शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 9 एप्रिल 2023 (15:05 IST)

अनु अग्रवाल: ‘आशिकी’ चित्रपटामुळे स्टार बनलेली अभिनेत्री इतकी वर्षं कुठे होती?

आपल्या पहिल्याच चित्रपटातून सुपरस्टारचा दर्जा मिळवणारे कलाकार खूप कमी असतात. या कलाकारांना पहिल्या चित्रपटातच ते यश मिळतं जे इतरांना 10 चित्रपट केल्यानंतरही मिळू शकलेलं नसतं..
अनु अग्रवाल यासुद्धा अशाच एक अभिनेत्री आहेत. अनु अग्रवाल यांनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. पण पहिल्या चित्रपटाने त्यांना जे स्टारडम दिलं, त्या यशाचं अनेकजण केवळ स्वप्नच पाहतात.
पण, हेसुद्धा खरं आहे की 1990 मध्ये राहुल रॉय सोबत आलेल्या महेश भट्ट दिग्दर्शित आशिकी चित्रपटानंतर अनु अग्रवाल यांचा दुसरा कोणताही चित्रपट फारसा चालला नाही.
 
1990 साली आशिकी मध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांची जोडी लोकांना प्रचंड आवडली होती. पण काही काळानंतर दोन्ही कलाकार मोठ्या पडद्यापासून दूर झाले.
राहुल रॉय काही रिअॅलिटी शोमध्ये दिसले. पण अनु अग्रवाल तर गायबच झाल्या.
 
मात्र, नुकतेच इंडियन आयडॉल रिअॅलिटी शोमध्ये अनु अग्रवाल पुन्हा दिसल्या.
 
त्या इतकी वर्षे कुठे होत्या, हे जाणून घेण्यासाठी आणि इतर काही प्रश्नांसोबत बीबीसीसाठी नयनदीप रक्षित यांनी अनु अग्रवाल यांच्यासोबत बातचीत केली.
 
अॅक्सिडेंटल अक्ट्रेस
अनु अग्रवाल स्वतःला अॅक्सिडेंटल अक्ट्रेस म्हणवून घेतात. त्या म्हणतात, “माझ्या आयुष्यात एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षाही जास्त चढ-उतार मी पाहिले आहेत.”
 
बॉलिवूडमध्ये आपला प्रवेश कसा झाला याविषयी सांगताना अनु यांनी माहिती दिली.
त्यांनी म्हटलं, “मी तर शाळेत असल्यापासूनच अभिनय सुरू केला होता. सातवीपासून ते दहावीपर्यंत मी खूप साऱ्या नाटकांमध्ये भाग घेतला. शाळेत मी नाटकंही लिहिली. सोबतच बास्केटबॉलही मी खेळायचे. अकरावीमध्ये असताना माझी निवड राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी झाली. पण खेळत असताना माझा अपघात झाला. त्यामुळे मला बास्केटबॉल सोडावं लागलं.
 
त्या पुढे म्हणतात, “या अपघातानंतर मी अभिनयाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत केलं. त्यानंतर मी एका नाट्यसमूहात दाखल झाले. यामध्ये सगळे जण राष्ट्रीय नाट्य अकादमीतून होते. यादरम्यान मी एक नाटक केलं. यामध्ये मी 16 वर्षांच्या बेनझीर भुट्टोंची भूमिका केली होती. ते नाटक खूप हिट झालं.”
 
पण अनु अग्रवाल यांचा चित्रपटात येण्याचा कोणताही विचार नव्हता.
 
त्या पुढे म्हणतात, “चित्रपटांमध्ये महिलांना योग्य स्थान मिळत नाही, त्यांचं चित्रण योग्यरित्या केलं जात नाही, हे यामागचं कारण असू शकतं. महिलांना चित्रपटात सशक्त भूमिका मिळत नाहीत.”
 
पण महेश भट्ट यांना भेटल्यानंतर त्यांच्या विचारसरणीत बदल झाला.
 
महेश भट्ट यांची भेट
महेश भट्ट यांच्याशी आपल्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना अनु म्हणाल्या, “महेश भट्ट आणि माझ्यात एक कॉमन मित्र होते. एके दिवशी आम्ही जेवणासाठी भेटलो. तिथे महेश भट्ट म्हणाले, तू तर स्टार आहेस, तू चित्रपट करायला हवा. पण मी त्यावेळी नकार दिला होता.”
ती चर्चा तिथेच थांबली. यानंतर अनु अग्रवाल पॅरिसला निघून गेल्या. त्यावेळी त्यांचं एक मॉडेलिंग एजन्सीसोबत काँन्ट्रॅक्ट होतं. शिवाय, त्या रिलेशनशीपमध्येही होत्या. त्यांचं आयुष्य जवळपास सेट होतं.
 
अनु सांगतात, “मी जेव्हा माझं सामान घेण्यासाठी भारतात परतले, त्यावेळी महेश भट्ट यांचा मला फोन आला. ते म्हणाले की त्यांनी मला विचारात घेऊन एका चित्रपटाची कथा लिहिली आहे.”
 
अनु यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाला होकार देण्यासाठी 10-12 दिवसांचा वेळ घेतला.
 
अनु म्हणतात, “माझी महेश भट्ट यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की मी कोणत्याही हिरोईनप्रमाणे केस ठेवणार नाही. मेकअप करणार नाही, किंवा त्यांच्यासारखे कपडेही घालणार नाही.”
 
