1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (14:58 IST)

ऑल इंडिया रेडिओवर हिंदी गाण्यांवर बंदी आली आणि अमीन सयानींचं करिअर बहरलं

भारतीय रेडिओच्या सुवर्ण युगाचे शिल्पकार असलेल्या अमीन सयानी यांनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रेडिओ सिलोनपासून आपल्या कारकिर्दीला सुरूवात करणा-या अमीन सयानी यांनी रेडिओवरील 54 हजारांहून अधिक कार्यक्रमांची निर्मिती, लेखन आणि निवेदन केलं आणि जवळपास 19000 हून अधिक जिंगल्सना आपला आवाज दिला होता. ‘बिनाका गीतमाला’मुळे 1950 ते 1990 अशी तब्बल चार दशकं अमीन सयानी यांचा आवाज हीच रेडिओची ओळख होती.
 
जगातील सर्वोत्तम रेडिओ निवेदकांमध्ये गणना
अमीन सयानी यांचा जन्म 31 डिसेंबर 1932 रोजी गुजरात मध्ये झाला होता. मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली होती. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी रेडिओवरील निवेदनाला सुरूवात करणा-या अमीन सयानी यांनी रेडिओवरील ‘बिनाका गीतमाला’ सोबतच दूरदर्शनवरील "सिबाका गीतमाला" या लोकप्रिय कार्यक्रमाचं सादरीकरणसुद्धा केलं होतं. भारतीय रेडिओवरील कार्यक्रमांमुळे लोकप्रिय झालेल्या अमीन सयांनी यांना बीबीसीने भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासावरील विशेष मालिका सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. अमीन सयानी यांनी रेडिओला ग्लॅमर प्राप्त करुन दिलं. आजही त्यांची गणना जगातील सर्वोत्तम रेडिओ निवेदकांमध्ये केली जाते. भारत सरकारने 2009 साली त्यांना पद्मश्री हा सन्मान देऊन गौरव केला होता. त्याशिवाय रेडिओ प्रसारण क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं.
 
‘बहनों और भाईयों….’
'बहनों और भाईयो आप सुन रहे है...' हे वाक्य अमीन सयानी यांची ओळख होती. हे वाक्य ऐकल्यावर हा आवाज कुणाचा आहे, हे वेगळं सांगावं लागत नसे. अमीन सयानी रेडिओवरील आपल्या निवेदनाची सुरूवात ‘भाईयों और बहनों…’ अशी नव्हे तर 'बहनों और भाईयो…’ अशी करायचे. कारण महिलांना सर्वप्रथम आदर दिला पाहिजे हा त्यांचा त्यामागचा उद्देश होता. सुरूवातीच्या काळात त्यांच्या चाहत्यांपैकी अनेकजण त्यांना प्रश्न विचारायचे, की तुम्हाला ठाऊक आहे का, ‘बोलायला अशी सुरूवात कोण करायचं?’ अमीन सयानी यांना त्याचं उत्तर माहित होतं. स्वामी विवेकानंद आपल्या भाषणाची सुरूवात 'बहनों और भाईयो…’ अशी करायचे, असं ते सांगायचे. महिलांचा उल्लेख आधी केला जात असल्याने त्यांच्या कार्यक्रमाला मोठा महिला श्रोतूवर्ग लाभलेला.
 
स्वातंत्र्य सैनिकांचं कुटुंब
अमीन सयानी यांना घरातूनच महात्मा गांधीच्या विचारांची शिदोरी मिळाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या आई सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांच्या कार्याचं महात्मा गांधीजींना प्रचंड कौतुक होतं. महात्मा गांधीच्या सांगण्यावरून त्यांनी हिंदुस्तानी भाषांमधील एक मासिक सुरू केलं होतं. त्या मासिकाच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करण्यापासून अमीन यांनी सुरूवात केली आणि पुढे लेखन आणि छपाईच्या जबाबदा-याही पार पाडल्या.
 
