शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (18:15 IST)

प्रणिती शिंदे: कार्याध्यक्षपद देऊन शिंदेंची नाराजी दूर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे का?

काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र काँग्रेसची नवी टीम जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर पटोले यांच्या व्यतिरिक्त 6 जणांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
 
यामध्ये शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे आणि प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे.
 
उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सोलापूर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे या मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती.
 
सोलापूर जिल्ह्यातील काँग्रसेच्या एकमेव आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांची मंत्रिपदावर वर्णी लागेल, अशी त्यावेळी चर्चा होती. पण, त्यांना डावलण्यात आलं होतं.
 
 
त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी स्वत:च्या रक्तानं पत्र लिहित काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे याविषयी न्याय मागितला होता.
 
त्यामुळे मग प्रणिती शिंदे यांना पक्षानं दिलेलं कार्याध्यक्ष पद ही त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
 
प्रणिती शिंदे यांना कार्याध्यक्षपद देणं यामागे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच असू शकतो, असं मत सोलापूरमधील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने मांडतात.
 
ते सांगतात, "प्रणिती शिंदे यांना काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नेमून काँग्रेस पक्ष त्यांची नाराजी दूर करू पाहत आहे. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये मूळआतच काँग्रेसच्या वाट्याला कमी मंत्रीपदं आली आहेत. यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे प्रणिती शिंदे यांचं नाव मागे पडलं होतं. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना होती. आता त्यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांना आनंद वाटेल.
 
"दुसरं म्हणजे सोलापूर काँग्रेसचा विचार केल्यास प्रणिती शिंदे यांच्याव्यतिरिक्त दुसरा कुणी अॅक्टिव्ह चेहरा काँग्रेस पक्षाकडे नाहीये. या निवडीमुळे काँग्रेस पक्षाला सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढीस वाव मिळेल."
 
"प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळावं अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. कारण त्या सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. मंत्रीपद मिळावं म्हणून त्यांच्या समर्थकांनी उपोषणं केली, सामूहिक राजीनाम्याचं शस्त्रही उपसलं होतं. पण, त्यांना डावलण्यात आलं होतं," असं मत सोलापूरमधील पत्रकार सागर सुरवसे व्यक्त करतात.
 
ते पुढे सांगतात, "आता काँग्रेस पक्ष मंत्रीपद नसलं तरी कार्याध्यक्षपद देऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा फायदा काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यासाठी होईल. कारण, सोलापूर जिल्ह्यात पक्षाच्या फक्त प्रणिती शिंदे या एकमेव आमदार आहेत."
 
प्रणिती शिंदेंची आमदारकीची हॅट्ट्रिक
 
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक साधली. एकूण 11 हजार 943 मताधिक्याने शिंदे यांनी विजय प्राप्त केला.
 
2009 मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या. कमी वयातील आमदार म्हणून त्यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.
 
त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत लोकसभेत वडिलांचा पराभव होऊनसुद्धा प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत आपली जागा राखली होती.