शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: शनिवार, 8 जुलै 2023 (13:06 IST)

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातले बडवे कोण आहेत? या घराण्याचा 'हा' इतिहास तुम्हाला माहितीये?

pandharpur
मानसी देशपांडे
 Who is Badve in Vitthal Temple of Pandharpur “माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे.”
 
“माझी माझ्या दैवताला विनंती आहे, आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की अजूनपण आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा. विठ्ठलाने आम्हाला द्यावा.”
 
अनुक्रमे राज ठाकरे आणि अजित पवार यांची त्यांचा पक्ष आणि काकांना सोडतानाची ही वाक्य आहेत.
 
एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी करताना आणि आता छगन भुजबळ यांनी अजित पवारांची साथ देतानाही ‘विठ्ठलाभोवतीचे बडवे’ हा उल्लेख केला.
 
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचा सातत्याने उल्लेख होतो, ते बडवे कोण आहेत? पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात प्रचलित असलेली बडव्यांची परंपरा काय होती आणि ती कशी बंद झालेली आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
 
पंढरपुरातील बडवे कोण? ही परंपरा काय होती?
वारकरी संप्रदाय आणि परंपरा यांच्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार बडवे हे ब्राम्हण समाजातील एक कुळ आहे. विठ्ठल मंदिराचं व्यवस्थापन मुख्य पुजारी असलेल्या बडवे समाजाकडे, तर रुक्मिणी मंदिराचं व्यवस्थापन उत्पात समाजाकडे होतं. गेल्या अनेक शतकांपासून ही परंपरा सुरु होती.
 
“ही परंपरा शेकडो वर्षांपासूनची आहे. ते नेमके कसे आले त्यांना कुणी नेमलं याबद्दलची अचूक माहिती सांगता येणार नाही. परंतू अगदी ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांच्या काळापासून मंदिराचं व्यवस्थापन ते करत होते. ही ब्राम्हण समाजातली पोटजात म्हणता येणार नाही. पंढरपूरातलं ब्राम्हण समाजातील एक ते कुळ आहे.
 
मंदिर त्यांच्या ताब्यात असायचं, त्यामुळे मंदिरात कुणाला प्रवेश द्यायचा, कुणाला सोडायचं, कुणी पुजा करायची हे सगळं ते ठरवायचे,” असे लेखक आणि संत साहित्याचं अभ्यासक सदानंद मोरे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
 
ज्येष्ठ पत्रकार आणि रिंगण अंकाचे संपादक सचिन परब यांच्या सांगण्यानुसार, पंढरपुरातल्या सगळ्याच पुजा-यांना सरधोपटपणे बडवे म्हटलं जातं. पण त्यांच्यातंही बरेच प्रकार आहेत. विठ्ठलमंदिराची सगळी व्यवस्था बघणं, हे बडव्यांचं परंपरागत काम होतं. त्यात महत्त्व मूर्तीच्या संरक्षणाला होतं.
 
“विठोबाची पूजा करणारे ते बडवे. रखुमाईचे ते उत्पात . त्यातले बडवे स्वत: पूजा करत नव्हते. त्यासाठी सेवेधारी होते आणि बडवे त्यांचे इनचार्ज, मुकादम. सेवेधा-यांमध्येही सात प्रकार. पुजारी विठोबाला स्नान घालायचे, कपडे नेसवायचे आणि गंध - अत्तर लावत प्रत्यक्ष पूजा करायचे. बेणारे पूजेचे मंत्र म्हणायचे. हरिदास भजन म्हणायचे. डिंगरेंचं काम सजलेल्या देवाला चांदीचा आरसा दाखवणं. दिवटे यांचं काम शेजारतीच्या वेळी दिवटी पेटवून धरणे. पूजा होताना डांगे चांदीचा दंड धरून उभे असत. परिचारक स्नानासाठी पाणी गरम करून आणतात आणि आरती तयार करतात."
 
