गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (15:49 IST)

पर्सनल फायनान्सः गुंतवणूक करताना जोखीम कशी ओळखायची?

प्रत्येक गुंतवणुकीत एका मर्यादेपर्यंत जोखीम असतेच. मुदत ठेव योजनेतून आपल्याला निश्चित परतावा मिळत असला तरी त्यातही एक जोखीम असतेच.
 
एफआरडीआय कायदा 2017 नुसार ज्या ठेवीदारांच्या तोट्यात गेलेल्या बँकेत ठेवी आहेत त्यावरही त्यांना पाणी सोडावं लागू शकतं.
 
अर्थात अशी स्थिती येऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक काही उपाययोजना आधीपासूनच करते. त्यासाठी मार्गदर्शक सूचना असल्या तरीही त्यातून जोखीम पूर्णपणे टाळता येत नाही.
 
कोणत्याही गुंतवणुकीत दोन प्रकारच्या जोखमी असतात. पहिली म्हणजे सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतशीर आणि दुसऱ्या असतात त्या त्यापलिकडच्या ज्यांना अनसिस्टमॅटिक म्हणतात.
 
सिस्टमॅटिक जोखीम
ही जोखीम फक्त गुंतवणुकीत नाही तर देवघेवीच्या प्रत्येक व्यवहारात असते. जसं की तुम्हाला आठवत असेल कोव्हिड साथीच्या काळात अगदी काही दिवसांच्या काळात सेन्सेक्स 30 टक्क्यांनी घसरला होता. तसेच तेव्हा काही महत्त्वाच्या क्षेत्रांतील कंपन्यांचे समभाग (शेअर्स) अगदी तळाला गेले होते.
 
गुंतवणुकदारांना आपलं एकूणच भविष्य अनिश्चित वाटणारी भीती याला कारणीभूत होती. गुंतवणुकदारांनी बाजारातून बाहेर पडायला सुरुवात केली, गुंतवणुकीची तेव्हाची जी रक्कम पदरात पडेल ती घेऊन त्यांनी पैसे काढून घेतले होते.
 
अशा प्रकारची जोखीम गुंतवणुकीच्या प्रत्येक व्यवहारात असते. एखाद्याने आपल्या पोर्टफोलिओत कितीही बदल केले तरीही एक ठरावीक अशी जोखीम कोणालाच टाळता येत नाही.
 
जगभरातील घडामोडी किंवा रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेले बदलसुद्धा सिस्टमॅटिक रिस्कमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. अशा बदलांमुळे प्रत्येक क्षेत्रात चढ-उतार संभवतात.
 
अनसिस्टमॅटिक जोखीम
ही जोखीम फक्त गुंतवणुकदारांच्या निर्णयांवर अवलंबून असते. यावर बाजारातील मोठमोठ्या घटना-गोष्टींचा याच्याशी संबंध नसतो.
 
यासाठी एक उदाहरण पाहू. समजा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स घेतले आहेत. या बँकेच्या कामगिरीमुळे तुमच्या शेअर्सचे मूल्य कमी झाले तर तुम्ही तुमचे पैसे गमावू शकता. याला अनसिस्टमॅटिक जोखीम म्हणतात.
 
त्यामुळे गुंतवणुकदार आपल्या पोर्टफोलिओत वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांचा समावेश करुन ही जोखीम कमी करू शकतो.
 
इथं म्युच्युअल फंडस जास्त संरक्षण देतात. म्युच्युअल फंडामुळे गुंतवणुकदारांचा अनसिस्टमॅटिक रिस्कशी थेट संबंध थोडा कमी होतो. अनेक म्युच्युअल फंड कंपन्या त्यांच्या जाहिरातींमध्ये याचा उल्लेख करत असल्याचं तुम्ही पाहिलं-वाचलं असेल.
 
गुंतवणुकदार किती जोखीम घेऊ शकतो याआधी कोणत्या जोखमी टाळता येणं अशक्य आहे हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे अतिजोखीम असलेल्या गुंतवणुकीत पैसे लावू नयेत.
 
त्यामुळे इथं अतिजोखीम म्हणजे हायरिस्क गुंतवणूक वगळून त्यानंतरच्या गुंतवणुकींमधील खर्चांचा विचार करू.
 
विमा खर्च
पर्सनल फायनान्सचा विचार केला तर आरोग्य आणि जीवन विमा या गुंतवणुकीपेक्षा जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
 
मुलांचे शिक्षण
विम्याप्रमाणेच मुलांचे शिक्षण हा सुद्धा एक खर्चाचा विषय आहे. हा खर्चही आपण टाळू शकत नाही. हा खर्च करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वेळीच नियोजन केलं पाहिजे.
 
मुलं 17-18 वर्षांची होईपर्यंत व्यक्तीकडे हातात रोख रक्कम असली पाहिजे.
 