महेश भट्ट यांनी त्यांच्या सगळ्या अटी-शर्थी मान्य केल्या आणि चित्रपटाचं शुटिंग तीन महिन्यात पूर्ण झालं.
 
राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांचा आशिकी चित्रपट 23 जुलै 1990 रोजी प्रदर्शित झाला.
 
चित्रपट रिलीज होताच अनु अग्रवाल यांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं.
 
निर्माते पेटीत पैसे घेऊन यायचे..
अनु सांगतात, “चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच माझ्या घरासमोर लोकांची गर्दी वाढू लागली. घरातून बाहेर पडणंही मला मुश्किल झालं. मुलं ‘आय लव्ह यू’चे बॅनर घेऊन माझ्या घराबाहेर थांबायची.
 
स्टारडमच्या त्या आठवणी सांगताना अनु म्हणाल्या, “आशिकी माझा पहिला चित्रपट होता. तो प्रदर्शित झाल्यापासून तर मला प्रचंड आदर मिळू लागला. मोठमोठी माणसं मला अनु जी, मॅडम म्हणून संबोधत होते. निर्माते माझे पाया पडायचे. माझा चित्रपट साईन करा म्हणायचे. काही निर्माते तर ब्रिफकसमध्ये पैसे घेऊन माझ्याकडे यायचे. त्यांच्याकडे तर स्क्रिप्टही नसायची. आधी चित्रपट साईन करा, नंतर स्क्रिप्टचं पाहून घेऊ, असं ते म्हणायचे.”
पहिल्याच चित्रपटात स्टार बनलेल्या अनु यांनी स्क्रिप्टबाबत कधीच तडजोड केली नाही.
 
अनु यांच्या आशिकी चित्रपटाने स्टारडमची वेगळी व्याख्या लिहिली. पण बॉलिवूड चित्रपट जगतात टॅन-मेकअपची सुरुवात करणारी पहिली अभिनेत्री म्हणूनही त्यांना ओळखलं गेलं.
 
पूर्वी अभिनेत्रींसाठी फेअर मेकअप असायचा. पण अनु यांच्या मागणीनंतर त्यांना टॅन-मेकअप करण्यात आला.
 
एका बाजूला अनु अग्रवाल स्टार होत्या. मुलांची त्यांच्या घराबाहेर गर्दी कायम असायची. पण त्याच वेळी इंडस्ट्रीत कोणत्याच तर कलाकारांसोबत अनु यांचे संबंध नव्हते.
 
अनु म्हणतात, “इंडस्ट्रीमध्ये लोक मला घाबरायचे. ते मला पाहून दोन पाऊल मागे सरकायचे. अभिनेता गोविंदा तर मला हॉलिवूड-हॉलिवूड म्हणून हाक मारायचे. त्यांच्या मते मी हॉलिवूडसाठी बनले होते, बॉलिवूडसाठी नाही.”
 
इतकी प्रसिद्धी, प्रेम आणि यश पदरात पडूनही इंडस्ट्री सोडण्याचं कारण काय होतं, या प्रश्नाचं उत्तर देताना अनु अग्रवाल म्हणतात, “असं नाही की मी इंडस्ट्री सोडली होती.”
 
“1993-94 पर्यंत मी अनेक चित्रपट केले. त्या काळातील उत्तमोत्तम दिग्दर्शकांसोबत मी काम केलं. पण मनाला भावेल अशी स्क्रिप्ट मला मिळत नव्हती.”
 
अनु पुढे सांगतात, “ज्या प्रकारचं प्रेम-यश मी पाहिलं. त्यापेक्षा मोठं यश कोणतंही असू शकत नाही. ज्याप्रमाणे माझी कारकीर्द सुरू झाली. लाँचिंग मिळालं. मला जे करायचं होतं, ते मी केलं. त्यापेक्षा मोठं काहीही नाही. मी 1993 साली भारतात एम टीव्ही लाँच केलं, त्यापेक्षा आणखी काय हवं?”
 
आयुष्यातील चढ-उतार
अनु यांना आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. आशिकी चित्रपटाचं काम सुरू होण्याच्या काही दिवस आधी त्यांचा विवाह होणार होता. पण चित्रपटात आल्यानंतर त्यांचा विवाह होऊ शकला नाही.
आशिकी रिलीज झाल्यानंतर बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेलं रिलेशनशिपसुद्धा संपलं. तो काळ अनु यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.
 
अनु सांगतात, “माझं तर आयुष्यच पूर्ण कठीण होतं. ही मुलगी काहीतरी करू इच्छिते, पण त्याला परवानगी नाही, हे सगळ्यांत कठीण होतं. माझे कुटुंबीय इथे नव्हते, त्यामुळे इथं उदरनिर्वाह चालवणं अवघड होतं. त्यावेळी कोणतेच इतर पर्याय उपलब्ध नव्हते.”
 
1999 मध्ये अनु अग्रवाल यांचा एक अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या स्मरण शक्तीवर परिणाम झाला.
 
पण अनु आता कमबॅक करतील का?
 
या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणतात, “मी इंडस्ट्री सोडून कधीच गेले नव्हते. हो, याला एक प्रकारे ब्रेक म्हणता येऊ शकेल. त्यामुळे भविष्यात संधी मिळाली तर नक्की...”
 
Published By- Priya Dixit