गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 7 जुलै 2024 (11:41 IST)

प्रियांशू राजावतने डॅनिश खेळाडूला हरवून कॅनडा ओपनची उपांत्य फेरी गाठली

Badminton tournament
भारताचा युवा बॅडमिंटनपटू प्रियांशू राजावतने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकाचा खेळाडू डेन्मार्कचा अँडर अँटोन्सेनचा पराभव करून मोठा अपसेट निर्माण केला आहे. एंटोनसेनचा पराभव करत राजावतने कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय नोंदवला. राजावत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असून त्याने या अव्वल मानांकित खेळाडूविरुद्ध आपली कामगिरी सुरू ठेवली आणि कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
 
जागतिक क्रमवारीत 39व्या स्थानावर असलेल्या राजावतने एक तास 19 मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीत अँटोनसेनचा 21-11, 17-21, 21-19 असा पराभव केला. 22 वर्षीय भारतीय खेळाडूने पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवलेल्या खेळाडूला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राजावतने दुस-यांदा वर्ल्ड टूर सुपर 500 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे जिथे त्याचा सामना फ्रान्सच्या ॲलेक्स लॅनियरशी होणार आहे.
 
राजावतने चांगली सुरुवात केली आणि पहिल्या गेममध्ये एका वेळी 7-4 अशी आघाडी घेतली होती. अँटोनसेनने मात्र लवकरच 9-9 अशी बरोबरी साधली. यानंतर भारतीय खेळाडूने सलग पाच गुण मिळवले. त्यानंतर अँटोनसेनने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण राजावतने सलग सात गुण मिळवत पहिला गेम जिंकला.
 
अँटोनसेनने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले, पण राजावतने त्याला कडवे आव्हान दिले. एकवेळ 17-17 अशी बरोबरी होती पण डॅनिश खेळाडूने सलग चार गुण मिळवत सामना निर्णायक गेमकडे नेला. तिसऱ्या गेममध्ये राजावत एका वेळी 5-1 ने आघाडीवर होता पण मध्यंतराला अँटोनसेनने 11-10 अशी थोडीशी आघाडी घेतली. यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कडवे आव्हान दिले, मात्र राजावतने 19-19 अशा स्कोअरवर सलग दोन गुण मिळवत सामना जिंकला.
 
Edited by - Priya Dixit