मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (19:28 IST)

श्री ठाणेदार: अमेरिकेतील हिंदू, बौद्ध, शीख आणि जैनांसाठी सरसावला मराठी खासदार

Shri Thanedar
भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार असलेल्या श्री ठाणेदार यांनी हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या अनुयायांसाठी एक नवा गट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या लोकांचं हित जपण्याच्या उद्देशाने त्यांनी हा गट स्थापन केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
ठाणेदार हे मूळचे बेळगावचे असून त्यांचं 'ही श्री ची इच्छा', हे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे.
 
श्री ठाणेदार यांनी शुक्रवारी (29 सप्टेंबर 2023) औपचारिक पद्धतीने या गटाची सुरुवात केली. या गटाला कॉकस असंही म्हटलं जातं. या गटाला सुमारे 27 अमेरिकन खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा ठाणेदार यांनी केलाय. यात रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट खासदारांचा समावेश आहे.
 
मिशिगनमधील डेमोक्रॅट खासदार ठाणेदार यांच्या मते, या गटामार्फत समुदायांच्या हितासाठी संवाद साधला जाईल आणि लोकांना त्यांच्या विशेष गरजा आणि चिंतांविषयी जागरूक केलं जाईल.
 
हा गट धार्मिक भेदभाव दूर करण्यासाठी आणि हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन समुदायांच्या धार्मिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्याचं काम करेल.
 
कॉकस हा असा एक गट आहे ज्यामध्ये अनेक नेते संविधानाच्या कक्षेत राहून समान हेतूसाठी एकत्र येऊ शकतात.
 
ठाणेदार यांनी या गटाविषयी माहिती देताना सांगितलं की, 'समाजातील अल्पसंख्याक गटांसाठी सर्वसमावेशक वातावरण निर्माण व्हावं, परस्पर सामंजस्य वाढावं आणि त्यासाठी आवश्यक धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवून यावा यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली आहे.'
 
'सर्व धर्म, सर्व संस्कृती आणि सर्व समाजाचे लोक अमेरिकेत मुक्तपणे वावरू शकतात, यासाठी ही मोहीम असल्याचं त्यांनी सांगितलं.'
 
या गटाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, "अमेरिकेच्या विविधतेचा मी स्वतः एक पुरावा आहे. हा गट धार्मिक भेदभाव, द्वेष आणि मूलतत्त्ववादाच्या विरोधात उभा राहील. आम्हाला एक सर्वसमावेशक समाज हवा आहे. आम्हाला एक असा देश हवाय जिथे विविधतेत एकता असेल."
 
ते पुढे म्हणाले की, "अमेरिकेच्या लोकसंख्येमध्ये सुमारे 30 लाख हिंदू, 12 लाख बौद्ध, 5 लाख शीख आणि 2 लाख जैन आहेत. इथे एक हजार हिंदू मंदिरं, एक हजार बौद्ध मंदिरं, 800 गुरुद्वारा आणि शंभर जैन मंदिरं आहेत. या ठिकाणी समाजाच्या विकासासाठी, परोपकारासाठी काम केलं जातं. ही ठिकाणं आध्यात्मिक कल्याणाची केंद्र आहेत."
 
"काही संस्कृतींकडे वाईट नजरेने बघितलं जातं, त्यांच्याविषयी गैरसमज बाळगला जातो. मला वाटतं की, प्रत्येकाला आपापल्या धर्माचं पालन करण्याची मोकळीक असावी. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार असला पाहिजे."
 
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, 'अमेरिकन्स फॉर हिंदूज'चे अध्यक्ष आणि संस्थापक रोमेश जापरा यांनी हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं म्हटलंय. ते म्हणाले, अमेरिकेत राहणाऱ्या हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन यांना बऱ्याच काळापासून याची गरज वाटत होती.
 
कोण आहेत श्री ठाणेदार?
बेळगावमधील एका गरीब कुटुंबात श्री यांचा जन्म झाला.
 
एकूण सहा भावंडांमध्ये तिसरं अपत्य असलेल्या ठाणेदार यांचे वडील दिवाणी न्यायालयात वरिष्ठ लिपिक तर आई गृहिणी होती.
 
ठाणेदार 14 वर्षांचे असताना त्यांचे वडील सेवानिवृत्त झाले. त्यामुळे पुढचं शिक्षण पूर्ण करणं हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न होता. त्यांनी बारीक सारीक कामं करत आपलं शिक्षण सुरू ठेवलं.
 
त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 'त्यांच्या लहानपणी घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. ना घरात पाण्याचा नळ होता ना लाईट. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या ठाणेदार कुटुंबाला पोटाची खळगी भरण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते.'
 
1979 मध्ये मुंबईतून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पीएचडी करण्यासाठी अमेरिकेतील 'अक्रॉन' विद्यापीठात प्रवेश घेतला. 1988 मध्ये त्यांनी अमेरिकन नागरिकत्व घेतलं.
 
शिक्षण पूर्ण करताना त्यांनी रखवालदाराचंही काम केलं. आपला खर्च भागवण्यासाठी कित्येकदा ते आपल्या गाडीतच झोपायचे.
 
