शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लिले , बुधवार, 29 नोव्हेंबर 2017 (12:22 IST)

फ्रान्सला डेव्हिस करंडक स्पर्धेत विजेतेपद

अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत बेल्जियमचे आव्हान 3-2 असे मोडून काढताना फ्रान्सने अत्यंत प्रतिष्ठेच्या डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळविला. फ्रान्सला 2001 नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकता आली आहे.
 
डेव्हिड गॉफिनने पहिल्या एकेरीत लुकास पोइलेवर मात करून बेल्जियमला 1-0 असे आघाडीवर नेले होते. परंतु त्सोंगाने स्टीव्ह डार्किसला सरळ पराभऊत करताना फ्रान्सला 1-1 अशी बरोबरी साधून दिली होती. त्यानंतर प्रशिक्षक नोहा याने दुहेरीसाठी निवडलेल्या रिचर्ड गॅस्केट व पिअरे हर्बर्ट या जोडीने रुबेन बेमेलमन व जोरिस डी लूरे यांच्यावर मात करताना फ्रान्सला 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती.
 
मात्र गॉफिनने पहिल्या परतीच्या एकेरी लढतीत फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगावर 7-6, 6-3, 6-2 असा सनसनाटी विजय मिळवून बेल्जियमला 2-2 अशी बरोबरी साधून दिली होती. त्यानंतर लुकास पोइलेने निर्णायक दुसऱ्या परतीच्या एकेरी लढतीत बेल्जियमच्या स्टीव्ह डार्किसचे आव्हान 6-3, 6-1, 6-0 असे मोडून काढताना फ्रान्सला 3-2 अशा फरकाने विजय मिळवून दिला.
 
फ्रेंच प्रशिक्षक यानिक नोहासाठी मात्र ही विजेतेपदाची हॅटट्रिक ठरली आहे. त्याने याआधी 1990च्या दशकात दोन वेळा फ्रान्सला विजेतेपद मिळवून दिले होते. फ्रान्सने एकूण 10व्यांदा ही स्पर्धा जिंकताना इंग्लंडशी बरोबरी साधली. मात्र सर्वाधिक 32 वेळा डेव्हिस करंडक जिंकण्याचा मान अमेरिकेच्या नावावर असून त्याखालोखाल 28वेळा ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा जिंकली आहे.
 
फ्रान्सने 2002, 2010 आणि 2014 अशा तीन वेळा अंतिम फेरी गाठली होती. परंतु त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. त्या संघातील त्सोंगाने अखेर विजेतेपद मिळविण्यात यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्‍त केले. तीन वर्षांपूर्वी रॉजर फेडरर आणि स्टॅनिस्लास वॉवरिन्का यांच्या स्वित्झर्लंड संघाने फ्रान्सला पराभूत करून डेव्हिस करंडक उंचावला होता. बेल्जियमने मात्र केवळ तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती. सर्वप्रथम 1904मध्ये आणि मग 2015मध्ये त्यांना विजेतेपदाने हुलकावणीच दिली होती.