बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मागोवा-२००७
Written By वेबदुनिया|

आरएसएसचा कार्यकर्ता ते वादग्रस्त नेता

- अभिनय कुलकर्णी

NDND
नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर तिसऱ्यांदा आरूढ होणार हे निश्चित झाले आहे. कदाचित याचाच अंदाज असल्याने भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लालकृष्ण अडवानींनी गुजरातचे निकाल लागण्यापूर्वीच घोषित करण्यात आले. यात मोदींना रोखण्याचाच डाव असावा या म्हणण्यातही तथ्य असावे. कारण गुजरातमधील सत्ता खेचून आणण्यात, तीही एवढ्या मोठ्या मताधिक्याने हे केवळ मोदींमुळेच घडले, हे त्यांचे शत्रूही मान्य करतील. त्यामुळे या विजयात भाजपापेक्षा मोदींचाच विजय आहे, हे नक्की. भाजपच्याच माध्यमातून पुढे गेलेले मोदी पक्षापेक्षा मोठे कसे ठरले?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कडवा कार्यकर्ता
उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्हयातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेला नरेंद्र दामोदरदास मोदी नावाचा मुलगा पुढे जाऊन गुजरातचा मुख्यमंत्री आणि भारतातील सर्वांत वादग्रस्त नेता म्हणून ओळखला जाईल, असे कुणी त्या काळात म्हटले असते तर त्याला कुणीही वेड्यात काढले असते. इतकेच कशाला दहा वर्षापूर्वी असे कुणी म्हटले असते तरीही त्याची अवस्था हीच झाली असती, पण हे घडले खरे. कारण पटेलांच्या गुजरातेत मोदींसारखा ओबीसी नेता सगळ्यांना चीत करून येतो ही बाबच त्यांच्यात काही विशेष आहे, हे दर्शवणारी आहे.

मोदींच्या राजकीय प्रवासाची सुरवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील प्रवेशापासून झाली. तरूणपणातच संघात गेलेले मोदी नंतर संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक झाले आणि त्यानंतर अपरिहार्यपणे राजकारणाकडे वळले. ७४ मध्ये संघात गेलेले मोदी जयप्रकाश नारायणन यांच्या नवनिर्माण आंदोलनातही सहभागी झाले होते. त्यानंतर १९८० मध्ये भारतीय जनता पक्षातही त्यांनी प्रवेश केला. ८८ पर्यंत त्यांना कोणतेही पद मिळाले नव्हते. पण भाजप आणि संघ यांच्यात समन्वयाचे काम त्यांनी अतिशय चांगले सांभाळले. म्हणूनच लालकृष्ण अडवानींचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांच्यामुळेच मोदींना ८८ मध्ये गुजरातमध्ये पक्षाचे सरचिटणीसपद मिळाले. अडवानींचे शिष्यत्व मोदींनी तेव्हापासूनच स्वीकारले आणि अडवानींनीही या शिष्याला आपला मानला. पण त्यांना कदाचित माहितही नसेल, हा शिष्य गुरूपेक्षाही मोठा होईल.

पुढे मोदींना राष्ट्रीय पातळीवर प्रमोशन देण्यात आले. १९९५ मध्ये ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले. सरचिटणीसांच्या गर्दीत मोदी फारसे कुणाला माहित नव्हते. पण अचानक केशुभाईंना हटवून २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्रीपद त्यांना देण्यात आले. त्यावेळी कोण हे मोदी असाच प्रश्न लोकांच्या आणि पक्षातील इच्छुकांच्या चेहऱ्यावर उमटला होता. कारण मोदी तोपर्यंत फडात वावरणारे मोदी सर्वसामान्यांचे झाले नव्हते.

गुजरात दंग
  परिस्थिती हाताबाहेर जात असतनाही मोदींनी लष्कराला बोलवायला तीन दिवस घेतले. अगदी निवडून निवडून मुसलमानांना मारले. या घटनेचे जागतिक पातळीवर पडसाद उमटले.      
एकतर मोदी मुख्यमंत्री झाले ते केशुभाईंसारख्या बड्या नेत्याला हटवून. केशुभाईंना हटविण्याचे कारण एकच होते. २००१ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भूकंपाने मोठी हानी झाली होती. लोकांच्या पुनर्वसनाचे काम तितके चांगले होत नव्हते. त्याचीच नाराजी पोटनिवडणुकीत उमटली आणि भाजपला काही जागा गमवाव्या लागल्या. पक्षाने मग केशुभाईंना हटवून मोदींकडे राज्याची धुरा सोपवली.

