जगातील सर्वात महागडे गुलाब
व्हॅलेंटाइन डे साठी बर्याच जणांनी आत्तापासून तयारी सुरु केली आहे. दरवर्षी 14 फेब्रुवारीला येणार्या व्हॅलेंटाइन डे ला प्रमीयुगलांकडून गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे त्यांचे भावही वधारलेले असतात. महाग असली तरी त्या दिवशी ती खरेदी केली जातात. मात्र तुम्हाला जगातील महागड्या गुलाबाच्या फुलाबाबत माहिती आहे का?
या गुलाबाची किंमत एवढी प्रचंड असते की तो विकत घेताना तुम्ही दहावेळा विचार कराल. त्याची किंमत एक कोटी पौंड म्हणजे सुमारे 90 कोटी रुपये आहे. जुलियट रोज नावाने ओळखले जाणारे हे गुलाबाचे फूल अतिशय दुर्मीळ समजले जाते आणि ते मोठ्या मुश्किलीने फुलते. खरे म्हणजे या गुलाबाचा संकर करणारा प्रसिद्ध फूलतज्ज्ञ डेव्हिड ऑस्टिन याने अनेक गुलाबांपासून त्याची निर्मिती केली होती.
पोलन नेशन नावाच्या अहवालानुसार एप्रिकोट हुइड हायब्रिड नावाची ही दुर्मीळ प्रजात तयार करण्यात त्याला तब्बल 15 वर्षांचा कालावधी लागला होता. 2006 मध्ये त्याने या गुलाबाच्या फुलाची 90 कोटी रुपयांना विक्री केली होती. डेव्हिड ऑस्टिनमुळे प्रसिद्ध झालेल्या या गुलाबाची किंमत आता थोडी कमी झाली आहे.
ते आता 26 कोटी रुपयांपर्यंत खरेदी केले जाऊ शकते. अर्थात अजूनही ते जगातील सर्वात महागडे गुलाबाचे फूल आहे. त्याला थ्री मिलियन पाउंड रोज असेही म्हटले जाऊ लागले आहे.