रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (17:10 IST)

23 महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भारतीय वंशाच्या डॉक्टरला होणार शिक्षा

ब्रिटनमध्ये महिला रुग्णांना कॅन्सरची भीती दाखवून तपासणीच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या मनीष शहा नावाच्या डॉक्टरला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यांच्यावर एक, दोन नव्हे तर तब्बल 23 महिलांशी संबंधित 25 प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेला आहे.
 
ब्रिटनमधल्या रॅमफोर्ड इथे राहणाऱ्या 50 वर्षीय डॉ. मनीष शहांवर लंडनमधल्या ओल्ड बार्ली कोर्टात हा खटला सुरू होता.
 
हॉलीवुड स्टार आणि टीव्ही सेलिब्रेटींच्या कॅन्सरच्या बातम्या दाखवून हा डॉक्टर महिला रुग्णांना घाबरवायचा. कॅन्सरविषयी वाटणाऱ्या काळजीचा फायदा लाटत डॉ. मनीष पांडे स्वतःच्या लैंगिक सुखासाठी महिला रुग्णांना सर्व अवयवांची तपासणी करायला सांगायचे, असं ओल्ड बार्ली कोर्टाने म्हटलं आहे.
 
मे 2009 ते जून 2013 या काळात त्याने अनेक महिलांना अनावश्यक तपासण्या करण्यासाठी राजी केलं होतं. 25 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप त्याच्यावर सिद्ध झाले आहेत. डॉ. मनिष पांडे यांना 7 फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावण्यात येईल. डॉक्टरांकडूनच महिला रुग्णांचं लैंगिक शोषण होण्याचं ब्रिटनमधलं हे दुर्मिळातली दुर्मिळ प्रकरण असल्याचं बीबीसीचे हेल्थ एडिटर हग पिम यांनी म्हटलं आहे.
 
'रुग्णांच्या अज्ञानाचा आणि भीतीचा फायदा लाटला'
डॉ. मनीष शहा यांनी आपल्या एका रुग्णाला, हॉलीवुड स्टार अँजोलिना जोलीने कॅन्सरपासून प्रतिबंधात्मक उपचार म्हणून मॅस्टेक्टोमी करुन घेतली आहे, असं सांगत तुम्हीसुद्धा तुमचे ब्रेस्ट तपासून घेतले पाहिजे, असा सल्ला दिला होता.
 
तर दुसऱ्या एका प्रकरणातील तक्रारदार महिलेने सांगितलं की डॉ. मनीष शहा यांनी तिला टीव्ही सेलिब्रेटी जेड गुडीचं उदाहरण दिलं. 27 वर्षीय जेड गुडी हिचा गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत्यू झाला होता. तुमच्या योनीमार्गाची तपासणी करणं तुमच्या हिताचं आहे, असा सल्ला आपल्याला डॉ. मनीष शहा यांनी दिल्याचा या तक्रारदार महिलेने कोर्टाला सांगितलं.
 
याचिकाकर्त्यांचे वकील केट बेक्स QC यांनी कोर्टाला सांगितलं, "त्याने आपल्या पदाचा गैरफायदा घेत महिलांना योनीमार्गाची तपासणी, ब्रेस्ट तपासणी आणि गुदद्वाराची तपासणी करण्यासाठी भाग पाडलं. मात्र, वैद्यकीयदृष्ट्या या तपासण्यांची काहीही गरज नव्हती."
 
शहाच्या एका महिला रुग्णाने आपण या सर्व प्रकाराला कसे बळी पडलो, याची हकीकत बीबीसीला सांगितली. त्या म्हणाल्या, "तुम्ही सुरक्षित आहात की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही या सगळ्या लैंगिक अवयवांची तपासण्या करणं गरजेचं आहे, असं तो म्हणायचा. तुमचा जोडीदार निरोगी असला तरी कोण कधी कुणाबरोबर जाईल सांगता येत नाही, असंही तो म्हणायचा."
 
"मी यापैकी कशाचाही विचार करत नसतााना तो सतत तपासण्या करण्यासाठी तगादा लावायचा. मला वाटलं डॉक्टरच सल्ला देत असेल तर तुम्ही ऐकलं पाहिजे." "त्याने अनेकांना फसवलं आहे. त्याने आमच्या अज्ञानाचा आणि भीतीचा वापर करून त्याचा पुरेपूर फायदा लाटला. मात्र, मला एकदाही असं वाटलं नाही की तो काही चुकीचं करत आहे. "लंडनमध्ये आरोग्य सेवा पुरवणाऱ्या NHS या संस्थेने पीडितांप्रती संवेदना प्रकट करत म्हटलं आहे, "आरोपांविषयी माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केली. तसंच आम्ही पोलिसांनाही त्यांच्या संपूर्ण तपासात सहकार्य केलं."