हर्षल आकुडे
2020 वर्षातला हा अखेरचा आठवडा. या टप्प्यावर मागे वळून पाहताना एरवी आपण वर्षभरात काय मिळवलं, काय गमावलं याची आकडेमोड करत असतो. तसंच पुढच्या वर्षात काय करणार याचे संकल्प बांधत असतो.
2020 मध्ये आलेला कोरोना व्हायरस आणि त्यानंतर घडलेल्या अनेक अनपेक्षित घटनांमुळे आपल्या आयुष्यात 2021 हे वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या वर्षात अपूर्ण राहिलेलं एखादं काम पूर्ण करण्यासाठी, विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी किंवा 2020 ने आयुष्यात निर्माण केलेली एखादी पोकळी भरून काढण्यासाठी 2021 या वर्षात आपल्याला कठोर मेहनत घ्यावी लागणार, हे निश्चित आहे.
काहीशी मंदावलेली वाटचाल पूर्ववत करण्यासाठी आता आपण सज्ज झालो आहोत. कोरोना संकटावर मात करून आपण पुन्हा भरारी घेऊ हे नक्की.
पण त्यासोबतच 2021 मध्ये इतर काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील. या सर्व घटनांकडे आपल्याला बारीक लक्ष ठेवावं लागेल. आगामी काळात या गोष्टीं आपल्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.
1. कोरोना व्हायरस आणि लसीकरण
2020 मध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. लाखो लोकांचा जीव गेला. लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक फटका बसला. वर्षाअखेर होईपर्यंत विविध कंपन्यांच्या लशी उपलब्ध झाल्या. अनेक देशांमध्ये त्याला मंजुरी मिळून पहिल्या फळीतले वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, वृद्ध यांचं लसीकरण सुरू होणार इतक्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने खळबळ माजवली आहे.
युकेमध्ये आढळलेल्या नवीन प्रकाराच्या विषाणूमध्ये एकूण 17 बदल दिसून आले आहेत. यापैकी N501Y या बदलामुळे विषाणूची मानवी पेशी संक्रमित करण्याची क्षमता वाढली आहे. नवीन विषाणूमुळे आजाराची तीव्रता वाढलेली नसली तरी विषाणू प्रसाराची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने विषाणूची लागण होऊ शकते आणि हीच चिंतेची बाब असल्याचं डॉ. पॉल यांचं म्हणणं आहे.
त्यामुळे ब्रिटनवरून येणाऱ्या विमानांवर बहुतांश देशांकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या स्ट्रेनवर कशा प्रकारे आळा मिळवला जातो, यावर पुढच्या वर्षातील आपली वाटचाल अवलंबून असेल. सध्यातरी आपण नव्या स्ट्रेनने घाबरण्याची गरज नाही, असंच तज्ज्ञांचं मत आहे.
दुसरीकडे, जानेवारी महिन्यात सर्वच देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहोत. भारतानेही लसीकरणासाठी नियमावली जाहीर केलेली आहे.
राज्यांना दिलेल्या या सूचनांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सांगण्यात आलं आहे.
लस घेणाऱ्या लोकांना तसंच कोरोना व्हायरस लशीला ट्रॅक करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल. कोव्हिड व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्क सिस्टीम (को-विन) असं या प्रणालीचं नाव आहे.
लसीकरण केंद्रांमध्ये फक्त नोंदणीकृत लोकांनाच लस दिली जाईल. त्यासाठीची प्राथमिकता ठरवण्यात येईल.
कोणत्या राज्यात कोणत्या कंपनीच्या लशी उपलब्ध होतील, त्यानुसार नियोजन करण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली आहे.
महाराष्ट्रात लसीकरण कशा पद्धतीने होईल, याची माहिती तुम्हाला या लिंकवर क्लिक केल्यास मिळू शकेल.
2. शेतकरी आंदोलन
केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यासाठीचं हे आंदोलन सुरू आहे.
या तीन कायद्यांची नावं आहेत -
1. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, 2020
2. शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक, 2020
3. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, 2020
खरं तर पंजाबमधील शेतकरी कायदे मंजूर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे सप्टेंबरपासून आंदोलन करत आहेत.
मात्र ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या आंदोलनानं आक्रमक रूप घेतलं आणि आता हे आंदोलन देशाच्या राजधानीच्या सीमेवर पोहोचलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घेत चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. पण आंदोलन सुरू होऊन एक महिना उलटूनसुद्धा याप्रकरणी तोडगा निघू शकलेला नाही.
सरकारने चर्चेची तयारी दर्शवली आहे, पण शेतकरी हे तिन्ही कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. ही मागणी फेटाळून लावत सरकारने हे कायदे मागे घेणार नाही, असं म्हटलं आहे.
त्यामुळे या प्रकरणात घडणाऱ्या घडामोडी शेतकरी, सर्वसामान्य आणि राजकीय नेत्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या असू शकतात.
