रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. सावरकर
Written By वेबदुनिया|

सावरकर आणि सुधीर फडके

सौ. भारती जितकर

ND
'वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी तब्येतीने जेव्हा दगा द्यायला सुरूवात केली. तेव्हा देवाला मी एकच साकडं घातलं की '' हा चित्रपट पूर्ण होईपर्यंत मला आयुष्य लाभो.'' आज चित्रपट पूर्ण झालय्‌. मी पूर्ण समाधानी आहे आणि परमेश्वराला सांगतोय्‌ ... आता मला खुश्शाल ने... मी केव्हाही तयार आहे... 'वीर सावरकर' हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर एका मुलाखतीत सुधीर फडके म्हणाले होते.

'वीर सावरकर' चित्रपटाच्या रूपात सुधीर फडके ऊर्फ बाबजींची कित्येक वर्षांची मनिषा पूर्ण झाली होती. या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यानच्या असंखय आठवणी त्यांच्या मनात दाटून आल्या होत्या. एकीकडे चित्रपट पूर्ण झाल्याची कृतार्थता, तर दुसरीकडे 'काही राहून तर गेले नाही ना', अशी भावना त्यांना अस्वस्थ करीत होती. 'वीर सावरकर' या चित्रपटासाठी गेली पंधरा वर्षे जे जे भोगलं, त्याचं आज चीज झाल्यासारखं वाटतंय्‌....''

चित्रपटाच निर्मितीदरम्यानचे अनेक बरेवाईट प्रसंग या मुलाखतीच्या वेळी त्यांच्या डोळ्यांपुढून सरकत होते....

विनायक दामोदर सावरकर या ओजस्वी व्यक्तिमत्त्वाने राष्ठ्रासाठी केलेले समर्पण हेतुतः अंधारात ठेवलं गेलं, याबद्दल बाबूजी खंत व्यक्त करीत होते... सावरकरांचं तत्वज्ञान नव्या पिढीला माहित असू नये, याची खबरदारीच काही मंडळी घेत होती. सावरकरांवरील क्रमिक पुस्तकातील धडे, विविध लेख दिसेनासे झाले आहेत. सावरकर आणि त्यांच्या तत्त्वज्ञानावरील अन्याय या चित्रपटाद्वारे दूर होईल, याबद्दल मी निःशंक आहे...

स्वातंत्र्यवीरांचं अजोड कर्तृत्व भावी पिढीला समजावं, या हेतूनेच मी या चित्रपटाची निर्मिती केली. गेली काही वर्षे या चित्रपटाची निर्मिती हाच माझा एकमेव अजेंडा राहिला. यासाठी मी सोडलं. गाण्याचे कार्यक्रम केले, ते केवळ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसे उभारण्यासाठीच. चित्रपटाला स्वातंत्ररीत्या पुरेसा पैसा उभारता आला नाही. तेव्हा लोकांना अपील केलं. सर्वांच्या एकत्र प्रयत्नांतून आज हा चित्रपट उभा राहिलाय्‌ आणि म्हणूनच तो सर्वस्वी लोकांचा आहे... ही भावना त्या मुलाखतीतून व्यक्त झाली...

या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी बाबूजींना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. अनेकदा टीकेची झोड उठली. पण टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याच्या फंदात बाबूजी केव्हाच पडले, नाहीत. याबद्दल बोलताना त्यांचा स्वर हळवा झाला होता... चित्रपटाच्या निर्मितीला जसा उशीर होत गेला, तसा आरोपांचा धुरळा वाढत गेला. वैयक्तिक टीकेला तर पावलागणिक तोंड द्यावं लागलं. तरीही... त्यांनी संयम पाळला. कारण एकदा वादावादीला सुरूवात झाली, की त्याला अंत नसतो, अशी त्यंची भावना होती. आता हा चित्रपटच या टीकेला सडेतोड उत्तर देईल.... असे बाबूजी सांगत होते. आणि झालेही तसेच.

स्वातंत्र्यवीरांच्या अजोड कर्तृत्वाचा परिचय जगाला करून देण्यासाठी सुरू केलेला हा 'यज्ञ' चित्रपटसृष्ठीचे अद्‍भुत् वाण ठरला आहे. वीर सावरकरांवरला हा चित्रपट बाबूजींनी 'याचि देही, याचि डोळा' पाहिला, आणि एक विराट स्वप्न पाहिलेल्या एका राष्ट्रनिष्ठ गायकाच्या ललाटी यशाचा मानबिंदू कोरला गेला. या चित्रपटात त्यांची इतकी भावनिक गुंतवणूक झाली होती की, ही कलाकृती पूर्ण होईपर्यंत आपण कार्यक्षम राहणार, हा विश्वास आणि इच्छाशक्ती त्यांना या कामाने दिली. या चित्रपटाद्वारे राष्ट्रनिर्मितीसाठी झटणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर या 'शक्ती' चा परिचय करून देण्याची संधी त्यांना लाभली. ती नव्या पिढीला पटो अथवा न पटो, मात्र त्याआधी सावरकर त्यांना कळावेत. इतकीच त्यांची अपेक्षा होती... इतकीच!