शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2022 - 2023
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (09:04 IST)

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, सोमवारपासून सुरुवात होत असून, 'पेगॅसस' हेरगिरी तंत्रज्ञानाच्या खरेदीवरून दोन्ही सभागृहांमधील कामकाज पुन्हा वादळी ठरण्याची शक्यता आहे. इस्रायलशी झालेल्या शस्त्रात्र खरेदी करारामध्ये 'पेगॅसस' तंत्रज्ञान खरेदीचाही समावेश असल्याच्या 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तातील दाव्यामुळे नवा वाद उफाळला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जात असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. 2 ते 11 फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे.

राज्यसभेचे कामकाज सकाळी 9 ते दुपारी 2 आणि लोकसभेचे कामकाज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी, 31 जानेवारी रोजी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जाईल. 1फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील.