गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2019 (11:15 IST)

मोदी पुन्हा निवडून आले तर काश्मीर प्रश्नी तोडगा शक्य - इम्रान खान

काश्मीरच्या वादग्रस्त मुद्यावरून भारताशी शांततामय मार्गाने चर्चा होणं आवश्यक आहे. हा प्रश्न धगधगता ठेऊन चालणार नाही. आशियाई उपखंडाच्या दृष्टीने शांततामय मार्गाने वाटचाल महत्त्वाची आहे, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितलं.
 
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू असलेल्या इम्रान खान यांनी आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतली. आण्विक अस्त्रधारी असणारे हे शेजारी देश एकमेकांविरुद्धचे मतभेद सनदशीर चर्चेच्या माध्यमातून सोडवू शकतात, असं त्यांनी सांगितलं.
 
भारतात सार्वत्रिक निवडणुकां सुरू आहेत. काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटनांची नोंद काही दिवसांपूर्वीच झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर इम्रान यांनी हे उद्गार काढले आहेत.
 
पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्यात चाळीसहून अधिक जवानांनी जीव गमावला होता. यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई कारवाई केली होती.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे? या प्रश्नावर इम्रान म्हणाले, "काश्मीरप्रश्नी लवकरात लवकर तोडगा निघायला हवा. काश्मीरचा प्रश्न धगधगता ठेऊन चालणार नाही. गरिबी कशी कमी करणार हे दोन्ही देशांसमोरचं आव्हान आहे. दोन्ही देशांदरम्यानचे मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवायला हवेत. खरंतर दोन्ही देशांदरम्यान वादाचा मुद्दा एकच आहे, तो म्हणजे काश्मीर."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित केला आहे. पाकिस्तान विरोधाचा मुद्दा त्यांनी रेटला आहे.
 
हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षाने ध्रुवीकरण केलेल्या निवडणुका असं अनेकजण या निवडणुकीचं वर्णन करत आहेत. मतदानाचा पहिला टप्पा गुरुवारी आहे तर 23 मे रोजी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
 
दोन देशांदरम्यान झालेल्या आक्रमणांबाबतही खान यांनी भूमिका मांडली आहे.
 
कोणत्याही देशाने हल्ला केल्यानंतर, पुढे काय होईल हे सांगता येत नाही. भारताने पुन्हा हल्ला केला तर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यावाचून पर्याय नाही. अशा परिस्थितीत दोन आण्विक अस्त्रधारी देशांसाठी हे खूपच बेजबाबदार आहे.
 
निवडणुकांच्या तोंडावर मैत्रीचा हात
पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर इम्रान खान यांनी खूपच कमी मुलाखती दिल्या आहेत. बीबीसीसह अन्य काही इंग्रजी तसेच अमेरिकन माध्यम प्रतिनिधींना खान यांनी भेटीचं आमंत्रण दिलं. भारतातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खान यांना मोदी आणि पर्यायाने भारताला काही संदेश द्यायचा आहे.
 
खान यांनी भारतासमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. आपले सामाईक प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र काम करूया, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. भारताविरुद्धचे संबंध ताणले गेल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी पाकिस्तानमधून माघार घ्यायला सुरुवात केली आहे.
 
पाकिस्तान कट्टरतावादी संघटनांना आपल्या भूमीचा वापर करू देत असल्याचा आरोप खान यांनी फेटाळला.
 
दहशतवादी संघटनांवर अंकुश आणण्याचं सर्वोत्तम काम याच सरकारने केलं असल्याचा पुनरुच्चार खान यांनी केला. काश्मीरप्रश्नी तोडगा हेच यावरचं उत्तर आहे, असं त्यांना वाटतं.
 
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी समन्वयाच्या माध्यमातून तोडगा काढायला हवा असं ते म्हणाले.
 
काश्मीरवरून तणाव का?
मुस्लिमबहुल काश्मीरवर दोन्ही देश आपला दावा सांगतात. काश्मीरच्या मुद्यावरून दोन्ही देशांदरम्यान दोन युद्धं झाली आहेत.
 
2003मध्ये दोन्ही देशांनी सीमेनजीक शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जाणार नाही, असं मान्य केलं. परंतु अंतर्गत ठिकाणी हिंसाचाराच्या घटना कायम घडत असतात.
 
मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि लष्कराकडून मानवाधिकाराचं उल्लंघन होण्याच्या मुद्यावरून दोन्ही देशांतले संबंध दुरावले आहेत.
संदर्भ काय?
पाकिस्तानस्थित कट्टरतावादी संघटनेने पुलवामामध्ये केलेल्या हल्ल्यात चाळीसहून अधिकजणांचा जीव गेला होता. गेल्या दशकभरातला हा सगळ्यांत जीवघेणा हल्ला होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे, असं भारताने म्हटलं होतं.
 
पुलवामा हल्ल्यावेळचं दृश्यं.
भारताने हवाई आक्रमण करत पाकिस्तानस्थित कट्टरतावादी संघटनेच्या तळाला लक्ष्य केलं होतं.
 
याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने भारताचं एक विमान पाडलं होतं. विमानाच्या वैमानिकाला जिवंत पकडण्यात आलं. मात्र शांतता प्रक्रियेचा भाग म्हणून सोडून देण्यात आलं.
 
या घटनेनंतर दोन्ही देशांदरम्यानचं वातावरण निवळलं होतं. मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारत हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला होता.
 
मात्र लोकांच्या भावनांना साद घालण्यासाठी असा आरोप करण्यात आल्याचं भारताने म्हटलं होतं.
मोदींबाबत खान काय म्हणाले?
इम्रान खान यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बातचीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास चर्चेचा मार्ग अधिक सुकर होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
 
भाजप या उजव्या विचारसरणीच्या पक्षाने निवडणुका जिंकल्या तर काश्मीरप्रश्नी काही तोडगा निघू शकतो. अन्य पक्ष निवडून आल्यास वाटाघाटीचा मार्ग पत्करल्यास त्यांच्यावर टीका होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.
 
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आसिया बिबीप्रकरणाबाबत त्यांनी भाष्य केलं.
 
असियाबीबी यांची पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं सुटका केली आहे. आसिया बिबी लवकरच देश सोडून जातील, असं खान यांनी स्पष्ट केलं.
 
हे प्रकरण गुंतागुंतीचं आहे. प्रसारमाध्यमांसमोर या प्रकरणाचे तपशील उघड करू इच्छित नाही. मात्र त्या सुरक्षित आहेत याची हमी देऊ इच्छितो. काही आठवड्यांतच त्या देश सोडून जातील.