शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By वेबदुनिया|

'दिल से' रहमान

IFM
एआर रहमान यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. संगीताशिवाय रहमान आणि रहमान यांच्याशिवाय संगीत.. याचा विचारही होऊ शकणार नाही. दक्षिण भारतीय असले तरी त्यांनी आपली ओळख तेवढीच मर्यादीत ठेवली नाही. हिंदीशिवाय तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड संगीतामध्ये त्यांनी आपली जादू दाखवली. भारतीयांनाच नव्हे तर जगाच्या कानाकोप-यातील संगीतरसिकांवर आपल्या संगीताची मोहिनी घालून त्यांनी संगीताला भाषा, प्रांतीक मर्यादा नसतात हे सत्य दाखवून दिले. त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट 'रोजा' दर्जेदार होताच पण, त्याचे संगीत कर्णमधुर होते. हे संगीत लोकांना इतके आवडले की त्यांनी रहमान यांना डोक्यावरच घेतले. त्यानंतर त्यानी कधीही मागे वळून पाहिलेच नाही. आक्रस्ताळी संगीताच्या आक्रोशात रहमान यांचे संगीत वेगळे ठरले. म्हणूनच ते यशाच्या शिखरावर पोहचले. आता तर त्यांना ऑस्करच्या तोडीचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय म्हणूनही त्यांना मान मिळालाय....

सहा जानेवारी 1966 मध्ये चेन्नईला जन्मलेल्या रहमान यांचे वडिल आर. के. रहमान मल्याळम चित्रपटांना संगी‍त देत असत. ए. आर. केवळ 9 वर्षांचे असताना वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबियांना घरातील वाद्ये भाड्याने देऊन उदरनिर्वाह करण्याची वेळ आली. घरच्या या परिस्थितीचा ए. आर. यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी पंडीत धनराज यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास सुरूवात केली. 11 व्या वर्षी आपल्या ‍बालमित्राबरोबर त्यांनी रहमान बॅण्डरूटससाठी की-बोर्ड वाजविण्यास सुरूवात केली. चैनईत 'नेमेसि‍स एवेन्यू' ची स्थापना केली. ते की-बोर्ड, पियानो हार्मोनियम, सिंथेसायझर ही सगळी वाद्ये वाजवायचे. याचवेळी त्यांनी लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकची स्कॉलरशिप ‍मिळवली आणि त्यांनी पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताची पदवी घेतली.

1991 मध्ये त्यांनी आपल्या घरातच स्टुडिओ सुरू केला. 1992 मध्ये त्यांना दिग्दर्शक मणिरत्नम यांनी 'रोजा' या चित्रपटासाठी संगीत देण्याचे काम दिले. हे संगीत इतके लोकप्रिय झाले की, चित्रपटाएवढेच ए. आर. रहमान हे नाव गाजले. रोजाच्या संगीताला अनेक पुरस्कार देखील मिळाले.

रहमान यांच्या संगीताची जादू
कर्नाटकी, पाश्चात्य शास्त्रीय संगीत, हिंदुस्थानी संगीताचा सुरेख संगम म्हणजे ए आर रहमान यांचे संगीत.. सातत्याने प्रयोगशील असणा-या रहमान यांनी श्रोत्यांची संगीताची रूचीही बदलली. सुरूवातीला त्यांनी पारंपरिक संगीत दिले. पण, त्यानंतर त्यांनी फ्यूजनही केले. हे करत असताना त्यांनी संगीताच्या आत्म्याला धक्का लागू दिला नाही.

सुफी संगीत त्यांच्या विशेष आवडीचे असावे. सुफी संगीताचा अतिशय चांगला उपयोग त्यांनी आपल्या संगीतात केला. एकीकडे चित्रपट संगीत करत असताना अल्बमही केले. त्यांचा वंदे मातरम या अल्बममधील संगीत अंगावर रोमांच आणणारे आहे. भारत हा युवकांचा देश आहे आणि अध्यात्मिक जोड असल्याने आपल्या देशाला प्रगतीपासून कोणीच रोखू शकत नाही, असे ते म्हणतात.

लोकप्रिय (निवडक) चित्रपट
रोजा (तमिळ, हिंदी)
रंगीला (हिंदी)
पुढीया मुगल (तमीळ)
सुपर पुलिस (तेलगू)
रंग दे बसंती (हिंदी)
गॅग मास्टर (तेलगू)
सजनी (कन्नड)
वारियर ऑफ हैवन एंड अर्थ (चिनी)
जोधा अकबर (हिंदी)

संगीताला समर्पित
स्वातंत्र्यदिनानिमित्त 1997 मध्ये 'वंदे मातरम' या लोकप्रिय अल्बमची निर्मिती
भारत बाल यांच्या दिग्दर्शनाखाली 'जन गण मन' हा अल्बमची निर्मिती
जाहिरातींच्या धून स्वत: लिहून त्याला संगीत दिले
प्रख्यात कोरीयोग्राफर प्रभूदेवा, शोभनाबरोबर ‍तमीळ कलाकारांचा ग्रुप करून मायकल जॅक्सबरोबर या कलाकारांचा कार्यक्रम सादर केला