोलीसांची अपेक्षा आहे.
 
पोलीस निरीक्षकाने पत्रात मांडलेले गणित
 
*पोलीस वगळून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो. एका वर्षात 52 शनिवार येतात.
 
*त्याचबरोबर पोलीस वगळून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना 24 पगारी सुट्या जास्त मिळतात.
 
* असे वर्षातील 52+24 =76  असे 76 दिवस पोलिसांना 12 ते 15 तास जास्त काम करावे लागते. त्यामुळे तुम्ही दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार वाढवून द्यावा.