1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (08:55 IST)

रशिया-युक्रेन वाद : युक्रेनमधील रशियन लष्कराचा वेग मंदावला

आतापर्यंत रशियन लष्करानं युक्रेनमधील आपल्या कारवाईचा वेग संथच ठेवला आहे.
 
युक्रेनवरील हल्ल्यापूर्वी रशियन लष्करात मोठे बदल करण्यात आले आणि त्याला बटालियन टॅक्टिकल ग्रूप्समध्ये विभागण्यात आलं, असं समजलं जात होतं.
 
ही आठशे ते हजार जवानांची टीम आहे जी रणगाडे, ड्रोन्स आणि मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टिमसहित काम करत आहे. पण, सगळं काही योजनेप्रमाणे होत आहे, असं दिसत नाहीये.
 
युक्रेनच्या उत्तरेकडील भागात याप्रकारच्या आधुनिक पद्धतीच्या युद्धतंत्राचा लाभ घेण्यास रशियन कमांडर अयशस्वी ठरले आहेत.
 
त्यांच्या गाड्या मध्येच बिघडत आहेत आणि युक्रेनमध्ये अशाप्रकारे विरोधाचा सामना करावा लागेल, अशी त्यांनी कदाचित कल्पनाही केली नसेल. या युद्धात रशियाचे जवान मोठ्या प्रमाणावर मारले गेले आहेत. तसंच युद्धात वापरण्यात येणाऱ्या त्यांच्या साधनांचंही मोठं नुकसान झालं आहे.
 
रशियन लष्कर त्यांच्या क्रूर पद्धतींचा अवलंब करत आहे. ते शहरांना घेराव घालत आहेत, त्यांच्यावर हवाई हल्ले करत आहे, यासोबतच टँक आणि दुसऱ्या शस्त्रात्रांचा वापर करून फायरिंग करत आहेत. युक्रेनचा बचाव करणाऱ्या लोकांचं मनोबल तोडावं आणि त्यांनी शस्त्रं खाली टाकावेत, असा त्यांचा हेतू आहे.
 
युक्रेनवरील हल्ल्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवर रशियावर कठोर टीका केली जात आहे. असं असलं तरी याचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर कोणताही परिणाम होताना दिसत नाहीये. युद्ध थांबवण्याची त्यांची कोणतीही इच्छा नाही, असं त्यांनी याआधीच स्पष्ट केलंय.
 
रशियाविरुद्धची लढाई सुरूच ठेवा - व्होल्दोमीर झेलेन्स्की
रशियाविरुद्धची लढाई सुरूच ठेवा असं आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी नागरिकांना केलं आहे.
 
"रशियाला उत्तर देण्याची वेळ आली आहे. वाईटाला बाहेर फेकून देण्याची हीच वेळ आहे", असं झेलेन्स्की म्हणाले. अमेरिकेने आम्हाला आणखी लढाऊ विमानं द्यावीत असं अपील केलं.
 
रशियाने तयार केलेली ही विमानं कशी चालवायची हे आमचे पायलट जाणतात असंही त्यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात अमेरिका आणि पोलंड यांच्यात चर्चा सुरू आहे. सोव्हियत काळातील विमानांचा वापर पोलंड हळूहळू बंद करत आहे. अशा परिस्थितीत ही विमानं युक्रेनला देता येऊ शकतात. युक्रेनच्या पायलटांना पाश्चिमात्य देशांमध्ये तयार झालेली विमानं उडवण्याचं प्रशिक्षण मिळालेलं नाही.
 
युक्रेनमध्ये अडकलेल्या स्थानिकांना तसंच विदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी उपाय करत आहोत मात्र युक्रेनच खोडा घालत आहे असा आरोप रशियाने केला आहे.
 
वोल्खोवाखा आणि मारियुपोल या शहरांमध्ये रोज ह्यूमन कॉरिडॉर तयार केले जात आहेत. पण युक्रेनचं लष्कर या माणसांना बाहेर जाण्यापासून रोखत आहे असं रशियाच्या नॅशनल सेंटर फॉर स्टेट डिफेन्स कंट्रोलचे प्रमुख कर्नल जनरल मिखाइल मिजित्सेव यांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, युक्रेनमधली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. तिथली स्थिती भीषण होत आहे. युक्रेनमधील परिस्थिती स्थिर करण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरू आहेत. माणुसकीची जबाबदारी आम्ही निभावू.
 
याआधी रशिया शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचा आरोप युक्रेनने केला होता.
 
युद्धाच्या दहाव्या दिवशी म्हणजे शनिवारी रशियाने युद्धविराम लागू केला पण तो फक्त अर्धा तासासाठीच असं युक्रेनने म्हटलं आहे. एवढ्या कमी कालावधीत हजारो लोकांना बाहेर कसं काढणार ? असा सवाल युक्रेनने केला.
 
