रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सिंधू उपान्त्य फेरीत दाखल

रिओ ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देणारी स्टार महिला खेळाडू पी. व्ही. सिंधूने जपानची अव्वल खेळाडू मिनात्सू मितानीचे कडवे आव्हान मोडून काढताना येथे सुरू असलेल्या कोरिया सुपर सेरीज बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. सिंधूसमोर आता तृतीय मानांकित संग जी हयुन आणि सहावी मानांकित हे बिंगजियाव यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान आहे. भारताचा गुणवान युवा पुरुष खेळाडू समीर वर्माचे आव्हान मात्र उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
 
पाचव्या मानांकित सिंधूने थायलंडच्या बिगरमानांकित नचाओन जिंदापोल हिच्यावर संघर्षपूर्ण मात करताना महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली होती. तीच कामगिरी कायम राखताना सिंधूने आज जपानच्या मिनात्सू मितानी हिचे जबरदस्त आव्हान 21-19, 16-21, 21-10 असे मोडून काढताना उपान्त्य लढतीची निश्‍चिती केली. जागतिक स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेत्या मितानीने फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत सायना नेहवालला हरविले होते. सिंधूने सायनाच्या त्या पराभवाची परतफेड केली.