काँग्रेस - राष्ट्रवादीचे सरकार हद्दपार करा : गडकरी
छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर मतांचा जोगवा मागणारे काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते वास्तविक पाहता लक्ष्मी दर्शनासाठीच्या खटाटोप करीत असतात. अशांना हद्दपार करून राज्याच्या विकासासाठी भाजपला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भाजपचे निलंगा विधानसभेचे उमेदवार संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या प्रचारार्थ निलंगा येथील जुने मार्केट यार्ड येथील विराट जाहीर सभेत ते बोलत होते. अध्क्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे होते. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार रूपाताई पाटील-निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव, लातूरचे उमेदवार शैलेश लाहोटी, पाशा पटेल यांची उपस्थिती होती.
यावेळी गडकरी म्हणाले, राज्यावर या आघाडी सरकारने 3 लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. 50 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हीच आता महाराष्ट्राची ओळख बनली आहे. देशात गरिबी हटाव असा नारा इंदिरा गांधींपासून राहूल गांधीसुध्दा देत आहेत. पण या साठ वर्षात कोणत्याही मुस्लीम, दलित, अदिवासी समाजाची गरिबी हटली नाही. या उलट काँग्रेस नेते व सहकार्यांची गरिबी हटली आहे. भूकबळी, बेरोजगारी, महागाई हे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारचे अपत्ये आहेत.
साठ वर्षात काँग्रेस नेत्यांकडे विकासाची दृष्टी नव्हती. म्हणून या देशाचा विकास झाला नाही. काँग्रेसची सत्ता असताना महागाईचा दर 9.9 टक्केच्या जवळ होता. तो मोदी सरकारच्या काळात 4 टक्केच्या जवळ पोहोचला आहे. या राज्यात शेतकर्यांना 24 तास वीज, प्रत्येकाच्या हाताला काम, शेतकर्याच्या शेतात पाणी देणार, असे त्यांनी सांगितले.
यापुढे शेतकर्यांना युरिया खत 50 टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करणचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी केंद्राबरोबर भाजपचे सरकार राजत असणे गरजेचे आहे. तसाठी लातूर जिल्ह्यातील भाजपचे सर्वच उमेदवार विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संभाजी पाटील यांना मताधिक्याने निवडून दिले तर त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील प्रमुख रस्ते काँक्रिटने चार पदरी करण्यासाठी प्रयत्न असणार आहे. प्रास्ताविक संभाजी पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय दोरवे यांनी केले.