सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. फिल्लमबाजी
Written By

जेव्हा सुनील दत्त यांनी संजय दत्तला सांगितलं होतं, 'मी आता तुझ्यासाठी काही करू शकत नाही'

- विकास त्रिवेदी
मोठ्या पडद्यावर हिरोची कहाणी रंगवणाऱ्या संजय दत्त यांचं खरं आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखंच आहे.
 
कदाचित म्हणून संजय दत्त यांच्यावर आलेल्या चित्रपटातल्या संजूबाबाच्या तोंडी एक डायलॉग होता, "अपना लाइफ कभी अप, कभी डाउन. ड्रग्स लिया. महंगे होटलों में भी रहा और जेल में भी. घडियां भी पहनीं, हथकडियाँ भी. 308 गर्लफ्रेंड्स थीं और एक AK-56 राइफल."
 
विमानाचं उड्डाण होण्यापूर्वी ज्याप्रकारे उद्घोषणा होते, त्याप्रकारेच वाचकांना आधी सूचित केलेले बरं. कारण तितकीच अकल्पित कहाणी आता उलगडली जाणार आहे... 'देवियो और सज्जनो, कृपया कुर्सी की पेटी बाँध लीजिए...'
 
यापुढे संजय दत्त अर्थात आपल्या संजू बाबाची आजवर समोर न आलेली उत्कंठावर्धक कहाणी मांडली जाणार आहे. अर्थातच या गोष्टीची सुरुवात त्यांच्यापासूनच व्हायला हवी, ज्यांनी संजूबाबाला जन्म दिला... त्याची आई आणि सिने अभिनेत्री नर्गिसपासून.
 
नर्गिस ज्यांनी 'मदर इंडिया' या प्रचंड गाजलेल्या चित्रपटात चुकीचं काम करणाऱ्या आपल्या मुलाला, म्हणजेच बिरजूला गोळी मारली होती. पण ही पडद्यावरची गोष्ट होती.
 
29 जुलै 1959 रोजी दत्त घराण्यात संजयचा जन्म झाला. आपला लाडका सुपुत्र आयुष्यात कुठल्या वेड्यावाकड्या वाटा धुंडाळेल आणि कुठल्या संगतीच्या आहारी जाईल, याचा त्या मातेनं कधी स्वप्नातही विचार केला नसेल.
 
नर्गिस आणि सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त. लहानपणी सेटवर असताना, संजूची तयारी झाली की आई त्याचे पापे घ्यायची, त्यावेळी तो लाजून तोंड लपवून घ्यायचा. फिल्म डिव्हिजनच्या डॉक्युमेंटरीमध्ये हा प्रसंग पाहायला मिळतो. लहानगा संजू लाजला की कॅमेऱ्याकडे पाठ फिरवायचा. पण याच संजूबाबानं पुढे आयुष्यभर कॅमेऱ्यापुढे राहणं पसंत केलं.
 
संजय दत्तची मोठी बहीण झहिदाने एका टीव्ही शोमध्ये एक किस्सा सांगितला होता, "संजय मनानं खूप चांगला होता. एके दिवशी नरिमन पॉइंटला गाडी उभी असताना, त्याच्या गाडीभोवती एक मुलगा वारंवार घुटमळत होता. गाडीचा ड्रायव्हर कासीम भाईनं त्या मुलाच्या श्रीमुखात भडकावली. गाडी घराकडे वळवली. मात्र या प्रसंगानं वाईट वाटलेल्या संजयला रडू अनावर झालं. काही केल्या त्याचा हुंदका थांबेना. अखेरीस गाडी पुन्हा मागे घेऊन त्या मुलाला एक दुधाची बाटली घेऊन दिली, तेव्हा कुठे जाऊन संजयला बरं वाटलं."
 