रखुमाईकडे हे सगळं एकटे उत्पात करतात. फक्त एक गुरू मंत्र म्हणायला असतात. अर्थातच ही सगळी मंडळी जातीने ब्राम्हण. सकाळी दरवाजे उघडण्यापासून ते रात्रभर मंदिरात थांबण्यापर्यंत, नैवेद्यापासून पूजासामग्री आणि साज-या होणा-या उत्सवांपर्यंत सगळी व्यवस्था बडव्यांकडे होती.
 
त्याबदल्यात बडव्यांना स्वत: पूजा न करताही देवापुढच्या दक्षिणेचा अधिकार मिळाला होता आणि मंदिराची कथित मालकी होती,” असं सचिन परब यांनी सांगितलं.
 
बडव्यांविरोधात तक्रारी
संत चोखोबांचा साधारणपणे सातशे वर्षांपुर्वीचा एक अभंग आजही प्रसिद्ध आहे. त्यात चोखोबा म्हणतात,
 
"धांव घाली विठू आता चालू नको मंद। बडवे मज मारिति ऐसा काही तरि अपराध ॥"
 
यावरुन बडवे हे तेंव्हापासून चर्चेत असावेत असं दिसतं. आत्ताच्या राजकीय गदारोळात विठ्ठलाभोवतीचे बडवे ही उक्ती वापरली जाते.
 
1960 च्या दशकानंतर विठ्ठल मंदिरातील बडव्यांविरोधातल्या तक्रारींची धार तीव्र झाली. या तक्रारी निरनिराळ्या स्वरुपाच्या होत्या.
 
'दिव्य मराठी' या दैनिकातील धनंजय रानडे यांनी लिहिलेल्या एका विशेष लेखामध्ये त्यांनी त्याचा उहापोह केलेला आहे.
 
"पंढरपूर अखिल मराठी मनाचे श्रद्धास्थान असल्याने दर्शनास नेहमीच गर्दी होत असे. आजही होते. परंतु मंदिरामधून दर्शनाबाबत व व्यवस्थेबाबत भाविकांच्या सातत्याने तक्रारी येत. या तक्रारींमध्ये सतत होणा-या महापूजांमुळे भाविकांना दर्शनासाठी तिष्ठत थांबावे लागत असे, ही तक्रार मुख्य होती. श्रींच्या यजमान महापूजेचे उत्पन्न पुजारीवर्गास मिळत असल्यामुळे दिवसातून अनेक वेळा महापूजा होत. पूजेच्या काळात दर्शनवारीतील भाविकांना ताटकळत थांबावे लागे.
 
याशिवाय वारीच्या कालावधीत दिवसाचे व्यवस्थापन पोलिसांकडे असे, त्या वेळी दर्शनवारीने येणा-या भाविकांचे दर्शन होई, तर रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत बडवे, पुजारी आदींना त्यांच्या यजमानास दर्शनास नेण्याची मुभा असे. त्यामुळे रात्रभर बडव्यांमार्फत जाणा-या लोकांचे दर्शन सुरू असे. याशिवाय प्रत्यक्ष दर्शन घेताना, तीर्थ देताना वा परिवार देवतांचे दर्शन घेताना दक्षिणा मागणे, तसेच प्रसाद देण्यासाठी दक्षिणा मागणे याबाबतही तक्रारी होत्या," असं या लेखामध्ये म्हटलेलं आहे.
 
लेखक आणि अभ्यासक सदानंद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार साठच्या दशकात वारकरी संप्रदायातले लोक पुढे आले. त्यांनी वारकरी महामंडळ म्हणून एक संघटना काढली आणि त्या महामंडळाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
 
“त्यामध्ये मंदिराचं व्यवस्थापन बडव्यांकडे ठेऊ नये अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर सरकारने न्यायमुर्ती नाडकर्णी यांचं कमीशन नेमलं,” असं सदानंद मोरे यांनी सांगितलं.
 
महाराष्ट्र सरकारने 1968 सालामध्ये बी. डी. नाडकर्णी (निवृत्त जिल्हा न्यायाधीश) यांची एकसदस्यीय चौकशी आयोग म्हणून नियुक्ती केली. या आयोगाने आपला अहवाल, दिनांक 2 फेब्रुवारी 1970 रोजी शासनाला सादर केला. यामध्ये पुजारी वर्गाचे अधिकार नष्ट करून मंदिराबाबत स्वतंत्र कायदा करून समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली.
 
