'भाजपने बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा विश्वासघात केला'
भारतीय जनता पक्षाने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा विश्वासघात केल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. भाजपने शिवसेनेसोबतची 25 वर्षे जुनी मैत्री तोडून पाप केले आहे. फलटणमध्ये शिवसेनेचे उमेदवार तासगांवकर यांच्या प्रचारसभेत संबोधित केले.
बाळासाहेबांनी मोठ्या विश्वासाने भाजपसोबत 25 वर्षांपूर्वी मैत्री केली होती. परंतु केंद्रात सत्ता आल्यानंतर, भाजपचे अच्छे दिन आल्यावर शिवसेनेला सोडून देण्याची भाजपची वृत्ती चुकीची असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. गोध्रा हत्याकांडात नरेंद्र मोदींचं नाव आल्यानंतर त्यांच्या पाठिशी उभे राहिलेले हे बाळासाहेबच होते, याची आठवणही उद्धव यांनी करुन दिली.
भाजपला संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहे. म्हणूनच भाजपने युती तोडली. परंतु शिवसेना महाराजांच्या महाराष्ट्र तुकडे पाडण्याचे पाप करु देणार नाही, असेही उद्धव यांनी सांगितले.
सही करता येते हे दाखवण्याचा खटाटोप पृथ्वीराज चव्हाण करत असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. अजित पवारांनी शेतकर्यांची क्रूर थट्टा केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारचा समाचार घेतला.