मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2022 (18:28 IST)

रशिया युक्रेन युद्ध : कीव्हपासून 15 मैलांवर रशियन सैन्य - ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती

रशियन सैन्याची एक तुकडी युक्रेनची राजधानी कीव्ह शहराच्या मध्यवर्ती भागापासून 15 मैलांवर (25 किलोमीटर) पोहचल्याचं ब्रिटीश संरक्षण मंत्रालयाने गुप्त माहितीच्या आधारे म्हटलंय.
 
राजधानीच्या उत्तरेला असलेली रशियन सैन्याची मोठी तुकडी आता विभागली गेली असून 'हे कदाचित शहराला वेढा घालण्याच्या हेतूने करण्यात आलं असावं' असं मंत्रालयाने म्हटलंय.
 
"प्रत्युत्तरादाखल युक्रेन करत असलेल्या हल्ल्यांमध्ये आपलं कमी नुकसान व्हावं म्हणूनही हे करण्यात आलं असावं. कारण युक्रेनच्या हल्ल्यांमध्ये त्यांचं आधीच खूप नुकसान झालेलं आहे."
 
यासोबतच युक्रेनमधल्या चर्नीहीव्ह, खारकीव्ह, मारिओपोल आणि सुमी शहरांनाही रशियन सैन्याने घेरलंय आणि या शहरांवरही सतत हल्ले करण्यात येतायत.
 
शनिवारी (12 मार्च) युक्रेनची राजधानी कीव्ह शहरासोबतच इतर अनेक शहरांमध्येही हल्ल्याची सूचना देणारे सायरन ऐकू आले.
 
तर रशिया मारिओपोल शहरामधून लोकांना सुरक्षित बाहेर पडू देत नसल्याचा आरोप युक्रेनने पुन्हा एकदा केलाय.
मारिओपोल शहरातली परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याचं युक्रेन सरकारचं म्हणणं आहे. इथे आतापर्यंत 1500 लोकांचा मृत्यू झाला असून बचावलेल्या लोकांकडे अन्नपाणी नाही. युक्रेनमध्ये सध्या थंडी आहे पण मारिओपोलमधल्या लोकांना सध्या वीज पुरवठा होत नसल्याने त्यांच्याकडे हीटिंग उपलब्ध नाही.
 
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. रशियातल्या मातांनी आपल्या मुलांना युद्धावर पाठवू नये असं आवाहन त्यांनी केलंय. तर रशियाच्या विरोधात लढण्यासाठी आपण युक्रेनमध्ये आपले सैनिक पाठवणार नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. पण रशियावरचे निर्बंध वाढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.