शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: कोल्हापूर , सोमवार, 6 ऑक्टोबर 2014 (15:02 IST)

शिवरायांचे गुण पवारांमध्ये नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये शिवरायांचे गुण कधीच येणार नाहीत, असे सांगून महाराष्ट्राचे कृषिमंत्री व केंद्रीयमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेसाठी काहीही केले नसल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे झालेल्या  भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत केली आहे.
 
पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगतात. परंतु त्यांचे शासनकर्त्यांचे गुण पवार यांच्याजवळ मुळीच नाहीत, असा टोमणा मोदी यांनी लगावला आहे. पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये सुमारे 3700 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यावेळी पवार हे का मूग गिळून बसले होते, असा सवाल मोदी यांनी केला आहे.
 
शिवरायांचे नाव घेऊन राज्यकारभार करण्याचा पवार व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा दावा साफ खोटा होता. शिवरायांच्या   शिकवणुकीविरुध्द कारभार करून त्यांनी केवळ श्रीमंताचे भले केले आणि गरिबाकडे साफ दुर्लक्ष केल्याबद्दल मोदी यांनी खंत व्यक्त केली आहे.
 
भाजपवर पवार हे जात्यंध पक्ष असल्याची टीका नेहमी करीत असतात. परंतु त्यांनीच जातीवादी पक्षाशी युती केल्याची याअगोदर कैक उदाहरणे आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपला जातीवादी म्हणून हिजविण्याचे काहीही कारण नाही, असा चिमटा मोदी यांनी पवार यांना उद्देशून घेतला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपची राज्यात सत्ता येणार हे निश्चित आहे. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या   पूर्वीच्या सरकारच्या भानगडी भाजपचे संभाव्य सरकार बाहेर काढेल आणि दोषींना कायदेशीर मार्गाने शिक्षा होण्यासाठी पाऊले उचलेल, असा इशारा मोदी यांनी दिला आहे.