त्यानुसार तेव्हाच्या महाराष्ट्र सरकारने ज्यामध्ये बॅ. ए. आर. अंतुले हे विधी व न्यायमंत्री होते, ठराव मांडून पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 पारित केला.
 
“नाडकर्णी आयोगाने अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. लेखी काही निवेदनं घेतली. त्यानंतर सरकारला शिफारस केली की, यांच्याकडून व्यवस्थापन काढून घ्या. त्याप्रमाणे सरकारने कायदा केला. त्याविरोधात बडवे मंडळी कोर्टात गेली. सुप्रीम कोर्ट पर्यंत लढली. कोर्टातला निर्णय त्यांच्या विरोधात लागला. तेव्हापासून व्यवस्थापन त्यांच्याकडे नाही,” असं सदानंद मोरे यांनी सांगितलं.
 
'बडवे हटाओ' चळवळ
अधिनियमाला बडव्यांनी कोर्टात आव्हान दिलं. 2014 साली सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. पण त्याआधी जवळपास 40 वर्ष कोर्टांमध्ये लढाई सुरु होती. हायकोर्टाच्या निर्णयानंतर बडवे सुप्रीम कोर्टात गेले आणि तिथे ही केस पडून राहिली.
 
त्यादरम्यान बडवे हटाओ चळवळ राबवण्यात आली आणि ती तेव्हा खूप गाजली. डॉ. भारत पाटणकर या चळवळीच्या अग्रभागी राहिले होते.
 
“सुप्रीम कोर्टामध्ये ती केस अनेक वर्ष पडून होती. त्याकडे कुणी लक्ष देत नव्हतं. इकडे मात्र बडव्यांचा सगळा व्यवसाय सुरु होता. त्यामध्ये त्रास होत होता. या सगळ्या प्रकारात लुबाडणूक एका बाजूला आणि पेटीत येणारी रक्कम ही बडवे आणि उत्पातांच्या घरी जात होतं. या सगळ्या पार्श्वभुमीवर वारकरी संप्रदायातली काही मंडळी आणि आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीतली काही मंडळी मिळून एकत्र आलो. आम्ही ठरवलं की, महाराष्ट्र सरकारने चांगल्या प्रकारे सुप्रीम कोर्टात ती केस लढवली पाहीजे.
 
तज्ञ वकील लागले तर द्यायला पाहिजेत. म्हणून मग आम्ही आंदोलन सुरु केलं. वाखरीला बेमुदत ठिय्या आंदोलन केलं. देवळाच्या जवळ मोर्चा काढला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते रेस्ट हाऊसला आले होते. तिथे आम्ही आधीच जाऊन बसलो होतो. आम्ही ठरवलं होतं की त्यांना महापुजेला जाऊ देणार नाही. त्यांनी तिथे आमच्या सोबत बैठक घेतली,” असं भारत पाटणकर यांनी केलं
 
सुप्रीम कोर्टाने जानेवारी 2014 मध्ये बडव्यांच्या विरोधात निर्णय दिला.
 
डॉ. भारत पाटणकर सांगतात की, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 17 जानेवारी 2014 रोजी बडव्यांकडून मंदिराचा ताबा घेण्यात आला
 
मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींचे उपोषण
विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, अठरा पगड जाती-जमातींचा हा देव म्हणून ओळखला जातो. परंतु या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. त्यांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी भारताचं स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात आलेलं असताना लढा दिला. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींना उपोषणही करावं लागलं.
 
साने गुरुजींनी दिलेल्या या लढ्यावर 'साधना' प्रकाशनातर्फे ‘साने गुरुजींचा पंढरपूर मंदिर प्रवेश लढा’ हे पुस्तकही प्रकाशित करण्यात आलेलं आहे.
 
या पुस्तकाचा सारांश देताना मोजक्या शब्दात साने गुरुजींनी तेव्हा दिलेल्या लढ्याची माहिती देण्यात आलेली आहे.
 