तर एका रेडिओ इंटरव्ह्यूमध्ये नरगिस यांनी सांगितलं होतं -" संजयचा जन्म झाला, तो थोडा कळता झाला त्यावेळची गोष्ट. जेव्हा मी शूटिंगसाठी म्हणून घराबाहेर निघायचे त्या त्या वेळी संजय खूप रडायचा. इकडे स्टुडिओत जरी पोहोचले तरी माझं चित्त थाऱ्यावर नसायचं. तो ठीक असेल की नाही याची काळजी वाटायची. म्हणूनच शेवटी मी सिनेसृष्टीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला."
संजूच्या बिघडण्याची सुरुवात
सुनील दत्त यांनी एक प्रसंग अनेकदा सांगितला आहे. एकदा काश्मीरला असताना, मजामस्तीत त्यांनी संजयच्या हातात सिगरेट दिली, त्याची प्रतिक्रिया त्यांना पाहायची होती. मात्र सुनील दत्त चकित झाले कारण संजूबाबनं सिगरेट व्यवस्थित ओढून दाखवली. इतकंच नाही तर पूर्ण संपवून दाखवली.
 
संजूबाबा तेव्हा दहा वर्षांचाही नव्हता. सुनील दत्त यांना घरी भेटायला येणारे निर्माते वा त्यांचे दोस्तमंडळी सिगारेट ओढायचे. ती अर्धवट ओढलेली सिगारेट्सची थोटकं ते तशीच टाकून जायचे. त्या अर्धवट कांड्या उचलून संजूबाबा चोरून सिगरेट ओढायला शिकला.
 
संजयचं पाऊल वाकडं पडत असल्याची कल्पना आल्यानंच मुंबईच्या कॅथेड्रल शाळेतून त्यांचं नाव काढून त्याला हिमाचल प्रदेशमधली नामांकित 'सेंट लॉरेन्स' बोर्डिंग शाळेत पाठवण्यात आलं. संजयची पुढची काही वर्षं तिथंच गेली.
 
संजयला लहानपणी संगीताची आवड होती. शाळेच्या बँडमध्ये सर्वांत शेवटी संजय ड्रम वाजवत चालायचा. त्याची बहीण प्रिया दत्तने एका टेलिव्हिजन कार्यक्रमात सांगितलं होतं, "संजयला फक्त एकाच प्रकारे शाळेतला ड्रम वाजवता यायचा."
 
फारूख शेख यांना एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सुनील दत्त यांनी एक किस्सा सांगितला होता. 1971च्या फाळणीनंतर एका कार्यक्रमासाठी भारतीय कलाकार बांगलादेशात सादरीकरणासाठी जाणार होते. संजयनंही जाण्याचा हट्ट केला. सुनील दत्त यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. भारतीय कलाकार तिथं जाऊन गाणं गातील किंवा वाद्य वाजवतील. यावर संजयचं उत्तर होतं- "मी बाँगो वाजवेन."
 
अखेरीस संजयलाही बांगलादेश दौऱ्यावर नेण्यात आलं. व्यासपीठावर दस्तुरखुद्द लता मंगेशकर गाणं सादर करत होत्या. गाता गाता त्या अचानक थांबल्या आणि त्यांनी मागे वळून पाहिलं. बाँगो चुकीच्या ठेक्यात वाजत होता. पुढचं गाणं त्यांनी याकडे दुर्लक्ष करत सादर केलं.
 
अमली पदार्थांच्या विळख्यात
1977 मध्ये 18 वर्षं वयाचा उमदा तरुण, संजय लॉरेन्स बोर्डिंग शाळेतून घरी परतला. त्याचं नाव मुंबईतल्या नामांकित एल्फिन्स्टन महाविद्यालयात टाकण्यात आलं. याच काळात संजूबाबाची पावलं अमली पदार्थांच्या काळोख्या वाटांकडे वळू लागली.
 
एका मुलाखतीत संजयनं स्वतःच याची कबुली दिली होती की याच दरम्यान तो घरी असला तरी आपल्या खोलीत स्वतःला कोंडून घ्यायचा, एकटं राहणं पसंत करायचा.
 
आई नर्गिसला कदाचित याची कुणकुण होती, मात्र त्यांनी सुनील दत्त यांच्याकडे कधीही संजयच्या अमली पदार्थ सेवनाबद्दल अवाक्षरही काढलं नाही.
 
याच दरम्यान संजयनेही आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सिनेमात एंट्री करायचं ठरवलं. यापूर्वीच त्याने 1971 साली प्रदर्शित झालेल्या 'रेशमा और शेरा' चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं.
 
