शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जानेवारी 2024 (08:50 IST)

छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभासाठी २ लाखांपेक्षा जास्त खेळाडू सज्ज

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ स्पर्धा २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई शहर आणि उपनगरात प्रथमच देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उ‌द्घाटन २६ जानेवारी २०२४ रोजी वरळीतील जांभोरी मैदानात होईल.
 
सव्वादोन लाख खेळाडूंची नोंदणी
छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभात लगोरी, लेझिम, लंगडी, पंजा लढवणे, दोरीवरील उड्या, रस्सीखेच, फुगडी, मल्लखांब, कबड्डी, मानवी मनोरे, आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, खो-खो, विटीदांडू, शरीर शौष्ठव, ढोलताशा या १६ पारंपारिक खेळांचा समावेश आहे. यासाठी सव्वादोन लाख खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या स्पर्धा विविध वजनी गटात व वयोगटात होतील. आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, शरीर शौष्ठव व ढोलताशा है चार खेळ अंतिम स्तरावर एकाच ठिकाणी होतील.
२७ गडकिल्ल्यांचे प्रदर्शन
 
शिवकालीन खेळ स्पर्धेच्या अनुषंगाने उद्घाटन प्रसंगी राज्यातील २७ किल्ल्यांचे प्रदर्शन उभारले जात असून, उपस्थित नागरिकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून या किल्ल्यांची माहिती दिली जाणार आहे. त्याचसोबत दांडपट्टा, लाठीकाठी या सारख्या शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके सुद्धा उद्घाटन प्रसंगी सादर केली जातील. या स्पर्धेचे पावित्र्य जपण्यासाठी रायगडावरून शिवज्योतिचे मुंबईमध्ये आगमन होणार आहे.
 
स्पर्धेसाठी मुंबई शहरातील आणि उपनगरातील मैदाने सज्ज
 
हा क्रीडा महोत्सव मुंबई उपनगरात अंधेरी, बोरीवली, कुर्ला, मुलुंड या चार तालुक्यांमध्ये तसेच मुंबई शहरात दोन ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. मल्लखांब, कबड्डी व खो-खो या खेळ प्रकारांच्या तालुकास्तरीय स्पर्धा उपनगर व शहर प्रत्येकी एक ठिकाणी आयोजित करून अंतिमस्तराचे सामने एका ठिकाणी होणार आहेत. इतर ९ खेळांच्या तालुकास्तरीय स्पर्धा ६ ठिकाणी होणार असून अंतिम स्पर्धा मध्यवर्ती एकाच ठिकाणी घेण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण २० मैदान/सभागृहात ही स्पर्धा होणार आहे. त्यातील अंतिम स्पर्धा १० मैदान आणि सभागृहात होणार आहेत.