मोदींनी पुनर्वसनाला वेग दिला आणि ते चांगले कसे होईल ते पाहिले. पुढे २००२ मध्ये गोधरा रेल्वे स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेस जाळण्याची घटना घडली. त्यात साठ हिंदूंची राखरांगोळी झाली. त्याची प्रतिक्रिया म्हणून गुजरातभर विशेषतः उत्तर गुजरातमध्ये दंगे पेटले आणि त्यात हजारभर मुसलमानांची कत्तल करण्यात आली. या संपूर्ण दंगलीत मोदींची भूमिका संशयास्पद राहिली. परिस्थिती हाताबाहेर जात असतनाही मोदींनी लष्कराला बोलवायला तीन दिवस घेतले. अगदी निवडून निवडून मुसलमानांना मारले. या घटनेचे जागतिक पातळीवर पडसाद उमटले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मोदींनी राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला. चौफेर मोदींविरोधात रान पेटले. प्रसार माध्यमांनीही मोदींना व्हीलन ठरविले. पण सामान्य गुजराती हिंदू माणसाच्या मनात मात्र मोदींची प्रतिमा एक नीडर नेता म्हणून प्रस्थापित झाली. रणछोडदासांचा गुजरात वीरांचा बनविण्यात मोदींची भूमिका मोठी असल्याचे बोलले जाते.

याच काळात गुजरात विधानसभेची मुदत संपायला आली होती, मोदींनी गोधरानंतर लगेचच विधानसभा विसर्जित करून निवडणूक जाहीर केली. दंगल संपल्यानंतर वातावरण मोदींच्याच बाजूने होते. ओम नमो नारायण ही घोषणा याच काळातील. नमो म्हणजे नरेंद्र मोदी. अखेर अपेक्षेप्रमाणेच झाले. दंगलीचा फायदा मिळून संपूर्ण हिंदू मतांचे धुव्रीकरण झाले आणि मोदी १२७ जागा मिळवून दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. वास्तविक त्या आधीच्या निवडणुकीतही भाजपला एवढे मोठे यश मिळाले नव्हते. मोदी पक्षापेक्षा मोठे होत असल्याचे दिसू लागले होते. पण पक्षालाही त्याशिवाय पर्याय नव्हता.

मोदींची विकासकामे
मुख्यमंत्रिपदाची दुसरी कारकिर्द मात्र मोदींच्या विकासकामांसाठी ओळखली जाते. या काळात मोदींना नेमके असे काय केले त्यामुळे त्यांची प्रतिमा एवढी मोठी झाली असावी? दंगलीच्या मुद्यावरून मोदींना वारंवार कोंडीत पकडले जाणार हे तर स्पष्ट होते. त्यामुळेच त्यांनी आपले संपूर्ण लक्ष गुजरातच्या विकासाकडे दिले. म्हणूनच मोदींनी सरकारच्या प्रशासकीय रचनेचीच पुनर्रचना केली. आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आधी पैसा वाचवला. त्यांच्या कारकिर्दीत राज्याचा विकासदर दहा टक्के होता, तो इतर राज्यांपेक्षा बराच जास्त होता. गेल्या वर्षी हा दर ११.२ टक्के होता. इतर राज्ये भारनियमनाने पोळत असताना गुजरातमध्ये मात्र २४ तास वीज असते. त्याने गुजरातच्या वीज मंडळाच्या तोट्यात घट आणून दाखवली.

त्यांच्या कारकिर्दीत झालेले महत्त्वाचे काम म्हणजे सरदार सरोवर प्रकल्पाची उंची ९५ फूटांवरून ११०.६४ फूटांपर्यंत वाढविण्याचे. त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढली आणि त्यातून विजेची निर्मिती झाली. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी गुजरातमध्ये ठिकठिकाणी कालवे काढून नर्मदेचे पाणी पाईप टाकून कच्छ या कायम तहानलेल्या भागापर्यंत पोहोचवले. कच्छमध्ये नर्मदेचे पाणी येण्याचे दिवास्वप्न गुजराती जनता कित्येक वर्षे पहात होती. मोदींनी हे स्वप्न सत्यात उतरवले. याशिवाय मुलींच्या शिक्षणासाठी विद्यादीप योजना यासारख्या अनेक योजना राबविल्या.