संजयचा निर्णय झाल्यावर सुनील दत्त यांनी त्याला चांगलं प्रशिक्षण दिलं. त्याच्याकडून चांगली मेहनत करवून घेतली. पुरेशी तयारी झाल्याची खात्री पटल्यावर 'रॉकी' सिनेमात संजयला हिरो म्हणून घेण्याचा निर्णय झाला. नायिका म्हणून टीना मुनीमची निवड करण्यात आली. 'रॉकी'चं शूटिंग सुरू झालं.
कर्करोग आणि दुःखाचं नातं
'रॉकी'चं शूटिंग जोरात सुरू असतानाच नर्गिस यांना कर्करोगाचं निदान झालं. उपचारासाठी सुनील दत्त त्यांना अमेरिकेला घेऊन गेले. तिथे गेल्यावर तब्बल दोन महिने त्या कोमामध्ये होत्या. त्यानंतर जेव्हा त्या शुद्धीवर आल्या त्यावेळी पहिला प्रश्न त्यांनी विचारला - "संजय कुठे आहे?"
 
हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सुनील दत्त नर्गिस यांचा आवाज रेकॉर्ड करायचे. नर्गिस यांनी आपल्या लेकासाठी एक सुंदर संदेश रेकॉर्ड करून ठेवला होता. काही कालावधीनंतर प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानं नर्गिस भारतात परतल्या.
 
संजयच्या पहिल्या सिनेमाचं शूटिंग जोरात चाललंय, हे ऐकून या आईच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. म्हणजे नर्गिस यांनी तर सुनील दत्त यांच्यापुढे जाहीरच करून टाकलं होतं - "काहीही करा. पण मला माझ्या मुलाच्या पहिल्या सिनेमाच्या प्रिमियरला घेऊन चला. स्ट्रेचर असो वा चाकाची खुर्ची, कसल्याही मदतीनं मला तिथं जायचंच आहे."
 
बायकोच्या इच्छेचा मान राखत सुनील दत्त यांनीही सगळी तयारी केली. 7 मे रोजी 'रॉकी'चा प्रिमियर दणक्यात पार पडणार होता, पण अचानक नर्गिस यांची तब्येत बिघडली.
 
त्यांना घाईघाईत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचं शरीर काही संकेत देऊ पाहात होतं. अखेरीस 3 मे 1981 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नियतीचा क्रूर खेळ तरी पाहा, 'रॉकी'च्या प्रिमियरच्या बरोबर चार दिवस आधी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
 
सिनेमाचा पडदा असो वा आयुष्य, कुणाच्या येण्यानं अथवा जाण्यानं गोष्टी थांबत नाहीत, हेच खरं.
 
संजय दत्तने एका मुलाखतीत सांगितलं होतं की आईच्या मृत्यूनंतर तो अजिबात रडला नाही.
 
सिमी गरेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत सुनील दत्त यांनी एक भावनिक प्रसंग सांगितला होता - 'रॉकी'च्या प्रिमियरच्या दिवशी सिनेमा हॉलमधली एक खुर्ची रिकामी होती. कुणीतरी येऊन त्यांना विचारलं, 'दत्त साहब, ही सीट रिकामी आहे का?' यावर त्यांनी उत्तर दिलं होतं - "नाही ही माझ्या पत्नीची जागा आहे..."
 
'रॉकी' पडद्यावर झळकला आणि प्रेक्षकांनी सिनेमाला उचलून धरलं.
 
नर्गिस यांच्या जाण्यानं संजू टीना मुनीम आणि अमली पदार्थ या दोहोंच्याही अधिक निकट आला.
 
संजय दत्तने दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये त्यानं उघडपणे अमली पदार्थ घेत असल्याचा स्वीकार केला होता. "जेवढ्या प्रकारचे अमली पदार्थ असतात, मी सगळे घेतले. असं म्हणतात की 10 पैकी एका माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं व्यसन असतंच. हे व्यसन खाण्याचं, जुगार खेळण्याचं, दारू पिण्याचं वा अमली पदार्थ सेवन करण्याचं असू शकतं. मी या दहापैकी एक होतो. पण अमली पदार्थ सेवन हा एक प्रकारचा आजार आहे."
 