लोकांना बाहेर काढण्यासाठी तयार बसेसवर हल्ला करण्यात आला असं युक्रेनने सांगितलं तर रशियाने याचा इन्कार केला आहे. अडकलेल्या लोकांना युक्रेनच बाहेर पडू देत नसल्याचा आरोप रशियाने केला.
 
युक्रेनमधल्या मारियुपोल शहरातून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची प्रक्रिया थांबली आहे. बाहेर जाण्याच्या प्रक्रियेत असलेले नागरिक पुन्हा आपापाल्या घरी आले आहेत.
 
वोल्नोवांखा शहरातही अशीच परिस्थिती आहे. रशियाने केवळ अर्ध्या तासापुरते हल्ले थांबवल्याने या दोन शहरातून नागरिकांना सुरक्षितपणे अन्यत्र स्थलांतरित करता आला नसल्याचं युक्रेनने म्हटलं आहे.
 
डोनबासच्या दिशेने 7 किलोमीटर आगेकूच केल्याचं रशियाने म्हटलं आहे. युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्हजवळच्या इरपिन शहरातही मोठ्या प्रमाणावर हल्ल्यांचे आवाज ऐकू येत आहेत.
 
कोणताही देश युक्रेनमध्ये नो-फ्लाय झोन लागू करत असेल त्या देशाला युक्रेन युद्धात सामील असल्याचं मानलं जाईल असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.
 
युद्धामुळे सुरक्षिततेसाठी युक्रेनमधून अन्य देशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या 15 लाख असू शकते असं संयुक्त राष्ट्र संघाने म्हटलं आहे. निर्वासितांच्या मुद्यावर दुसऱ्या महायुद्धानंतरचं हे सगळ्यात मोठं संकट असू शकतं.
 
आतापर्यंत काय काय घडलं?
रशियानं युक्रेनवर आक्रमण करण्यास सुरुवात केली, त्याला आज 11 दिवस पूर्ण होत आहेत. रशिया-युक्रेनमधील हा संघर्ष दिवसागणिक अधिक गंभीर रूप घेताना दिसत आहे.
 
आधी केवळ प्रशासकीय आणि लष्करी तळांवर हल्ले करत आलेल्या रशियानं आता रहिवासी भागात हल्ले केल्याचा आरोप होत आहे.
 
तसंच, युरोपातील सर्वात मोठ्या झपोरिझझिया अणूऊर्जा प्रकल्पावरही हल्ला केल्यानं संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र, या हल्ल्यामुळे प्रकल्पातील काही रिअॅक्टर्सनं लागलेली आग आटोक्यात आल्यानं अनेकांचा जीव भांड्यात पडला.
 
सशस्त्र सैन्याबद्दल 'खोटी' माहिती पसरवल्यास तुरुंगवासाची तरतूद असणारा नवा कायदा रशियाच्या संसदेत - डूमामध्ये मंजूर करण्यात आला.
 
रशिया क्लस्टर बॉम्बचा वापर करत असल्याचे पुरावे असल्याचं नाटोचे जनरल सेक्रेटरी जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्हटलंय.
 
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत मोठं समर्थन मिळालं. कथित युद्ध अपराध आणि मानवतेच्या विरोधातल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.
 
दरम्यान, 24 फेब्रुवारीच्या सकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या दॉनबस भागामध्ये लष्करी कारवाई सुरू करत असल्याची घोषणा केली. त्यांनी टीव्हीवर एका भाषणात ही घोषणा केली.
 
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पुतीन यांना रोखण्यासाठी विनंती केली जात असतानाच, त्यांनी मात्र अशा प्रकारे लष्करी कारवाई सुरू करत असल्याचं जाहीर केलं.
 
सत्य आणि न्याय हे रशियाच्या बाजूनं आहे. रशियाला घेरण्याचा प्रयत्न कोणीही करत असेल, तर रशिया तत्काळ प्रतिक्रिया देईल, असंही पुतीन म्हणाले होते. ही कारवाई स्वसंरक्षणासाठी असल्याचंही पुतीनं म्हणाले होते.
 
युक्रेन आणि रशियाच्या सैन्यामधील हा संघर्ष अपरिहार्य असून हा केवळ वेळेचा मुद्दा आहे, असंही पुतीन म्हणाले.
 
पुतिन यांच्या घोषणेच्या काही मिनिटांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला होता की, कोणत्याही प्रकारची कारवाई ही मोठ्या प्रमाणावर मानवी विनाशाला कारणीभूत ठरू शकते.