पुन्हा मुख्यमंत्री
गुजरात विधानसभा निवडणुकींचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्षातील वातावरण मात्र मोदींच्या विरोधात गेले होते. मोदींचा फटकळपणा, कुणालाही न जुमानणे, सर्व निर्णय स्वतः घेणे या सगळ्या बाबींनी पक्षातील लोकही नाराज होऊ लागले होते. म्हणूनच शेवटच्या काळात अनेक आमदार मोदींना सोडून गेले. केशुभाई पटेल, सुरेश मेहता या माजी मुख्यमंत्र्यांनी दंड थोपटले. गुजरात दंगलीवेळी गृहमंत्री असलेले गोवर्धन झडपिया हेसुद्धा मोदींच्या विरोधात गेले. केशुभाई विरोधात गेल्यानंतर पटेलांचे प्राबल्य असणाऱ्या सौराष्ट्रात भाजपला फटका बसणार असे संकेत दिले जात होते. पण मोदी शांत होते. भाजपची संपूर्ण उमेदवार यादी त्यांनी तयार केली. असंतुष्टांना उमेदवारी नाकारली. अनेक विद्यमान आमदारांनाही डच्चू दिला. असे सगळे वातावरण असताना मोदी पुन्हा येतील असे कुणालाच वाटत नव्हते.

आक्रमक प्रचार
त्यातच निवडणूकीचा प्रचार सुरू झाला आणि कॉंग्रेसतर्फे सोनिया गांधींनी प्रचाराचे बिगुल फुंकले. थेट मोदींवर आरोप करताना मौत का सौदागर अशीच उपमा दिली. (पुढे त्यांनी आपण त्यांच्यासंदर्भात बोललोच नाही, असे स्पष्टीकरण दिले.) कॉंग्रेसने इतरही अनेक नेते उतरवले. अगदी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगही या आखाड्यात उतरले. त्यांनीही मोदींवर खरपूस टीका केली. पण या आरोपानंतर मोदी सुसाट सुटले. त्यांनी कॉंग्रेस आणि सोनियांना खास आपल्या शैलीत फटकारत आक्रमक प्रचार सुरू केला. प्रचारात बोलता बोलता सोहराबुद्दीन या गुंडाच्या एनकाऊंटरचेही समर्थन केले. त्यामुळे ते अडचणीतही आले. पण तरीही त्यांनी दणकून प्रचार सुरू केला. नेमका निकाल काय लागेल हे सांगणे अवघड होते. माध्यमांनी मोदींना व्हीलन ठरवले होते. तरीही मोदींची प्रतिमा गुजराती समाजाच्या मनात कायम होती. म्हणूनच त्यांच्या सभांना मोठी गर्दी व्हायची.

श्रोत्यांनाच प्रश्न विचारून त्यांच्याकडून आपल्याला हवे ते काढून घेण्याची त्याची शैली त्यांच्यातील चतुर राजकीय नेता दाखविणारी होती. भाजपमधील बड्या नेत्यांच्या सभांना गर्दी होत नसताना मोदींच्या सभा मात्र गर्दीने भरून जायच्या. पण म्हणून गुजरात पुन्हा मोदींकडे जाईल, असे सांगता येत नव्हते. कारण गर्दी सोनियांच्याही सभेला होत होती. त्यात पोल पंडितांचे अंदाजही मोदींच्या विरोधात जाणारे होते. पण मोदींचा ऐरावत लक्ष्याच्या दिशेने निघालेला होता. आणि इतरांनी कधी अपेक्षिलेही नसेल असे यश पुन्हा एकदा मोदींना मिळाले. जवळपास मागच्या इतक्याच जागा मिळवून मोदींनी आपला करिश्मा दाखवून दिला. हिंदूत्वाचे दुसरे नाव मोदीत्व असा प्रचार झाला होता. हे मोदीत्व निवडणुकीत चालले. आणि मोदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झाले.