पराग फाटक
मराठी क्रीडा पत्रकारितेचे अध्वर्यू विष्णू विश्वनाथ करमरकर अर्थात विविके यांचं सोमवारी मुंबईत निधन झालं. क्रीडा पत्रकारांसाठी आधारवड अशा या व्यक्तिमत्वाच्या आठवणी.
काही वर्षांपूर्वी मी मराठी वर्तमानपत्रात काम करत होतो. कामाचा भाग असलेल्या एका खेळाशी निगडित पत्रकार परिषदेला गेलो. फार मोठी बातमी होणारच नव्हती.
पण निघता निघता एक गोष्ट जाणवली. संयोजकांनी राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांना मामुली बक्षीस रक्कम देऊ केली होती.
त्याच वेळी त्या परिषदेला आलेल्या पत्रकारांना मात्र किमती घड्याळं सदिच्छा भेट म्हणून देण्यात आली. हा विरोधाभास होता. सदिच्छाभेटी वाटायला पैसे आहेत पण मेहनत करुन यश मिळवणाऱ्या मुलामुलींना द्यायला पैसे नाहीत. एरव्ही स्पर्धा अमुक ठिकाणी आहे अशी संक्षिप्त बातमी झाली असती पण त्या विरोधाभासाची बातमी दिली.
बातमी प्रसिद्ध झाली. भल्या सकाळी फोन आला. पत्रकारांचा दिवस उशिराच संपतो. त्यामुळे प्रातकाळी कंप पावणारा फोन शोधून डोळे चोळत कोणाचा फोन आहे ते पाहिलं. नाव झळकत होतं- करमरकर सर कॉलिंग.
झटकन उठून कॉल घेतला. हॅलो सर म्हणताच, पलीकडून आवाज आला. झोपमोड केली का रे? तू नाही म्हणशील पण झोपमोड झालेय असं म्हणत हसले. चांगली बातमी केलीस असं ते म्हणाले. कानांवर विश्वासच बसेना.
ज्या माणसाने खेळांसाठी आयुष्य वाहून घेतलं, खेळ प्रशासनातले अनेक घोटाळे बाहेर काढले, हल्ल्यांना पुरुन उरले, कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीकडून चूक झाली असेल तर त्यांनी झोडपून काढलंय असा माणूस आपल्या बातमीचं कौतुक करतोय यावर विश्वास बसेना.
मुलांना अशी तुटपुंजी बक्षीसरक्कम देऊन दुसरीकडे अय्याशी करण्याचा नाठाळपणावर लिहिलंस ते बरं केलंस म्हणाले. सकाळ एकदमच प्रसन्न वाटू लागली. मूठभर मांस चढलं.
त्या स्टोरीत अजून काय काय लिहिता आलं असतं हे ते सांगू लागले. त्या स्पर्धेचं अख्खं अर्थकारण त्यांनी उलगडून सांगितलं. स्पर्धेशी निगडीत संघटकांची कुंडलीच मांडली.
अशा स्पर्धा मुलांसाठी किती महत्त्वाच्या असतात ते समजावून सांगितलं. मुलं-पालक यांची मुंबईत राहायची व्यवस्था नसल्याने कसे हाल होतात.
कुठून कुठून प्रवास करुन ही मंडळी येतात ते सांगितलं. मी फक्त एक बातमी केली होती. त्यांनी त्या बातमी संदर्भातले सगळे कोन समोर ठेवले. हे सांगताना कोणताही अहंभाव नव्हता. मला कसं सगळं माहितेय असा दावा नव्हता. क्रीडा पत्रकारितेत नवख्या मुलाच्या बातमीसाठी त्यांनी कॉल केला.
करमरकर सर आधारवड होते. ते खेळांचा चालताबोलता कोश होते. खेळ कसा खेळला जातो इथपासून खेळांच्या प्रशासनापर्यंत सगळ्या बाजूंचा त्यांचा सखोल अभ्यास असे. हे सगळं एसी खोलीत बसून नाही.