संजय म्हणतो - "एका नशा करणाऱ्या माणसाचा स्वीकार कुणीही सहजतेनं करत नाही. मात्र माझ्या वडिलांनी मला स्वीकारलं होतं. ते निर्मात्यांना फोन करून सांगत, माझ्या मुलाला सिनेमात घेण्यापूर्वी विचार करा, त्याला अमली पदार्थांचा नाद आहे."

'मी अमली पदार्थांपासून दूर गेलो कारण...'
संजय दत्तनं एका टेलिव्हिजन कार्यक्रमात हा खुलासा केला की - "एके दिवशी सकाळी मी डोळे उघडले. जवळ आमचा नोकर उभा होता. मी त्याला म्हणालो - भूक लागली आहे. काही खाण्यासाठी आणा. हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याला कारण विचारलं तो म्हणाला- 'तुम्ही दोन दिवसांनंतर आज झोपेतून उठलात.' मी आरशात पाहिलं. माझ्या चेहऱ्यावर निस्तेज सूज होती. केस विस्कटलेले होते."
"मला वाटलं मी आता मरणार आहे. मी तडक वडिलांच्या समोर गेलो आणि म्हणालो- 'मला तुमची मदत हवी आहे.' वडिलांनी मला मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं."
 
1984 सालच्या सुरुवातीचा काळ होता. अमली पदार्थांच्या व्यसनापासून सुटका करून घेण्यासाठी सुनील दत्त संजयला अमेरिकेत घेऊन गेले. याच काळात संजयच्या टीनाबरोबरच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.
 
अमेरिकेत उपचारादरम्यानच एक हळवा प्रसंग घडला. व्यसनमुक्ती शिबिरात बसलेला असताना अचानक कुणीतरी संजयला नर्गिस यांचा रेकॉर्डेड आवाज ऐकवला. हा तोच संदेश होता जो नर्गिस यांनी आपल्या लाडक्या मुलासाठी रेकॉर्ड करून ठेवला होता.
 
संदेशातल्या ओळी होत्या, "कोणत्याही इतर गोष्टीपेक्षा संजू, आपली नम्रता आणि चारित्र्य यांचा अधिक सांभाळ कर. कधीही कसला दिखावा करू नकोस आणि मोठ्यांचा कधी अपमान करू नकोस. ही एकच गोष्ट अशी असेल जी तुला यशाकडे घेऊन जाईल. तुझ्या कामातही तुला याचा नक्की फायदा होईल."
 
संजय सांगतो, "आईचा आवाज ऐकून मी खूप रडलो. आई गेल्यावर तब्बल दोन वर्षांनी तिच्यासाठी माझ्या डोळ्यांत आसवं आली. चार-पाच तास मी रडतच होतो, माझे अश्रू काही केल्या थांबतच नव्हते. पण जेव्हा थांबले तेव्हा मी नखशिखांत बदललेला होतो."
 
भारतात परतल्यावर संजयपुढे अग्निपरीक्षेचा प्रसंग उभा राहिला, "नऊ महिन्यांनी भारतात परतलो, पहिला माणूस जो मला भेटायला आला तो होता माझा ड्रग सप्लायर. माझ्यापुढे दोन रस्ते होते - एक तर मी सगळंकाही विसरून अमली पदार्थांना जवळ केलं असतं, किंवा दुसरा रस्ता म्हणजे मी त्याला नकार दिला असता. मी खडतर असला तरी दुसरा रस्ता निवडला."
 
उपचारासाठी नऊ महिने अमेरिकेत वास्तव्य केल्यावर संजयनं सिनेसृष्टीला रामराम करून अमेरिकेतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. तिथं व्यापार करावा, असं त्याच्या डोक्यात होतं. पण याहीवेळी नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
 
पप्पू वर्मा यांनी आपल्या 'जान की बाजी' या चित्रपटासाठी संजयची निवड केली. हा चित्रपट 1985 साली प्रदर्शित झाला आणि संजयचं अमेरिकेला जाणं टळलं, ते कायमचंच.
 