‘बिनाका गीतमाला’चा इतिहास
रेडिओ सिलोनवर ‘बिनाका हिट परेड’ हा कार्यक्रम इंग्रजी भाषेतून सादर होत असे. हा कार्यक्रम कोलंबोमधून प्रसारित केला जात असे आणि हॅप्पी गो लकी ग्रेग नावाचे रेडिओ निवेदक हा कार्यक्रम सादर करायचे. पाश्चात्य संगीताची आवड असलेल्या भारतीय लोकांमध्येही हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता. त्यावेळी इंग्रजी गाण्यांच्या धर्तीवर भारतासाठी हिंदी गाण्याचा कार्यक्रम सुरू करण्याची संकल्पना मांडण्यात आली. कार्यक्रम करायचं ठरलं परंतु या कार्यक्रमाची जबाबदारी घ्यायला कुणी तयार नव्हतं. अशावेळी नव्यानेच निवेदनाच्या क्षेत्रात पदार्पण केलेल्या अमीन सयानी यांनी कार्यक्रमाचं लेखन, सादरीकरण आणि श्रोत्यांची पत्र तपासण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यावेळी ते फक्त वीस वर्षांचे होते. हा कार्यक्रम सादर करण्यापूर्वी अमीन सयानी यांनी हिंदी भाषेत निवेदन केलं नव्हतं. अमीन इंग्रजी भाषेत निवेदन करायचे. रेडिओ निवेदनाच्या क्षेत्रात आपल्याला आणण्याचं श्रेय ते त्यांचे मोठे बंधू हमीद सयानी यांना देतात. हमीद सयानी हे मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओवर इंग्रजी भाषेत निवेदन करणारे अतिशय प्रसिद्ध निवेदक होते. ‘बिनाका गीतमाला’ हा सुरुवातीला एक स्पर्धात्मक कार्यक्रम होता. आठवड्यातून एकदा होणा-या या कार्यक्रमात सुरूवातीला केवळ सात हिंदी गाणी वाजवली जायची. या गाण्यांचा क्रम काय असेल याचा अंदाज श्रोत्यांना लावाला लागत असे आणि योग्य उत्तर देणा-या श्रोत्यांना बक्षीस म्हणून 100 रूपये रोख रक्कम दिली जायची.
 
श्रोत्यांच्या पत्रांचा पाऊस
‘बिनाका हिट परेड’ या इंग्रजी गाण्यांच्या कार्यक्रमासाठी दर आठवड्याला 300-400 पत्र येत असत. हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाला आठवड्याला निदान 50-60 पत्रांचीच अपेक्षा होती. अमीन सयानी देवाकडे प्रार्थना करत की आपल्या कार्यक्रमाला श्रोत्यांची किमान 150 पत्र तरी येऊ देत. पण आश्चर्य म्हणजे डिसेंबर 1952 रोजी सादर झालेल्या ‘गीतमाला’च्या पहिल्या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणानंतर पहिल्याच आठवड्यात पत्रांचा अक्षरश: पाऊस पडला. पहिल्याच कार्यक्रमानंतर देशाच्या कानाकोप-यातून तब्बल नऊ हजार पत्र आली. कालांतराने ही संख्या आठवड्याला पासष्ट हजार पत्रांपर्यंत गेली होती. त्यानंतर 1954 मध्ये अर्ध्या तासाचा कार्यक्रम एक तासाचा करण्यात आला आणि त्यामधील स्पर्धेचा भाग काढून टाकण्यात आला.
 
ऑल इंडिया रेडिओवर हिंदी गाण्यांना बंदी
भारत सरकारमधील माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री बाळकृष्ण केसकर यांनी सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत असभ्य असल्याचे सांगत त्याच्या एअरटाइमवर 10 टक्के कोटा लागू केला आणि त्यानंतर ऑल इंडिया रेडिओवर चित्रपट संगीताच्या प्रसारणावर बंदी घातली. ऑल इंडिया रेडिओवर बंदी घालण्याच्या केसकरच्या निर्णयामुळे रेडिओ सिलोनने हिंदी सेवा सुरू करत या संधीचा फायदा घेतला. ‘बिनाका गीतमाला’ हे त्याचंच फलित ठरलं आणि अमीन सयानी हा कार्यक्रम सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी घेतल्याने एक विलक्षण जादुई आवाज रेडिओला मिळाला.
 
ऑडिशन न घेताच अमिताभ बच्चन यांना रिजेक्ट केलं?
अमिताभ बच्चन आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीला रेडिओवर ऑडिशन द्यायला गेले होते. मात्र, अमीन सयानी यांना वेळ नसल्याने पहिल्यांदा त्यांची भेट झाली नव्हती. कामाच्या व्यग्रतेमुळे त्यांनी आपल्या सेक्रेटरीला अमिताभ यांना वेळ घेऊन भेटायला यायला सांगितलं. दुस-यांदा अमिताभ वेळ घेऊन भेटायला आले होते, मात्र तेव्हाही अमीन सयानी आणि अमिताभ यांची भेट होऊ शकली नव्हती. अमीन सयानी यांनी अमिताभ यांची भेटच झाली नसल्याने आणि त्यांची मुलाखत घेण्याची संधीच न मिळाल्याने अमिताभ यांना रिजेक्ट करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानंतर अनेक वर्षांनी रेडिओ आणि टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझिंग प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं असताना अमीन सयानी यांनी हा किस्सा सांगितला होता. मात्र तोपर्यंत अमिताभ बच्चन मोठे अभिनेते म्हणून नावारूपाला आले होते.
 
Published By- Dhanashri Naik