शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

पहिल्या भेटीत सचिनबद्दल माहिती नव्हती- अंजली

सचिन आणि माझी पहिली भेट 1990 साली मुंबई विमानतळावर झाली. यावेळी मला सचिनबद्दल काहीच माहिती नव्हती, असा खुलासा सचिनची जीवनसाथी डॉ. अंजलीने करुन चाहत्यांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीस रविवारी 20 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अंजलीने जुन्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, ' सचिनबरोबर माझी पहिली भेट 1990 साली मुंबई विमानतळावर झाली. तेव्हा तो इंग्लंड दौर्‍याहून परत येत होता आणि मी माझ्या आईला आणण्यासाठी विमानतळावर गेली होती. सचिनने त्या इंग्लंड दौर्‍यात पहिले कसोटी शतक झळकाविले होते. परंतु त्यावेळी सचिनबद्दल मला काहीच माहिती नव्हती. आमची भेट ही अपघाताने झाली होती.'

पहिल्या भेटीनंतर सचिन आणि अंजली यांच्यातील भावनिक बंध जुळत गेले. त्यांचा 1994 साली साखरपुडा झाला आणि 1995 मध्ये ते विवाहबद्ध झाले. साखरपुडा आणि विवाहादरम्यान सचिनचे क्रिकेटप्रेम पाहून मी क्रिकेटबद्दल मोठ्या प्रमाणात वाचन करुन माहिती घेतली, असे अंजलीने सांगितले. घरात असताना क्रिकेटविषयी चर्चा करण्यास आवडत नसल्याचे तिने सांगितले.

अंजलीने सांगितले की, सचिन फलंदाजी करीत असताना मी खूप तणावात असते. त्यावेळी मी कोणताही फोन घेत नाही. एका जागेवर बसून टीव्ही पाहत राहते. त्यादरम्यान काही खानही नाही किंवा पाणीही पित नाही. तो बाद होत नाही तोपर्यंत एमएमएसचे उत्तरही देत नाही.

सचिनबरोबर चित्रपट पाहण्यासंदर्भात ती म्हणाली की, लग्नापूर्वी माझ्या काही ‍मैत्रीणींनी सचिनबरोबर चित्रपट पाहण्याची योजना तयार केली. परंतु सचिनने हे अशक्य असल्याचे सांगितले. तरीही मी खूप आग्रह धरल्यानंतर तो तयार झाला. रोजा हा चित्रपट पाहण्याचे आम्ही निश्चित केले. चित्रपट पाहण्यास जातांना त्याने दाडी लावली आणि चष्मा घातला. तसेच चित्रपटास थोड्या उशीराने आम्ही पोहचलो. परंतु मध्यांतरात त्याचा चश्मा पडून गेला. यामुळे तो ओळखला गेला. शेवट अर्धवट चित्रपट सोडून आम्हाला परत यावे लागले.