त्यामुळे या काळानंतर ज्या जास्त परतावा मिळेल अशा गुंतवणुकी तुम्ही केल्या असतील त्या या मुलांच्या शिक्षणाच्या उद्दिष्टासाठी अनुकूल ठरत नाहीत. म्हणजेच या महत्त्वाच्या वेळी पैसे उपलब्ध असणं आवश्यक आहे.
 
निवृत्तीनंतरचे नियोजन
पर्सनल फायनान्समध्ये सर्वात दुर्लक्षित मुद्दा कोणता असेल तर तो निवृत्तीनंतरच्या नियोजनाचा. परंतु त्याचं नियोजन शक्य आहे. जितक्या लवकर हे नियोजन सुरू कराल तितकं चांगलं.
 
यामधील जोखमीचा आता विचार करू. त्यासाठी गुंतवणुकदारांचं तीन वयोगटात विभाजन करू. जर सर्व खर्च केल्यानंतर त्यांच्याकडे 50,000 रुपये प्रत्येक महिन्याला राहात असतील तर त्या तीन वयोगटातील लोक जोखीम सांभाळून कसं नियोजन करू शकतात हे पाहू.
 
वय 30 वर्षांपेक्षा कमी असलेला गट
या गटासाठी आपण आधी विम्याचा खर्च बाजूला काढू. त्यासाठी खाली एक अंदाजे खर्चाची एक तालिका दिली आहे. विम्यासाठी या गटातील लोकांनी 3000 रुपये काढून ठेवावेत. म्हणजे त्यांच्या 50 हजारातील आता 47,000 रुपये त्यांच्याकडे पुढील गुंतवणुकीसाठी असतील.
 
यापुढचं त्यांचं लक्ष्य असेल मुलांचं शिक्षण. एकूण परिस्थिती पाहाता 15 वर्षांनी यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी 50 लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो. त्यासाठी त्यांना प्रत्येकवर्षी 1.5 लाख रुपये बचत करावे लागतील. म्हणजे प्रत्येक महिन्याला 12,000 पेक्षा जास्त रक्कम यांना बाजूला काढावी लागेल.
 
तसेच वयाच्या तिशीनंतर या गटातील लोकांनी 2 कोटींचं निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी नियोजन केलं पाहिजे. त्यासाठी त्यांना वर्षाला 1.2 लाख रुपये बाजूला ठेवावे लागतील.
 
हे झाल्यावर उरलेल्या निधीतला पैसा अतिजोखमीच्या योजनांत गुंतवता येईल. या गटातील व्यक्ती 25,000 पर्यंतची रक्कम अतिजोखमीच्या योजनांत गुंतवू शकतात.
 
प्रकार वार्षिक खर्च (अंदाजे) मासिक खर्च
1 कोटी जीवनविमा रु. 20,000 रु. 1,700
5 लाख आरोग्यविमा रु. 15,000 रु. 1,250
मुलांचे शिक्षण रु. 1,50,000 रु. 12,500
निवृत्ती रु. 1,20,000 रु.10,000
एकूण रु. 3,05,000 रु. 25,450
30 ते 40 वयोगट
खालील तालिकेनुसार या गटातील लोकांनी महिन्याला 3500 रुपये विम्यासाठी द्यावेत. त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षणासाठीही यांना जरा जास्त पैसे काढावे लागतील. कारण वय वाढत असते आणि कमाई करण्याचा काळ कमी राहिलेला असतो. त्यामुळे जास्त पैसे यासाठी ठेवावे लागतात. त्या सर्वाचा विचार करता या लोकांना जोखमीच्या गुंतवणुकांसाठी 17,000 रुपये देता येतील.
 
प्रकार वार्षिक खर्च (अंदाजे) मासिक खर्च
1 कोटी जीवनविमा रु. 25,000 रु. 2,083
5 लाख आरोग्यविमा रु. 18,000 रु. 1,500
मुलांचे शिक्षण रु. 2,00,000 रु. 16,667
निवृत्ती रु. 1,50,000 रु. 12,500
एकूण रु. 3,93,000 रु. 32,750
40 च्या वरील वयोगट
या गटातील लोकांना विमा, मुलांचे शिक्षण, निवृत्तीनंतरचे नियोजन यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. खालील तक्त्यानुसार त्यांना जोखमीच्या योजनांसाठी फक्त 8,000 रुपये उरतात. त्यामुळे लवकर नियोजन सुरू करणे आणि दीर्घकाळासाठी ते करणं जास्त फायद्याचं असतं हे लक्षात येतं.
 
प्रकार वार्षिक खर्च (अंदाजे) मासिक खर्च
 
1 कोटी जीवनविमा रु. 35,000 रु. 2,917
5 लाख आरोग्यविमा रु. 25,000 रु. 2,083
मुलांचे शिक्षण रु. 2,50,000 रु. 20,833
निवृत्ती रु. 2,00,000 रु. 16,667
एकूण रु. 5,10,000 रु. 42,500
 








Published By- Priya Dixit