Badminton: लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव,स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची शानदार मोहीम इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यामुळे संपली. पुरुष एकेरी गटात जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानी असलेल्या सेनला जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या अँडर अँटोनसेनकडून एक तास आणि एक मिनिट चाललेल्या लढतीत 22-24, 18-21 असा पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत अँटोनसेनचा सामना आठव्या मानांकित थायलंडच्या कुनलावुत विटिडसर्नशी होईल. यासह भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.
पहिल्या गेममध्ये सेन आणि अँटोनसेन यांच्यात अत्यंत निकराची लढत झाली. डॅनिश खेळाडूने 4-0 च्या आघाडीसह सुरुवात केली, परंतु सेनने पुनरागमन करत गुणसंख्या 5-5 अशी बरोबरी केली आणि नंतर 15-11 अशी आघाडी घेतली. आता पुनरागमन करण्याची पाळी अँटोनसेनची होती. त्याने सलग गुण मिळवून 16-16 अशी बरोबरी साधली. दोन्ही खेळाडू प्रत्येकी 22 गुणांवर जवळपास बरोबरीत होते परंतु अँटोनसेनने 32 मिनिटांत पहिला गेम जिंकून सलग दोन गुण मिळवले. दुसऱ्या गेममध्येही चुरशीची लढत सुरू राहिली आणि दोन्ही खेळाडू एका वेळी 18-18 अशा बरोबरीत होते. सेनच्या चुकांचा फायदा घेत डॅनिश खेळाडूने सलग तीन गुण घेत सामना जिंकला.
Edited by - Priya Dixit