शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By वेबदुनिया|

जाने वो कैसे लोग थे....

(गुरूदत्त पुण्यतिथी विशेष)

NDND
भारतीय चित्रपट जगतात चित्रपट हे माध्यम सृजनशीलतेचे, काहीतरी संवेदशील विचार मांडायचे असा विचार फार थोड्यांनी केला. एकूणात बऱ्याच जणांची या माध्यमाकडे पाहण्याची वृत्ती वणिकाचीच राहिली. या धंदेवाईक मंडळींच्या गर्दीत गुरूदत्तसारखा संवेदनशील कलावंत कुठेही बसण्यासारखा नव्हता. म्हणूनच त्याचे चित्रपट काही तरी वेगळे देऊन जातात. पाहणाऱ्याला अस्वस्थ करतात.

गुरूदत्तला कॅमेरा हा एखाद्या ब्रशसारखा होता. हा ब्रश त्याने अतिशय़ कुलशलतेने सेल्युलाईडच्या फिल्मवर फिरवला आणि प्यासा, कागज के फुल आणि साहब बिवी और गुलाम सारख्या कलात्मक आणि माईलस्टोन चित्रपटांची निर्मिती केली. त्यानेही व्यावसायिक चित्रपट काढले. त्यांना यशही मिळाले. पण या ट्रायोलॉजीसारखा स्वतःला भावणारा विषयही त्याने मांडला. लोकांना पहायला लावला आणि त्यावर विचारही करायला लावला. बिमल रॉय यांच्यानंतर असा विचार करणारा गुरूदत्तच.

नऊ जुलै 1925 ला मंगळूर येथे एका सारस्वत कुटुंबात जन्माला आलेल्या गुरूदत्तचे शिक्षण कोलकत्यात झाले. नंतर त्यांनी प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांच्या अल्मोडा आर्ट अकादमीमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी नृत्याचेही शिक्षण घेतेल. याशिवाय संगीत आणि चित्रकलेतही त्यांना रस घेतला. त्यांचे कुटुंब कोलकत्याहून मुंबईत आले तेव्हा त्यांच्या आयुष्यालाच एक वेगळे वळण लागले. चित्रपट हे आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम होऊ शकते हे त्यांना प्रथम जाणवले.

1945 मध्ये लाखा रानी या चित्रपटातून अभिनेता म्हणून त्यांनी करीयरची सुरवात केली. याच निर्मिती संस्थेचा हम एक है (1946) या चित्रपटाचे त्यांनी नृत्य दिग्दर्शन आणि सहाय्यक दिग्दर्शन केले. दिग्दर्शक होणे हे गुरूदत्तचे ध्येय होते. केवळ या वेडापोटी ते अस्वस्थही होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले ते 1951 मध्ये आलेल्या 'बाजी'मुळे. देव आनंदच्या नवकेतन बॅनर्सचा हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला आणि गुरूदत्तही यशस्वी दिग्दर्शक म्हणून नावाजला गेला. यानंतर मग फिल्म आर्टची जाल (१९५२) आणि एचजी फिल्मसची बाज (१९५३) हे चित्रपट आले.

या चित्रपटांमुळे गुरूदत्त दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाला. त्यानंतर १९५४ मध्ये त्यांनी स्वतःच्या गुरूदत्त फिल्स्मची स्थापना केली. या संस्थेद्वारे आरपार हा पहिला चित्रपट पडद्यावर झळकला आणि जबरदस्त यशस्वी ठरला. यानंतर त्यांच्या चित्रपटांच्या लोकप्रियतेचा सिललिसा पुढे चालतच राहिला. मिस्टर अँड मिसेस ५५, सीआयडी आणि चौदहवी का चांद हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट. या सर्व चित्रपटात सामान्य माणूस आणि समाजातील अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी या केंद्रबिंदू राहिल्या.

काळ्या बाजूंचे चित्रण करतानाही त्यात पांढरी बाजूही आहे, हेही त्याच्या चित्रपटातून दिसत असे. विशुद्ध प्रेम, त्यातील सौंदर्य, भोळेपणा हाही त्याच्या चित्रपटातून दिसून येतो. पण त्याच्यानंतरचे त्याचे चित्रपट नैराश्याकडे झुकणारे आहेत. जीवनाची काळी बाजू जास्त करडेपणाने मांडणारे आहेत. या चित्रपटांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा संदर्भही होता. म्हणूनच प्यासा, कागज के फूल आणि साहब बीवी और गुलाम हे मास्टरपीस आहेत. गुरूदत्त एक चांगला अभिनेता होता. पण त्याहूनही चांगला दिग्दर्शक होता.

गुरूदत्तचे वैयक्तिक आयुष्य चित्रपटापेक्षा फारसे वेगळे नव्हते. गायिका गीता रॉयशी लग्न केल्यानंतरही काही काळानंतर त्या दोघांमध्ये पटेनासे झाले. त्यात वहिदा रहमान गुरूदत्तच्या आयुष्यात आल्यानंतर या तणावात भर पडली. वहिदा गुरूदत्तची प्रेरणा होती. जीवनातील या संघर्षाच्या काळातच अचानक दहा ऑक्टोबरला त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. त्यांनी असे का केले हे आजपर्यंत न उलगडलेले कोडे आहे. काही म्हणतात, ही आत्महत्या नैराश्यापोटी होती. काहींच्या मते वहिदा आयुष्यातून दूर गेल्याने आत्महत्या केली. याची खरी बाजू मात्र कधीच समोर येणार नाही. पण गुरूदत्तच्या अकाली जाण्याने फार मोठ्या दिग्दर्शकाला चित्रपटसृष्टी मुकली.