1986 साली प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट यांच्या 'नाम' सिनेमाच्या निमित्तानं संजय दत्तच्या आयुष्यात एक सोनेरी वळण आलं. सिनेमातल्या एका गाण्याच्या ओळी तर अशा होत्या जणू संजयला अमेरिकेला जाण्यापासून अडवण्यासाठीच गाणं लिहिलं असावं - 'तू कल चला जाएगा... चिठ्ठी आई है, आई है, चिठ्ठी आई है.'
 
अनेक प्रकरणानंतर संजय दत्त अखेर ऋचा शर्मा हिच्या प्रेमात पडला. अभिनेते देवानंद यांनी ऋचाला इंडस्ट्रीत आणलं होतं. संजय आणि ऋचा अधूनमधून भेटू लागले, हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. हे नातं अखेर विवाहबंधनाच्या धाग्यानं बांधलं गेलं.
 
1987 मध्ये त्यांनी लग्न केलं. पुढच्याच वर्षी त्यांना कन्यारत्न झालं - त्रिशाला. सगळं आलबेल असताना अचानक ऋचा डोकेदुखीनं हैराण होऊ लागली. अनेक तपासण्या, रुग्णालयांचे हेलपाटे यानंतर ऋचाला ब्रेन ट्यूमर असल्याचं समोर आलं. पुढील उपचारासाठी ऋचा लेकीला घेऊन अमेरिकेला गेली.
 
वैयक्तिक आयुष्यात दुखावल्या गेलेल्या संजयची जादू पडद्यावरही चालेनाशी झाली. 'नाम' सिनेमापाठोपाठ आलेले त्याचे अनेक सिनेमे तिकीटबारीवर सपशेल आपटले.
 
मात्र माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्याबरोबर 1991 साली आलेल्या 'साजन' चित्रपटानं अक्षरशः धुमाकूळ घातला. नशिबाचे फासे पुन्हा एकदा संजयच्या बाजूनं पडले.
 
याच दरम्यान संजय आणि ऋचा यांच्यातली दरी वाढत गेली आणि माधुरी दीक्षितबरोबर संजू बाबाचं नाव जोडलं गेल्याच्या उलटसुलट चर्चा रंगू लागल्या.
खलनायक होतानाचा प्रवास
आतापर्यंतची गोष्ट ही दत्त कुटुंबाच्या अनेक जुन्या ऑडिओ-व्हिडिओ मुलाखती आणि डॉक्युमेंट्रीमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित होती. मात्र संजय दत्तबाबतचे अनेक गहन आणि महत्त्वाचे खुलासे अजून बाकी आहेत.
 
1993 साली संजय 'आतिश' सिनेमाच्या चित्रिकरणासाठी मॉरिशसला गेला. भारतात त्यावेळी 1993 सालच्या बॉम्बस्फोटांची कसून चौकशी सुरू होती. समीर हिंगोरा आणि हनीफ कडावाला या दोघांनी संजयकडे AK-56 रायफल असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर संजय जेव्हा मुंबईत परत आला त्यावेळी दहशतवाद विरोधी कायदा 'टाडा'अंतर्गत त्याला अटक झाली.
 
'The Crazy Untold Story of Bollywood Badboy' या पुस्तकात यासिर उस्मान लिहितात - "संजयनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिरोज खान यांच्या 'एल्गार' चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी दुबईमध्ये त्याची भेट कुख्यात गुंड दाऊद आणि अनीस यांच्याशी झाली होती. अबू सालेम, हनीफ आणि समीर यांच्याकडून संजयनं तीन AK-56 घेतल्या होत्या. मात्र एक आपल्याकडे ठेवत बाकीच्या दोन त्यानं त्यांना परत केल्या."
 
संजय असं काही करेल यावर सुनील दत्त यांचा विश्वासच बसत नव्हता. 'तहलका' मासिकात छापून आलेल्या एका हवाल्यानुसार, सुनील दत्त यांनी संजयला चांगलंच खडसावलं, शस्त्र बाळगण्याचं कारण विचारलं त्यावर संजयचं उत्तर होतं - "माझ्या नसानसात मुस्लीम रक्त वाहत आहे. शहरात जे काही चालू आहे, ते मी सहन करू शकत नाही."
 
