रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (11:19 IST)

सुषमा स्वराज माझं 1 रुपयाचं मानधन न देताच निघून गेल्या - हरीश साळवे

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी  रात्री अखेरचा श्वास घेतला. कार्डिअॅक अरेस्टमुळे सुषमा स्वराज यांचं निधन झालं.
 
दिल्लीतील राहत्या घरी कार्डिअॅक अरेस्ट आल्यानंतर सुषमा स्वराज यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
 
कार्डिअॅक अरेस्टपूर्वी सुषमा स्वराज यांनी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये सुषमा यांनी कलम 370 हटवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं.
 
"पंतप्रधानजी, तुमचं हार्दिक अभिनंदन. मी आयुष्यभर या दिवसाची प्रतीक्षा करत होते." सुषमा स्वराज यांनी केलेलं ट्वीट आणि त्यानंतर अवघ्या तीनच तासात आलेलं त्यांच्या निधनाचं वृत्त यामुळे लोकांना धक्का बसला.
 
सुषमा स्वराज यांचं अखेरचं संभाषण कोणासोबत?
सुषमा स्वराज यांच्या निधनावर ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनीही दुःख व्यक्त केलं. हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा खटला लढवला होता.
 
मंगळवारी रात्री 8.45 च्या सुमारास सुषमा स्वराज यांचं हरीश साळवेंसोबत फोनवरून बोलणं झालं होतं. 'Times Now' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हरीश साळवेंनी यासंबंधी माहिती दिली.
 
हरीश साळवेंनी सांगितलं, "मला प्रचंड धक्का बसला. रात्री पावणे नऊच्या सुमारास माझं सुषमाजींसोबत संभाषण झालं होतं. त्यानंतर त्यांच्या निधनाचं वृत्त आलं आणि मी निःशब्दच झालो. त्यांच्या जाण्यामुळे देशाचं नुकसान झालं आहे, त्याचबरोबर माझंही वैयक्तिक नुकसान झालंय."
 
"सुषमा स्वराज यांच्याशी झालेलं संभाषण हे खूपच भावनिक होतं. तुम्ही मला येऊन भेटा, असं त्या मला म्हणाल्या. कुलभूषण जाधव खटल्याची 1 रुपया फी मला तुम्हाला द्यायची आहे. उद्या सहा वाजता या," हरीश साळवेंनी सुषमा स्वराज यांच्यासोबतच्या अखेरच्या संभाषणाची आठवण सांगितली.
 
सुषमा यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना हरीश साळवेंनी म्हटलं, "त्या खूप आनंदी वाटत होत्या. त्यांचं नेतृत्व कमालीचं होतं. मी त्यांच्याबद्दल काय बोलू? मला माझी मोठी बहीण गमावल्यासारखं वाटतंय."
 
कुलभूषण जाधवची बाजू लढवणारे हरीश साळवे
ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणी भारताची बाजू मांडली होती. त्यासाठी त्यांनी अवघा एक रुपया मानधन म्हणून घेतले होते.
 
हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधवच्या फाशीला स्थगिती दिली होती. पाकिस्ताननं कुलभूषणच्या शिक्षेवर पुनर्विचार करण्याची सूचना आंतरराष्ट्रीय न्यायालयानं केली.
 
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर बीबीसीशी हसत बोलताना हरीश साळवेंनी म्हटलं होतं की, "मला अजूनपर्यंत माझं 1 रुपया मानधन मिळालंच नाहीये. माझं सुषमाजींसोबत बोलणं झालं आहे. भारतात आल्यावर तुमचा एक रुपया नक्की घेऊन जा."