रविवार, 5 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By महेश जोशी|
Last Modified: औरंगाबाद , सोमवार, 21 एप्रिल 2008 (10:31 IST)

राजीनाम्यानंतर मुंडे काढणार 'संवादयात्रा'

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप व्हावा, असाच काहीसा प्रकार रविवारी घडला. भारतीय जनता पक्षात लोकशाहीचा अभाव असल्याचा खळबळजनक आरोप करत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. आगामी काळात राज्यव्यापी 'संवादयात्रा' काढून तळागाळातील कार्यकर्त्यांशी भेटणार असल्याचे मुंडे यांनी जाहीर केले असून, १५ दिवसांत ते आपली भूमिका मांडतील. मुंडेंच्या राजीनाम्याने राज्यातील भाजप कार्यकर्त्यांनीही आपले राजीनामे सादर करण्यास सुरुवात केली असून यामुळे भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
या सगळ्या घ़डामो़डींसाठी निमित्त ठऱली ती मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार मधू चव्हाण यांची केलेली नियुक्ती. चव्हाण यांची नियुक्ती जाहीर होताच मुंडे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस ते राज्य संघटक पदापर्यंतचे सर्व राजीनामे पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांना सादर केले. दुपारी ही बातमी बाहेर आली आणि राजकीय वर्तुळात धमाका झाला. राजीनामा सादर करून मुंडे थेट औरंगाबादला आले. येथे चिकलठाणा विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर आमदार श्रीकांत जोशी यांच्या घरी एक पत्रकार परिषद घेऊन मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. मुंडे म्हणाले, गेली ३० वर्षे पक्षासाठी कार्य करीत आहे. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपची स्थिती बिघडली आहे. पक्षात लोकाशाहीचा अभाव असून, दोन तीन लोक मिळून पक्षाचा कारभार चालवत आहेत. दिल्ली व मुंबईत सारखीच परिस्थिती आहे. हीच भावना पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांमध्ये असून, सर्वच फळीतील कार्यकर्ते नाराज आहेत. याबाबीलाच कंटाळून पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आ. चव्हाण यांच्या नियुक्तीला विरोध असल्यामुळे हे पाऊल उचलले आहे का? असा सवाल केला असता कोणाशीही मतभेद नाहीत. पक्षाच्या निवडप्रक्रियेवर नाराज होऊन राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात कोणताही निर्णय सल्लामसलत करून घेतला जात नाही, असे ते म्हणाले. आज घडीला महागाई, बेरोजगारी यासारख्या समस्या सतावत आहेत. मात्र पक्षाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ नेते स्वयंपाक घरात बसून वाट्टेल ते निर्णय घेतात. तब्बल दोन वर्षांपासून पक्षाची परिस्थिती ढेपाळली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
गेली ३० वर्षे भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. भविष्यातही कार्यकर्ता म्हणून काम करीत राहिन अशी ग्वाही त्यांनी दिली. गेल्या दोन वर्षांपासून मनात असंतोष धुमसत होता. आज त्याचा स्फोट झाला अशी जोडही त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला आ. श्रीकांत जोशी, भागवत कराड, संजय केनेकर, अतुल सावे, महापौर विजया रहाटकर आदींची उपस्थिती होती.
२५ पासून राज्यव्यापी संवादयात्रा
तीन दशकांच्या कालखंडात ज्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांची भेट घेण्याचा मनोदय मुंडे यांनी व्यक्त केला. त्यासाठी २५ एप्रिलपासून राज्याव्यापी संवाद यात्रा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. पुण्याशी काहीशी जवळीक आहे. त्यामुळे ही यात्रा पुण्यातूनच सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या यात्रेदरम्यान गाव, खेडे आणि जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे मुंडे म्हणाले.
कार्यकर्त्यांचे राजीनामे
महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे यांचे स्थान मोठे आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याचे वृत्त कळताच कार्यकर्त्यांना मोठा धक्का पोहचला. औरंगाबाद येथे मुंडे यांची पत्रकार परिषद होताच सर्व पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना पाठविण्याची तयारी केली. यात माजी महापौर भागवत कराड, अतुल सावे, महापौर विजयाताई रहाटकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष समीर राजूरकर आदींचा समावेश आहे. औरंगाबादसहित मराठवाडा आणि राज्यातील मुंडे समर्थक कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनीही भाजपला सोडचिट्ठी देण्याची तयारी केली आहे. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांनीही पक्षाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

जावडेकरांना झापल
औरंगाबाद येथे मुंडे यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच पक्षाचे प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीवरून फोन करून राजीनाम्याबद्दल चौकशी केली. यावर मुंडे जाम वैतागले. मुंबई भाजप अध्यक्ष कोण होणार याबद्दल तीन दिवसांपासून बोंबलत होतो. तेव्हा कोणी काहीच बोलले नाही. वृत्तपत्रांमध्ये बातम्यांद्वारे मधु चव्हाण यांचे नाव समोर असल्याचे माहित झाले आहे. महाराष्ट्राचा नेता असूनही निर्णय प्रक्रियेत सामावून घेत नाहीत त्यामुळे राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.