1993 साली जेव्हा मुंबई बाँबस्फोटानं हादरली होती त्यावेळी संजय परदेशात होता. त्यावेळी मित्र युसूफ नळवाला याला त्यानं त्याची रायफल नष्ट करायला सांगितलं होतं. तशी कबुली संजयनं दिल्याचं सांगितलं जातं. मात्र खटल्याची सुनावणी सुरू झाली आणि संजयनं आपला कबुलीजबाब बदलला.
 
1992 साली बाबरी मशीद विध्वंसानंतर उसळलेल्या दंगली हेसुद्धा संजयने शस्त्र जवळ बाळगण्याचं एक कारण होतं, असा दावा करणाऱ्यांमध्ये एस. हुसैन झैदी यांचाही समावेश आहे.
 
'My Name is Abu Salem' या पुस्तकात झैदी लिहितात - "बाबरी मशीद पतनानंतर मुंबईत भयंकर दंगली उसळल्या. मात्र जखमींचा धर्म कोणता आहे, याची पर्वा न करता सुनील दत्त मदतकार्यासाठी धावून आले. संजयही यात सामील झाला. काही लोकांना हे सहन झालं नाही. काही उजव्या विचारांच्या संघटनांनी दत्त कुटुंबावर निशाणा साधला, त्यांना धमक्या येऊ लागल्या. काही ठिकाणी तर मदतीसाठी गेलेल्या सुनील दत्त यांच्यावर हल्लेही झाले. संजय दत्त धमक्यांच्या फोनला पुरता कंटाळला होता. सिनेमातल्या नायकाला असं वाटलं की खऱ्या आयुष्यातही आपल्यातला नायक सिद्ध करण्याची हीच खरी वेळ आहे."
 
संजयला काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागली, मात्र काहीच दिवसात जामिनावर त्याची सुटका झाली. सिनेसृष्टीतल्या चटपटीत बातम्या छापणाऱ्या मासिकांमध्ये पूर्वी माधुरी-संजय यांच्या गुफ्तगूबद्दल खबरा असायच्या. आता त्यांच्या नात्यात दरी निर्माण झाल्याचं वृत्त रंगवून छापलं जाऊ लागलं.
 
संजय तुरुंगात गेल्याचा सर्वाधिक फायदा जर कुणाला झाला असेल तर तो सुभाष घईंना. खलनायक हा 1993 सालचा सुपरहिट चित्रपट ठरला. याचवर्षी संजयची ओळख मॉडेल रिया पिल्लईशी झाली.
 
जामीन, तुरुंगवास, जामीन, तुरुंगवास
एक वर्ष जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा एकदा 1994च्या जुलैमध्ये संजयला तुरुंगात जावं लागलं. यावेळी थेट अंडासेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली. कुख्यात गुंड, भयंकर आरोपींना ज्या ठिकाणी ठेवलं जातं तीच ही जागा.
 
काही वर्षांपूर्वी संजय आणि त्याची बहीण प्रिया दत्त यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची वार्ता होती. मात्र तुरुंगात असताना भावा-बहिणीतलं प्रेम किती निर्व्याज होतं, याचा किस्सा फारूख शेख यांच्या 'जीना इसी का नाम है' या प्रसिद्ध कार्यक्रमाद्वारे जगानं जाणलं होतं. या कार्यक्रमात खुद्द प्रिया दत्त यांनी हा किस्सा सांगितला होता - "रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही संजयला भेटायला तुरुंगात गेलो. वडिलांनी सांगितलं - राखी बांध. त्यावेळी संजय जड अंतःकरणाने मला म्हणाला - माझ्याकडे तुला भेट देण्यासाठी काही नाही, पण काही कूपन्स मी वाचवून ठेवली आहेत. तुरुंगात चहा विकत घेण्यासाठी ही कूपन्स मिळतात."
 
प्रियाने 1998 साली सांगितलं होतं - "संजय तू दिलेली कूपन्स माझ्याकडे आजही जपून ठेवलेली आहेत."
 