उन्हातान्हात, प्रवास करुन स्पर्धांना जाऊन खेळाडू-प्रशिक्षक-संघटक-आयोजक यांच्याशी बोलून कमावलेली अधिकारवाणी होती. निवृत्तीनंतरही सर अनेकदा पत्रकार परिषदांना येत. नव्या पत्रकारांची नेहमी विचारपूस करत.
कोरडी औपचारिकता नसे. गाव कुठलं, आईबाबा काय करतात, रोज किती वेळ प्रवास करावा लागतो, काय वाचतोस-काय पाहतोस, स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय करतोस असं सगळं विचारत.
एखादी बातमी करताना पुरेशी माहिती न घेता लिहिलं किंवा बातमीशी संबंधित पुरेशा लोकांना बोलतं केलं नाही तर हक्काने कान पकडत. फोन करुन पार शाळाच घेत. पण त्यांनी असा समाचार घेणं चांगलं वाटत असे.
पत्रकारितेत नवीन असताना मोठ्या पदावरच्या व्यक्तींना कसं विचारायचं, त्यांच्याविरोधात कसं लिहायचं याचं दडपण असतं. सर सांगायचे, प्रश्न विचारायला घाबरू नकोस.
तुझ्या अभ्यास चोख असेल, कागदपत्रं नीट असतील तर मागे हटायचं नाही. विरोध होईल, दडपून टाकण्यासाठी प्रयत्न होईल पण बातमी द्यायची.
2005मध्ये माहितीचा अधिकार संमत झाला आणि पत्रकारांना अत्यावश्यक असणारी बरीच माहिती सहज मिळू लागली. पण करमरकर सर त्याआधी अनेक वर्ष कागदपत्रं खणून काढत. त्यांच्या लेखात खणखणीत डेटा असे. त्यांना कधी खुलासा द्यावा लागत नसे किंवा माघार घ्यावी लागत असे.
करमरकर सरांनी हातांनी लिहिलेला लेख आमच्याकडे येत असे. तो लेख वाचल्यावर उद्या कोणाची नोकरी जाईल किंवा दणकून कारवाई होईल असा जहाल मजकूर असे. पण सर नेहमी ठाम असत. लेख छापून आला की अक्षरक्ष: फटाके वाजू लागत. सरांचा लेख क्षेपणास्त्रासारखा विषयाचा वेध घेत असे.
करमरकर सर आपल्या प्रत्येक शब्दासाठी अतिशय जागरुक असत. जागा नसल्यामुळे त्यांचा लेख छोटा करावा लागला तर दुसऱ्या दिवशी त्यांचा ओरडा खावा लागत असे.
जुन्या वळणाचं मराठी, छोटं फरांटेदार अक्षरातला त्यांचा लेख वाचताना आपण असं काम कधी करणार असं वाटायचं. इंटरनेट नसताच्या काळात ते इतकी माहिती कुठून काढत असतील याचं कुतुहूल वाटायचं.
संघटनेतल्या लोकांनाही अचंबा वाटेल असे तपशील त्यांच्याकडे असायचे. संघटनेच्या अध्यक्षापासून हाऊसकीपिंगच्या माणसापर्यंत प्रत्येकाशी त्यांचे ऋणानुबंध असायचे. एखाद्या स्पर्धेला करमरकर सर येणार म्हटल्यावर आयोजकांची पळापळ उडत असे. काय नेमका प्रश्न विचारतील आणि पितळ उघडं पाडतील याची आयोजकांना धास्ती असे.
आमच्या वेळी असं होतं, नवीन पिढीचं काही खरं नाही असं ते कधीच बोलत नसत. उलट नवीन मुलांबद्दल त्यांना विशेष आत्मीयता होती. नवीन मुलांना अधिकाअधिक ठिकाणी जाता यावं यासाठी ते प्रयत्नशील असत. संघटकांशी बोलून एखाद्या स्पर्धेला चार-पाच पत्रकारांना वृत्तांकनासाठी नेता येऊ शकेल का यासाठी ते पुढाकार घेत.
