रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By वेबदुनिया|

श्रेयस तळपदे आता हिंदीत स्थिरावला

IFMIFM
'इकबाल' या चित्रपटातून हिंदी चि‍त्रपटसृष्टीत प्रवेश करणारा श्रेयस तळपदे आता हिंदीत बऱ्यापैकी स्थिरावला आहे. त्याला चित्रपटही चांगले मिळाले आहेत. बॉलीवूड महाराष्ट्रात असूनही त्यात नायकाची भूमिका करणारे मराठी अभिनेते फार कमी होते. (नाना पाटेकरचा अपवाद वगळता.) अभिनेत्री मात्र भरपूर होत्या. माधुरी दीक्षित हे ताजं उदाहरण.

पण आता श्रेयसच्या निमित्ताने बॉलीवूडला मराठमोळा नायक मिळाला आहे. 'डोर', 'अपना सपना मनी मनी' ‍या चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या श्रेयसचे नुकतेच तीन चित्रपट रिलीज झाले आहेत. 2007 हे वर्ष त्याच्यासाठी चांगले ठरले. त्याने भूमिका केलेलाहिट ठरला आहे. याआधी त्याचे 'अगर', 'दिल दोस्ती....' हे चित्रपटही रिलीज झाले आहेत.

IFMIFM
मराठी रंगभूमी व चित्रपटांची पार्श्वभूमी असलेल्या श्रेयसने 'इकबाल' या पहिल्या हिंदी चित्रपटातूनच आपली अभिनय क्षमता दाखवून दिली. 'इकबाल'चे दिग्दर्शक नागेश कुकनूर यांनी त्यांच्या पुढील 'डोर' या चित्रपटातही त्याला भूमिका दिली. यातही त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. आता 'ओम शांती ओम' च्या हिट होण्याने त्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शाहरूख सारख्या सुपरस्टार सोबत काम करण्याचा अनुभव सांगताना श्रेयस म्हणाला, नाटकाशी संबंध असल्याने सीनमध्ये थोडेफार बदल करण्याची मला सुरूवातीपासूनच सवय आहे. पहिल्या दिवशी पहिला शॉट देताना मी घाबरलो होतो. शाहरूखला हे बदल सांगायचे किंवा नाही हे मी ठरवू शकत नव्हतो. पण तरीही त्याला हे सांगितले. त्याला ते पटले व तो लगेच तयारही झाला. शाहरूख म्हणाला सुद्धा असे केल्याशिवाय आपण काम कसे करणार?

तो पुढे म्हणतो, थोडेफार बदल करता करता आम्ही पूर्ण स्क्रिप्ट बदलवून टाकले. शेवटी संध्याकाळी फरहा खानने कृतक कोपानेच सांगितले, थोडे बदल करता करता तुम्ही माझे पूर्ण स्क्रिप्टच बदलले. आता तुम्ही माझ्या स्क्रिप्टनुसारच काम करा.

IFMIFM
श्रेयस त्याच्याबद्दल पसरणार्‍या अफवांबद्दलही मनमोकळेपणाने बोलला. रामगोपाल वर्मांच्या शोलेमधील सचिनने केलेली भूमिका नाकारल्याचा पश्चाताप होतो काय? या प्रश्नाचे हसत हसत उत्तर देताना तो म्हणाला, काही जण म्हणतात मी ती भूमिका नाकारली तर काहींच्या मते रामूने मला काढून टाकले. पण खरे तर मी ही भूमिका स्वीकारलीच नव्हती.

'इकबाल चा अनुभव सांगताना श्रेयस म्हणाला, या चित्रपटाचे शूटिंग आंध्र प्रदेशातील तेनाली गावात झाले. तिथे गिरीश कर्नाड व नसरूद्दीन शाह हे दोन दिग्गज माझ्यासमोर होते. नसीरजींची मला भीती वाटत होती. पण ते माझ्याजवळ येऊन म्हणाले तू रंगभूमीवर काम केलंय. तुला काय वाटतं ते बिनधास्त बोल. आणि जर तुला नागेशची भीती वाटत असेल तर काळजी करू नकोस, मी आहे ना!