‘भारताचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आले तेव्हा, साने गुरुजींनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठीचा पहिला प्रतिकात्मक कार्यक्रम म्हणून 'अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठीही खुले व्हावे, अन्यथा मी आमरण उपोषण करीन' अशी घोषणा केली. आणि जानेवारी ते एप्रिल 1947 या चार महिन्यांत जनजागृती करण्यासाठी झंझावती दौरा केला. त्या काळात एकट्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी 400 पेक्षा अधिक सभा घेतल्या. तेव्हा गावोगावची 300 मंदिरे खुली झाली. मात्र पंढरपुरच्या बडव्यांनी दाद दिली नाही, म्हणून 1 मे 1947 रोजी गुरुजींनी उपोषण सुरु केले. मग दहा दिवसांच्या उपोषणानंतर ते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले झाले,’ असं पुस्तकाच्या सारांशात म्हटलेलं आहे.
 
राज ठाकरे ते छगन भुजबळ- बडव्यांचा उल्लेख
शिवसेना सोडल्यानंतर 2006च्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. तिथून परतल्यानंतर राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006ला मुंबईतल्या यशवतंराव चव्हाण सेंटरमध्ये एक पत्रकार परिषद बोलवली. राज ठाकरे काय घोषणा करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
 
अखेर राज ठाकरे यांनी त्यांच्या नव्या पक्षांची घोषणा केली. पक्षाचं नाव आणि झेंडा त्यांनी जाहीर केला, ज्यात भगव्याबरोबरच पांढरा, हिरवा आणि निळ्या रंगांचा समावेश होता.
 
"माझ्या विठ्ठलाभोवती बडव्यांची गर्दी जमा झाली आहे," हे राज ठाकरे यांचं त्यावेळचं वाक्य फार गाजलं होतं. यावेळी राज यांनी 18 मार्च 2006ला पक्षाची पहिली सभा शिवाजी पार्कमध्ये घेण्याची घोषणा केली.
 
यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात एक मोठा गट शिवसेनतून बंड करुन बाहेर पडला. त्यावेळी बंडात सहभागी असलेल्या संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाने एक पत्र लिहीलं होतं. या पत्राला रिट्वीट करताना एकनाथ शिंदे यांनी ही आमदारांची भावना असल्याचं म्हटलं होतं.
 
त्यामध्ये संजय शिरसाट यांनी लिहिलं होतं की, “आमदार म्हणून बंगल्यावर प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच सो कॉल्ड (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. ”
 
नुकतंच राष्ट्रवादीमध्ये झालेल्या उलथापालथीनंतर बांद्रा इथल्या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी बडव्यांचा उल्लेख केला.
 
“'शरद पवार यांच्याबद्दल आजही आमच्या मनात प्रेम आहे. ते आमचे विठ्ठल आहेत. पण विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. त्यामुळे साहेब तुम्ही बडव्यांना दूर करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
यामुळे बडवे हा शब्द परत चर्चेत आला.
 
'तुमच्या स्वार्थासाठी आमची बदनामी का?'
वारंवार होत असलेल्या बडवे समाजाच्या बदनामी नंतर बडवे समाजाने नेत्यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
 
“आम्ही कधीही आमच्या विठ्ठलाला सोडले नाही त्याच्यासोबत गद्दारी केली नाही. मात्र तुम्ही स्वार्थासाठी विठ्ठलाला सोडून गेले. आम्ही शासनाच्या एका आदेशावर आमच्या शेकडो वर्षाच्या परंपरा, हक्क सोडून विठ्ठल मंदिरातून बाहेर आलो पण आमच्या मनात आजही तोच विठ्ठल आहे.
 
तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही गद्दारी करणार आणि आम्हाला का बदनाम करता? अशा राजकीय नेत्यांच्या वक्तव्याने मनाला खूप त्रास होतो,” असं पंढरपुरातील श्रीकांत महाजन बडवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
याचसोबत लोकांसमोर आमचा इतिहास ज्या प्रकारे मांडला जातोय, तो तसा नाही असाही दावा बडवे समाजाकडून करण्यात आलेला आहे.
Published By -Smita Joshi