सिमी गरेवालच्या राँदेव्हू (Rendezvous) या कार्यक्रमात संजयनं एक किस्सा कथन केला होता. संजय म्हणतो- "तुरुंगात डॅडी भेटायला यायचे तेव्हा म्हणायचे- 'कल हो जाएगा बेटा, कल हो जायेगा.' असेच तीन-चार महिने चालू राहिलं. एकेदिवशी डॅड आले आणि पुन्हा तिच टेप त्यांनी वाजवली... 'कल हो जाएगा'. ते ऐकून मी संतापून ओरडलो - 'डॅड केव्हा होणार?' हे ऐकून वडिलांनी माझी कॉलर पकडली आणि रडत रडत मला सांगितलं - 'मला माफ कर बाळा. आता मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही'."
 
यासिर उस्मान आपल्या पुस्तकात लिहितात - तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्यानं सुनील दत्त मदतीसाठी 'मातोश्री'वर पोहोचले.
 
बाळासाहेब ठाकरेंनी उघडपणे संजय दत्तला पाठिंबा दिला आणि दत्त कुटुंबातील कोणताही सदस्य देशविरोधी नसल्याची ग्वाही दिली. याच ठाकरेंची शिवसेना एकेकाळी संजय दत्तच्या सिनेमांना जोरदार विरोध करायची.
 
संजय दत्तला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये शत्रुघ्न सिन्हाही होते.
 
तब्बल 15 महिने तुरुंगाची हवा खाल्यानंतर संजयला दिलासा मिळाला. ऑक्टोबर 1995मध्ये त्याची सुटका झाली. सफेद कुर्ता आणि कपाळावर लाल टिळा, अशा दिमाखात संजयनं तुरुंगाबाहेर पाय ठेवला.
 
सुटका झाल्याच्या दोन महिन्यांनी डिसेंबर 1996 मध्ये ऋचा शर्मानं अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. तर इकडे रिया पिल्लईसह संजयची सलगी अधिक वाढली.
 
1998 साली संजयनं तिच्याशी विवाह केला. 1999 साली आलेल्या संजयच्या 'वास्तव' सिनेमानं प्रसिद्धीचा नवा अध्याय रचला आणि संजयला त्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला.
 
2000 साली काही अशा ऑडिओ टेप्स प्रसिद्ध झाल्या, ज्यात संजय दत्त छोटा शकील बरोबर बोलत असल्याचं समोर आलं. इंटरनेटवर आजही हे ऑडिओ उपलब्ध आहेत.
 
CBI या कॉल्सचं रेकॉर्डिंग करत होती आणि 2002 साली पुरावा म्हणून त्यांचा वापर करण्यात आला, असं यासीर उस्मान यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.
 
'जादू की झप्पी'
'58 - पाली हिल' या बंगल्यामध्ये नरगिस यांनी एक घरकुल वसवलं होतं, आज त्या घरातला प्रत्येक सदस्य स्वतंत्र राहात होता.
 
2003 साली संजयला एक असा सिनेमा मिळाला, ज्यातल्या भूमिकेमुळे संजयच्या नशिबाला 'जादू की झप्पी' मिळाली. 'मुन्नाभाई MBBS' प्रोजेक्ट घेऊन राजकुमार हिरानी आले होते.
 
यात सुनील दत्त यांनीच संजयच्या वडिलांची छोटीशी, पण कमालीची भूमिका साकारली होती, काही दृश्यं तर अगदी त्याच्या प्रत्यक्ष जीवनाची रुपेरी पडद्यावर पुनरावृत्तीच वाटत होते. हा सिनेमा प्रचंड हिट ठरला.
 
त्यानंतर दोनच वर्षांनी संजयच्या डोक्यावरून वडिलांचं छत्रही हरपलं. सुनील दत्त - एक असा नवरा आणि बाप, ज्यानं आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा हिस्सा फक्त दुःखाशी असलेलं आपलं नातं निभावण्यात घालवला.
 
'मान्यताप्राप्त'
मॉडेल रियाबरोबरचं संजयचं अफेअर 2008 सालापर्यंत चाललं. यानंतर संजयच्या जीवनात मान्यता उर्फ दिलनवाज शेख आली, जिनं प्रकाश झा यांच्या 'गंगाजल' सिनेमात 'अल्हड मस्त जवानी' या आयटम साँगवर डान्स केला होता, आणि यानंतर ती बरीच चर्चेत आली होती.
 