3. मराठा आरक्षण प्रकरण
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्न बनला आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यामुळे 2020-21 वर्षात मराठा समाजाला मराठा आरक्षण कायद्यांतर्गत सरकारी नोकरी किंवा शैक्षणिक प्रवेश घेता आला नाही. मराठा आरक्षण आंदोलनाला हा मोठा धक्का असल्याचं मत आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्यांचं म्हणणं आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तूर्त EWS आरक्षण देण्यात आलं आहे. ते घ्यायचं की नाही, हे ऐच्छिक आहे. वकिलांचा सल्ला घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा सुप्रीम कोर्टातील खटल्यावर परिणाम होणार नाही," अशी माहिती ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
मराठा आरक्षण प्रकरणी पुढील सुनावणी 25 जानेवारीपासून सुरू होईल. या सुनावणीकडे सर्वांचं सर्वांचं लक्ष असेल. निकालावरच मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
4. पश्चिम बंगाल, तामिळनाडू निवडणुका
पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम, आणि पुदुच्चेरी या राज्यांच्या विधानसभेची मुदत 2021 च्या एप्रिल-मे महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या पाचही राज्यांमध्ये एप्रिल-मेमध्ये निवडणुका होऊ शकतात.
2020 ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान कोरोना साथीचा कहर सुरू असतानाही बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे वरील पाच राज्यांच्या निवडणुका कोरोनामुळे टळण्याची शक्यता नाही.
या पाचही राज्यांपैकी विशेषतः पश्चिम बंगालमधील निवडणुकांकडे सर्वांची नजर असेल. 2019च्या लोकसभा निवडणुकीपासूनच भारतीय जनता पक्षाने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाला मोठं खिंडार पाडण्यात भाजपने यश मिळवलं. तृणमूलचे अनेक मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजप विरुद्ध तृणमूल अशी रंजक लढाई पाहायला मिळू शकते.
5. मुंबई मेट्रो रुळावर येणार का?
कांजूरमार्गच्या जागेवर सुरू असलेलं मेट्रो-3 चं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आधीच रखडलेल्या मेट्रो-3 चं काम पूर्ण होण्यास आता आणखी विलंब होणार आहे.
आपला प्रवास सुखकर होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईकरांना मेट्रो-3 कधी सुरू होईल याची प्रतीक्षा आहे. पण सुरूवातीला आरेच्या जंगलात कारशेड उभी करण्यास विरोध असल्याने आणि आता कांजूरमार्गच्या कारशेडवरही प्रश्नचिन्ह उभं राहिल्यानं मेट्रो-3 मार्ग सुरू होण्यासाठी आणखी काही काळ थांबावं लागणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गची जागा मेट्रोसाठी हस्तांतरित केल्यानंतर महेश गरोडिया यांनी या जागेवर दावा सांगत याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य सरकारने कांजूरमार्गमध्ये कारशेड हलवल्याने 2021 पर्यंत सुरू होणारी मेट्रो-3 तब्बल पाच वर्षं पुढे ढकलली जाईल असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागून असेल.
6. वाहतूक क्षेत्रातील बदल
1 जानेवारी 2021 पासून सर्वच वाहनांना फास्टॅग अनिवार्य असेल, अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच केली होती.
त्यासोबतच पुढच्या दोन वर्षांत भारतातील रस्ते टोल नाकामुक्त होतील, असंही गडकरी म्हणाले होते. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमच्या (GPS) मदतीने टोल वसुली केली जाणार आहे. केंद्र सरकारने GPS आधारित टोल वसुली प्रक्रियेलाही अंतिम स्वरूप दिलं आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवासासाठी बाहेर पडताना तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. युकेमध्ये तर 2030 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या वाहनांवर बंदी असेल, अशी घोषणा सरकारने केली होती.
त्या अनुषंगाने नियोजन सुरू होऊ शकतं. त्यामुळे पुढील वर्षी इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्रात बऱ्याच घडामोडी दिसतील. याचे परिणाम भारतातही दिसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग पुढच्या वर्षी सुरू करण्यात येईल. नागपूर ते शिर्डी हा टप्पा 1 मे 2021पासून खुला करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली होती. हा महामार्ग सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील वाहतूक क्षेत्रात मोठा बदल दिसून येईल.
याशिवाय भारतातील रेल्वे वेगवान करण्याच्या दृष्टीनेही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. वंदे भारत एक्सप्रेस, टॅल्गो ट्रेन, मॅग्लेव्ह ट्रेन, हायपरलूप यांच्यासह बुलेट ट्रेन संदर्भात काही घडामोडी घडू शकतात.
7. जनगणना
2021 या वर्षात भारताची जनगणना होणार आहे. 2019 च्या डिसेंबर महिन्यात याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या जनगणना प्रक्रियेला 8 हजार 754 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
देशात 1872 पासून दर 10 वर्षांनी नियमित जनगणना केली जाते. 2021 ची जनगणना ही देशाची 16 वी तर स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे.
