गणेश आचार्य यांना लैंगिक छळ प्रकरणात जामीन
बॉलीवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य याला लैंगिक छळ प्रकरणी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गणेश आचार्य गुरुवारी न्यायालयात हजर झाले, त्यानंतर त्यांना या प्रकरणात दिलासा मिळाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये एका महिलेने नृत्यदिग्दर्शकाविरुद्ध लैंगिक छळाच्या प्रकरणात एफआयआर दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी गणेश आचार्यविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्याच्यावर महिला डान्सरचा छळ केल्याचा आरोप आहे.
2020 मध्येमहिला कोरिओग्राफरने तिच्या तक्रारीत आरोप केला होता की, ती जेव्हा गणेश आचार्य यांच्या कार्यालयात कामावर जायची तेव्हा गणेश तिच्यावर आक्षेपार्ह कमेंट करायचे तसेच अश्लील व्हिडिओ बघण्यास सांगायचे. तिने याचा निषेध केला म्हणून गणेश ने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. यासोबतच महिलेने मारहाणीचाही आरोप केला होता. तिने सांगितले की एका बैठकीत तिने विरोध केला तेव्हा तिला गणेश आचार्य आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली, त्यानंतर ती पोलिसात गेली, परंतु तिचा एफआयआर नोंदवला गेला नाही. यानंतर महिलेने वकिलामार्फत गुन्हा दाखल केला होता.
गणेश आचार्य यांनी महिलेच्या आरोपाबाबत बोलताना, आपल्यावरील सर्व आरोप खोटे असून, केवळ आपल्याला गोवण्याचा हा कट आहे, असे सांगत त्यांनी महिलेची ओळख असल्याचेही नाकारले. यानंतर कोरिओग्राफरने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.