किस्से किशोरदांचे (जयंती विशेष)
हिंदी चित्रपटगीतांमध्ये किशोरकुमार हे नाव शुक्रताऱ्यासारखे सतत चमचमणारे राहिले आहे. आज किशोर कुमार आपल्यात नसले तरी त्यांच्या गाण्यांच्या रूपाने हा तारा सतत चमकत आहे. आपल्या आवाजाची मोहिमी लक्षावधी लोकांवर घालणारा हा गायक लहानपणी मात्र कर्कश आवाजाचा म्हणून ओळखला जात होता, आणि त्यांचा आवाज बंद करायसाठी त्याच्या घरच्यांना घसा ताणावा लागायचा असे सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल? पण ते खरंय. त्यांच्या या आवाजाला घरचे लोकही कंटाळले होते. एकदा त्यांच्या पायाला काहीतरी लागले आणि वेदनेमुळे ते कित्येक दिवस रडत होते. सततच्या रडण्यामुळे त्यांच्या आवाजात असा काही बदल झाला की तो मधुर वाटू लागला. त्यांच्या या बदलललेल्या आवाजाने घरचेही आश्चर्यचकित झाले. किशोरे कुमार यांचे बालपण मध्य प्रदेशातील खांडवा या शहरात गेले. पुढे करीयरसाठी वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजे 1946 मध्ये ते मुंबईत गेले. तोपर्यंत त्यांची ओळख अशोक कुमार यांचे भाऊ एवढीच होती. पुढे जाऊन हा मुलगा चित्रपटसृष्टीवर राज्य करेल असे कुणी सांगितले असते तर त्याला वेड्यातच काढले असते. पण ते घडले. चमत्कारीकपणा, विक्षिप्तपणा, मनस्वीपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते. त्यांच्या या पैलूंचे काही किस्से. कट म्हणताय की कार पुढे नेऊ?- अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार अशी अनेक रूपे किशोर कुमार यांची असली तरी ते मुळात गायक होते. आपल्या हीच खरी ओळख आहे, असे त्यांचे म्हणणे होते. ते अभिनय करत ते केवळ नाईलाज म्हणून. त्यामुळेच कोणताही सीन असो ते तो आपल्या पद्धतीने करत. यामुळे दिग्दर्शक आपल्याला चित्रपटातून काढून टाकेल, असे त्यांना वाटे. पण झाले भलतेच. त्यांच्या या विक्षिप्त करामतीच गाजल्या. एकदा त्यांना एका चित्रपटात कार चालवायची होती. दिग्दर्शकाने सांगितले, कट बोललो की थांबवायची. किशोरने गाडी सुरू केली ती थांबवलीच नाही. युनिटचे लोक घाबरले. हिरो कुठे गेला तेच कळेना. शोधाशोध सुरू झाली. तरीही सापडेना. मग पनवेलहून फोन आला, किशोरकुमार दिग्दर्शकाशी बोलले, कट म्हणताय की कार पुढे नेऊ?अभिनेत्याच्या आवाजात गायन- किशोरकुमारचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या गायकाला ते आवाज देत, त्याच्या आवाजाच्या पोतानुसार ते गात. त्यामुळे आवाज किशोरचा असला तरी ते गाणे देव आनंदवर आहे, की राजेश खन्नावर ते न चटकन कळतं. किशोरच्या गाण्यांचा देव आनंद, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनच्या लोकप्रियतेत मोठा वाटा आहे.
आणिबाणीत बंदी- आणिबाणी असताना किशोरचे सत्ताधाऱ्यांशी वाजले. संजय गांधी यांनी दिल्लीत सास्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. तेथे गाण्यासाठी त्यांना किशोरदांना निमंत्रण पाठवले. पण तेही मानी. त्यांनी मानधनाची मागणी केली. संजय गांधींना त्यांच्या नावावरच फुली मारली. मग आले संजयच्या मना तेथे कोणाचे चालेना. आकाशवाणी, दूरदर्शनचे दरवाजेही किशोरसाठी बंद झाले. पाच जानेवारी 1977 ला अखेर त्यांचे गाणे आकाशवाणीवर लागले. गाणे होते, दुःखी मन मेरे, सुन मेरा कहना, जहॉं नही चैना वहॉं नहीं रहना.भयपटांची आवड- किशोरदांनी आपल्या घरातील एक खोली खास आपल्या छंदासाठी राखून ठेवली होती. हा छंद होता. भयपट पाहण्याचा. या खोलीत सगळ्या भयपटांच्या कॅसेट्स ठेवल्या होत्या. किशोरदांना मूड असला की ते या खोलीत येत. अंधार करत आणि आपल्याला आवडेल तो चित्रपट पहात बसत. त्यांच्या या विक्षिप्त छंदाचे अनेक किस्से चित्रपटसृष्टीत मशहूर आहेत. चार विवाह- किशोरदांचे वैयक्तिक आयुष्यही त्यांच्या विक्षिप्तपणापासून सुटले नाही. त्यांनी चार लग्न केली. त्यांची पहिली पत्नी रूमादेवी. लग्नानंतर दोन वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला तो अमित कुमार. त्यानंतर त्यांचे आणि रूमादेवींचे पटले नाही. दोघंही वेगळे झाले. चलती का नाम गाडी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचे मधुबालाशी संबंध जुळले. त्यांनी लग्नही केले. नऊ वर्षे हे लग्न टिकले. याच काळात मधुबाला आजारी पडली. किशोरदांनी त्यांची खूप सेवा केली. मधुबालाच्या निधनानंतर सहा वर्षांनी किशोरदांनी 1975 मध्ये योगिता बालीशी लग्न केले. पण काही महिन्यात हे लग्न तुटले. त्यानंतर त्यांनी लीना चंदावरकर यांच्याशी लग्न केले. त्यांच्यापासून त्यांना सुमित कुमार हा मुलगा झाला.