फिल्डवर दिसत नाही यासाठी अनेकदा नवीन मुलांना झापत असत. तुम्ही मैदानावर गेलात नाहीत, खेळाडू कसा घडतोय ते पाहिलं नाहीत तर तुम्ही काय लिहिणार असं सवाल करत.
खेळाचे नियम त्यांना तोंडपाठ असत. त्या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चाललंय याचीही चोख माहिती त्यांच्याकडे असे. सरांचं घर म्हणजे वर्तमानपत्रं, मासिकं, पाक्षिकं यांची अजस्र गुहाच होती.
क्रीडा पत्रकारिता म्हणजे केवळ हारजीतचं वर्णन याला त्यांनी छेद दिला. स्पोर्ट्स बिटवरही शोधपत्रकारिता करता येतं याचा वस्तुपाठ करमरकर सरांनी घालून दिला.
क्रीडा पत्रकारिता म्हणजे टाईमपास बिट ही संकल्पना त्यांनी मोडून काढलं. खेळाडू कसा घडतो, त्याचा-पालकांचा संघर्ष काय आहे हे त्यांनी समोर आणलं. बोगस खेळ संघटनांचा बुरखा त्यांनी फाडला.
एकाच खेळाच्या 9 संघटना कशा असा थेट सवाल ते करत. नियमांच्या अधीन नसलेल्या काही खेळांना खेळ का म्हणावं हेही त्यांना मान्य नसे. 2010 कॉमनवेल्थ आयोजनात भ्रष्टाचारावर त्यांनी झोड उठवली, प्रसंगी हल्लेही पचवले पण ते मागे हटले नाहीत.
मराठी क्रीडा पत्रकारांची संघटना असावी असं त्यांना वाटे. क्रीडा अकादम्या, एखाद्या विशिष्ट खेळासाठी प्रसिद्ध गावाचा अभ्यासदौरा करण्यासाठी काही पैसे बाजूला काढतो असं ते म्हणाले होते.
दिल्लीत आहेस तर हरियाणा आसपासच्या पट्ट्यात जाऊन कशावर लिहिता येईल ते सांग असं म्हणाले होते. पुस्तकासाठी विषय तयार कर असं सांगायचे. थोडे अधिक पैसे जमवून एखाद्या मोठ्या स्पर्धेला मराठी पत्रकाराला स्वतंत्रपणे पाठवता येईल का असाही विचार त्यांच्या डोक्यात होता.
एकीकडे त्यांचं वाचन, चिंतन सुरू असे आणि दुसरीकडे ते सतत लोकांना भेटत असत. एकाचवेळी त्यांचा दोन पातळ्यांवर अभ्यास चाले. ते प्रामुख्याने खेळांवर लिहायचे पण त्यांच्याशी बोलताना जाणवायचं की राज्यात काय चाललंय, देशात काय चाललंय, विदेशात काय होतंय याचाही त्यांचा सखोल अभ्यास असे.
क्रिकेट असो, क्रिकेटेत्तेर खेळ असो, संघटनेचा ताळेबंद असो, सोप्या सोप्या सुटसुटीत शब्दांत खुमासदार वर्णन असो, समालोचन असो, तिरकस भाषेत घोटाळ्यांचा पदार्फाश असो, अविरत फिरणं असो, अशक्य कॉन्टॅक्स असो- करमरकर सर वन मॅन आर्मी होते.
एका व्यक्तीत वसलेली संस्थाच होते. मराठी वर्तमानपत्रांमध्ये क्रीडा पान त्यांच्यामुळे सुरू झालं. त्यांच्या जाण्याने मराठी क्रीडा पत्रकारितेचा आधारवडच निखळला आहे.
Published By -Smita Joshi