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये नोकरी केली. त्यानंतर स्वतः एक औषध कंपनी स्थापन केली. 1997, 2007 आणि 2016 मध्ये 'अर्न्स्ट अँड यंग'कडून त्यांना 'एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात आला. 2016 मध्ये ठाणेदार यांनी त्यांची कंपनी विकली.
 
2018 मध्ये त्यांनी पहिल्यांदा मिशिगनच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत सहभाग घेतला. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर 2020 मध्ये ते मिशिगन विधानसभा निवडणुकीत उभे राहिले आणि विजयी झाले. 2022 मध्ये ते मिशिगनमधून अमेरिकन संसदेवर निवडून आले.
 
मुलांच्या शिक्षणात सरकारचा अधिकाधिक सहभाग असावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय की, "मी बारावी ते पदवीपर्यंतचं शिक्षण सरकारी संस्थांमधून पूर्ण केलं आहे. सरकारने मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करावी. हा एक चांगला व्यवसाय आहे आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल."
 
ही 'श्री' ची इच्छा, हे त्यांचं पुस्तक मराठी वाचकवर्गात विशेष लोकप्रिय आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच त्यांनी आपल्या आजवरच्या प्रवासात आलेल्या अडथळ्यांची आणि त्यावर मात करताना आलेल्या अनुभवांची माहिती दिली आहे. ते लिहितात, "नशिबाचं सर्वच दान मनासारखं पडलं नाही, टोकाचं अपयश, टोकाची निराशा, टोकाची हार पत्करावी लागली. पण ती केवळ एक तात्पुरती गोष्ट. इच्छेच्या जोरावर मी परत परत प्रतिकूल परिस्थितीवर मात केली."
 
चार वेळा व्हिसा नाकारला
एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, लहानपणी त्यांनी मराठी भाषेत त्यांचं शिक्षण पूर्ण केलं होतं. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या बेळगाव मध्ये कन्नड आणि मराठी भाषेत शिक्षण दिलं जातं. इथल्याच एका शाळेत ठाणेदार यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं.
 
ठाणेदार सांगतात की, त्यांनी अमेरिकेच्या व्हिसासाठी चार वेळा अर्ज केला होता. पण पाचव्यांदा त्यांचा व्हिसा मंजूर झाला.
 
ते पहिल्यांदा व्हिसा अर्जासाठी गेले होते तेव्हा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. तेव्हा त्यांना भोवळ आली होती.
 
तिसर्‍यांदा जेव्हा त्यांचा व्हिसा नाकारण्यात आला, तेव्हा त्यांनी अमेरिकेतील आपल्या प्राध्यापकाच्या पत्रासह व्हिसासाठी अर्ज केला. एक महिन्यानंतर, त्यांनी त्याच कागदपत्रांसह पुन्हा व्हिसासाठी अर्ज केला आणि त्यांचा व्हिसा मंजूर झाला.
 
खलिस्तानी फुटीरतावाद्यांविषयी ते काय म्हणाले
या वर्षी मार्चमध्ये खलिस्तान समर्थकांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला केला होता. या लोकांनी सुरक्षा कवच तोडून आत घुसून आग लावण्याचा प्रयत्न केला.
 
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधित प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की "अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही एक वेगळी गोष्ट आहे. याच्या नावाखाली हिंसेचं समर्थन करणं, लोकांवर हल्ले करणं, त्यांचा जीव घेणं हा अधिकार तुम्हाला नाही. तुम्हाला निषेध करण्याचा अधिकार आहे पण तो शांततापूर्ण असला पाहिजे."
 
त्यांनी बायडन प्रशासनाला आवाहन करत म्हटलं होतं की, दूतावासांसोबतच प्रार्थनास्थळांचेही संरक्षण करण्यात यावं.
 
मोदींचा प्रभाव
या वर्षी ऑगस्टमध्ये एक अमेरिकन शिष्टमंडळ भारतात आलं होतं. यात श्री ठाणेदार देखील होते.
 
यादरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "जेव्हा मोदी अमेरिका दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांची भेट झाली होती. काँग्रेससोबतच्या संयुक्त अधिवेशनात मी त्यांचं भाषण ऐकलं होतं, यामुळे मला प्रेरणा मिळाली. त्याचवेळी मला असं वाटलं की, अमेरिकन काँग्रेसचं शिष्टमंडळ भारतात यायला हवं."
 
"चीनकडून असलेला धोका बघता काँग्रेस सदस्यांना असं वाटलं की, भारतासोबतचे संबंध सुधारले पाहिजेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर, आम्हाला रशियाकडून धोका दिसू लागला होता. संपूर्ण जगाचं सांगायचं तर इंडो-पॅसिफिक प्रदेशात मोठी अस्थिरता आहे."
 
"भारताशी असलेले आमचे संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आम्ही एका शिष्टमंडळ घेऊन भारतात आलोय. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी दिल्लीत येण्याचं आमंत्रण दिलं होतं."