राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत पूर्वा गावडेची दमदार कामगिरी
सिंधुदुर्गनगरी : ओडिशा -भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत सिंधुदुर्गची कन्या कु. पूर्वा संदीप गावडे हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ठ कामगिरी करत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच निवड होऊन पहिल्याच प्रयत्नात सिल्व्हर मेडल मिळविल्याबद्दल पूर्वाचे आणि महाराष्ट्र संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी विशेष अभिनंदन केले असून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे म्हटले आहे.
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया मार्फत ओडिशा-भुवनेश्वर येथे 16 ते 20 जुलै या कालावधीत राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या संघाने अतिशय दमदार कामगिरी करत दिल्ली, आसाम, कर्नाटक व पश्चिम बंगालच्या संघाना पराभूत करत सलग चार सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती. केरळ संघा विरुद्ध झालेल्या अंतिम सांमन्यात उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र संघाला सिल्व्हर मेडल मिळाले आहे.
वॉटर पोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या मुख्य 7 जणांच्या टीम मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची कन्या पूर्वा गावडे हिने स्थान मिळविले होते. राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच तिची निवड झाली होती. या संधीच सोने करत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी केली. सलग चार सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. संघ निवडीसाठी राष्ट्रीय निवड प्रशिक्षक म्हणून निळकंठ आखाडे, तसेच योगेश निर्मळ व संजीवनी वानखेडे वॉटर पोलोचे प्रशिक्षक याचे मार्गदर्शन लाभले.