भारताची जनगणना ही जगातील सर्वात मोठी जनगणना प्रक्रिया मानली जाते. हे काम दोन टप्प्यात करण्याचं नियोजन केंद्र सरकारने केलं होतं.
एप्रिल 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा तर फेब्रुवारी 2021 मध्ये याचा दुसरा टप्पा पूर्ण केला जाणार होता. आसाम वगळता देशाचं NPR रजिस्टर अद्ययावत करण्याची प्रक्रियाही सोबतच केली जाणार होती. मात्र कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे जनगणना प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
आता ही जनगणना कधी व कशा पद्धतीने होईल, जातीनिहाय जनगणनेची मागणी अनेकवेळा केली जाते त्याबाबत काय निर्णय घेतला जाईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
डिसेंबर 2019 आणि जानेवारी 2020 दरम्यान भारतात नागरिकत्वाशी संबंधित CAA कायदा आणि NRC विधेयक यांच्यावरून घमासान झालं होतं. दिल्लीच्या जामिया मिलिया विद्यापीठात यावरून गोंधळ झाला. तसंच शाहीन बाग परिसरात शेकडो महिला आंदोलनास बसल्या होत्या. 'कागज नहीं दिखाएंगे' अशी घोषणाबाजी त्यावेळी पाहायला मिळाली होती. त्यामुळे आगामी काळात जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या असतील.
8 . चित्रपट विश्व
यावर्षी कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका चित्रपट क्षेत्राला बसला. सिनेमागृह बंद करण्यात आल्याने अनेक मोठ्या चित्रपटांचं प्रदर्शन स्थगित करण्यात आलं. इतर काही चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झाले.
ऑक्टोबर महिन्यात सरकारने नियमांचं पालन करून चित्रपटगृह उघडण्यास परवानगी दिली असली तरी चित्रपट निर्मात्यांनी सध्यातरी सावध भूमिका घेतली आहे. डिसेंबरपर्यंत कोणताच मोठा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला नाही.
त्यामुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास आगामी वर्षात या बिग बजेट चित्रपटांची रांग सिनेमागृहांमध्ये लागलेली पाहायला मिळेल. पण त्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, तेसुद्धा महत्त्वाचं आहे.
9. क्रिकेट
भारतीय संघ नव्या वर्षात ऑस्ट्रेलियाचा खंडप्राय कालावधीचा दौरा पूर्ण करेल. मायदेशी परतल्यानंतर टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. इंग्लंड संघ भारत दौऱ्यात 4 कसोटी, 5 ट्वेन्टी-20 आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. कोरोना नियमावलीमुळे चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे अशा तीन ठिकाणीच मालिकेतील सामने रंगणार आहेत.
या मालिकेच्या निमित्ताने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या भव्य स्टेडियमवर सामने होतील. ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला जाणार आहे. नव्या वर्षात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता कोण हे यंदा स्पष्ट होईल.
अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय महिला संघ वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेला ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप यंदा भारतात होणार आहे. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिलावहिला ट्वेन्टी-20 वर्ल्डकप जिंकला होता.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात देशभरात विविध ठिकाणी सामन्यांचं आयोजन केलं जाईल. घरच्या मैदानावर जेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया आतूर असेल. इंडियन प्रीमिअर लीगचा हंगाम यंदा भारतात आयोजित केला जातो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
10. ऑलिंपिक
2020 या वर्षी जपानमध्ये ऑलंपिक स्पर्धेचं आयोजन होणार होतं. कोरोना संकटामुळे या स्पर्धेला स्थगिती देण्यात आली. नंतर ही स्पर्धा 2021 च्या जुलै महिन्यात घेण्याचं नियोजन आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीने घेतला आहे.
2021 मध्ये कोरोना साथ असो वा नसो ऑलंपिक स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत आयोजित केली जाईल, 23 जुलै 2021 पासून ही स्पर्धा सुरू होईल, असं आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीचे उपाध्यक्ष जॉन कोट्स यांनी सांगितलं.
अशा स्थितीत ओलंपिक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी 2021 हे वर्ष महत्त्वाचं असू शकतं. 2020 वर्षातला बराच काळ खेळाडूंना घरात घालवावा लागला. कोव्हिड साथीचा खेळाडूंच्या सराव होऊ शकला नाही. अनेक महिने खेळाडू मैदानापासून दूर होते. याचा परिणाम त्यांच्या फिटनेसवर कसा होतो, हे पाहावं लागेल.
तसंच कोरोना होऊन बरे झालेल्या व्यक्तींना फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, असं सांगितलं जातं. अशा स्थितीत कोरोनातून बरे झालेल्या खेळाडूंसमोर येत्या काळात काय वाढून ठेवलं आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
या सगळ्याचा परिणाम टाळत खेळामध्ये आपला परफॉर्मन्स वाढवण्याकडे खेळाडूंना लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी तर 2021 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आणि आव्हानात्मक ठरणार आहे.