सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. श्रीदेवी
Written By
Last Modified: गुरूवार, 1 मार्च 2018 (16:38 IST)

बोनी कपूर यांचे श्रीदेवी यांच्या ट्विटर हँडलवरून केले पत्र पोस्ट

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर  पहिल्यांदाच श्रीदेवी यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्याच ट्विटर हँडलवर एक पत्र पोस्ट केलं आहे. श्रीदेवी यांच्या जाण्याने अतीव दुःख झालेल्या बोनी कपूर यांनी हे पत्र ट्विट करून माझे खूप मोठे नुकसान झाले. आम्हा सगळ्यांचेच आयुष्य पूर्वीसारखे राहिले नाही असे म्हटले आहे.

श्रीदेवी यांच्या जाण्याने मी माझी अत्यंत जवळची मैत्रीण, माझी पत्नी, माझ्या दोन मुलींची आई गमावली आहे. माझ्यासाठी हे नुकसान किती आहे ते मी शब्दांत मांडू शकत नाही तसेच हे नुकसान कधीही भरून येणार नाही याचीही मला कल्पना आहे. मी आमचे कुटुंब, मित्र, सहकारी, कलाकार आणि श्रीदेवी यांचे हजारो चाहते या सगळ्यांचे आभार मानतो. आमच्या अतीव दुःखात त्यांनी आम्हाला धीर दिला. मी अर्जुन आणि अंशुला यांच्या प्रेमामुळे तसेच जान्हवी आणि खुशी यांच्या सोबत असल्यामुळे या कठीण प्रसंगात उभा राहू शकलो.कपूर कुटुंबावर आभाळ कोसळले होते मात्र आम्ही त्यांचा धीराने सामना केला.

जगासाठी, श्रीदेवी यांच्या चाहत्यांसाठी त्या चांदनी होत्या. मात्र ती माझी पत्नी होती. माझे तिच्यावर खूप प्रेम होते. माझ्या मुलींची ती आई होती. मला तिने कायमच साथ दिली. माझ्या मुलींवर त्यांचे प्रेम होते. एक आई म्हणून आपल्या मुली आणि आपले कुटुंब हेच श्रीदेवी यांचे जग होते.

माझी पत्नी आणि माझ्या मुलींची आई हे जग सोडून निघून गेली. आमच्या कुटुंबावर दुःखाचा प्रसंग कोसळला आहे. त्यांच्यासारखी दुसरी कोणीही अभिनेत्री होऊच शकत नाही. मला आता माझ्या मुली जान्हवी आणि खुशी यांची चिंता वाटते आहे. श्रीदेवी हे आमचे जग होती. ती आमची शक्ती होती.. आमच्या आनंदाचे कारण होती. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तिच्या आत्म्याला शांती मिळो. आमचे आयुष्य आता पूर्वीसारखे राहिले नाही.