मान्यता तर संजयच्या जवळ आली, पण याच दरम्यान बहीण प्रिया, नम्रता आणि भावोजी-दोस्त कुमार गौरव यांच्यापासून तो लांब गेला. त्यांच्यातले संबंध इतके ताणले गेले की संजय-मान्यताच्या लग्नातही दोघी बहिणी सहभागी झाल्या नाहीत.
 
मात्र 2010 साली मान्यताने इकरा आणि शाहरान या दोन जुळ्या मुलांना जन्म दिला, आणि दोन्ही आत्यांचा राग काहीसा निवळला.
 
पण 1993 सालच्या चुका संजयचा पिच्छा सोडायला तयार नव्हत्या. 2006 साली ज्या मुन्नाभाईने लोकांना गांधीगिरी शिकवली त्या मुन्नाभाईलाच बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी शिक्षा होणं अद्याप बाकी होतं.
 
2007 साली टाडा न्यायालयानं संजय दत्त दहशतवादी नसल्याचा निर्वाळा दिला, मात्र त्याला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. संजय तुरुंगात गेला मात्र लवकरच जामिनावर सुटला.
 
2013 साली सुप्रीम कोर्टाने संजयच्या शिक्षेत घट करत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. मे 2013 मध्ये संजय तुरुंगात गेला आणि फेब्रुवारी 2016 मध्ये चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर त्याची तुरुंगातून लवकर सुटका होणार असल्याची बातमी आली.
 
फेब्रुवारी 2016 मध्ये पुन्हा एकदा कपाळावर टिळा लावून संजयनं तुरुंगाबाहेर पाऊल ठेवलं. तुरुंगातल्या अंधारातून बाहेर पडलेल्या संजयसाठी अखेर 'सुबह हो गई मामू' अशीच स्थिती होती.
 
विशेषत्वानं अशा घडीला ज्यावेळी संजय दत्तच्या जीवनावर आधारीत एक चित्रपट 'संजू' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारणार आहे.
 
हा तोच रणबीर आहे, ज्याच्या वडिलांना अर्थात ऋषी कपूर यांना एकेकाळी संजय दत्त, गुलशन ग्रोवर यांच्या साथीनं मारायला धावला होता. अर्थातच कारण होतं संजयचं टीनावर जडलेले प्रेम!
 
'खुल्लम खुल्ला' या आपल्या आत्मचरित्रात ऋषी कपूर लिहितात - "एके दिवशी संजू आणि गुलशन ग्रोवर नीतूच्या अपार्टमेंटमध्ये गेले. माझ्यात आणि टीनामध्ये काहीतरी सुरू असल्याचा त्यांना संशय होता. नंतर गुलशन ग्रोवरनं मला सांगितलं की नीतूच्या घरी तो त्यावेळी माझ्याशी भांडायलाच आला होता. मात्र नीतूनं संजयला समजावलं, त्याला खात्री पटवून दिली की टीना आणि चिंटू (ऋषी कपूर) यांच्यात काहीही नाही."
 
संजयनं आतापर्यंत किमान 130 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. समाजवादी पक्षाच्या कृपेमुळे राजकारणातही त्यानं नशीब आजमावलं आहे. याच कारणामुळे बहिण आणि काँग्रेस नेता प्रिया दत्त हिच्याशी वादावादीही झाली आहे.
 
आज या वयातही काही लोकांसाठी तो संजूबाबाच आहेत. सरत्या वयातही त्यानं असं काही शरीरसौष्ठत्व कमावलं की सलमान खानही त्यापुढे फिका पडेल.
 
संजयच्या शरीरावर गोंदलेल्या संस्कृत मंत्राचे टॅटू पाहता, त्याला संजूबाबा म्हणावं यासाठी सबळ पुरावे मिळतात. पण खरी मेख त्यापुढे आहे - कारण त्याच्या शरीरावरच्या टॅटूमध्ये जसं 'ओम नमः शिवाय' हा मंत्र आहे, तसंच सुनील-नर्गिस यांचे नाव आहे आणि सोबतीला आग ओकणारा ड्रॅगनही आहे...