सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: रविवार, 22 जानेवारी 2023 (17:03 IST)

MPSC ने काढली आजवरची सगळ्यात मोठी जाहिरात, फॉर्म भरताना काय काळजी घ्याल?

MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल काढलेल्या जाहिरातीत गट ब आणि गट क संवर्गातील 8 हजार 169 पद भरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत गट ब आणि गट क ची संयुक्त पूर्वपरीक्षा-2023 येत्या 30 एप्रिलला होणार आहे. तर मुख्य परीक्षा 2 सप्टेंबरला होणार आहे, तर गट क ची मुख्य परीक्षा 9 सप्टेंबरला होणार आहे.
 
सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक, पोलीस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक अशा एकूण 8,169 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे.
 
वयोमर्यादा मोजण्याची तारीख 1 मे 2023 निश्चित करण्यात आली असून पदसंख्या आणि आरक्षणात वाढ होणार असल्याची शक्यतासुद्धा आहे.
 
फॉर्म कसा भराल?
परीक्षेचा फॉर्म भरणं हे परीक्षेइतकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे तो भरताना अतिशय काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. जाहिरात आल्यावर तातडीने फॉर्म भरा आणि निश्चिंत मनाने अभ्यास करा.
 
सर्वप्रथम संकेतस्थळावरून परीक्षेची जाहिरात डाऊनलोड करून अगदी व्यवस्थित वाचा. आपला जर पहिला प्रयत्न असेल तर परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम, वयोमर्यादा ,अभ्यासक्रम यांवर एकदा नजर टाकावी. आरक्षण, पदांची संख्या, आपल्याला जे पद हवंय त्याची संख्या किती आहे याचा नीट अभ्यास करा.
 
फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम एक शांत जागा, वेगवान चालणारं इंटरनेट आणि पीसी, लॅपटॉप किंवा टॅबलेट शोधा. मोबाईलवर फॉर्म भरू नका. कारण मोबाईलची स्क्रीन छोटी असते. त्यात भलतंसलतं काही दाबल्या गेलं तर नुकसान होऊ शकतं. फॉर्म भरण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, त्या एका कागदावर नीट लिहून घ्या. समजा पहिलाच प्रयत्न असेल तर अनुभवी लोकांकडून ते समजून घ्या.

फॉर्म भरण्याची प्रकिया ऑनलाईन झाली आहे. तेव्हा परीक्षेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एकच मोबाईल नंबर आणि इमेल आयडी ठेवावा. परीक्षेसंबंधी महत्वाच्या सूचना, रजिस्ट्रेशन नंबर या गोष्टी इमेल वर येतात. इमेल आयडी साधा सरळ, आयोगाला समजेल असा ठेवावा.  नुकताच काढलेला एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही स्कॅन करून सेव्ह करून ठेवावी.सही नेहमी जशी करतो तशीच करा आणि तशीच करत रहा. आपली सही ही ऑटोग्राफ नाही. त्यामुळे ती व्यवस्थित करा.आयोगाला हव्या त्या फोटो आणि सही आकारात तयार करून ठेवावेत .म्हणजे अपलोड करतांना अडचण येणार नाही. ते कोणत्या फॉरमॅटमध्ये हवेत ते नीट तपासून घ्या. फोटो जास्त स्पेस घेत असेल तर त्याचा आकार कसा कमी करायचा हे नीट शिकून घ्या. अन्यथा फॉर्म भरताना तारांबळ उडते.
 
अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी घरापासून दूर राहतात. त्यामुळे पत्ता देताना काळजी घ्यावी. आपण कोणत्या प्रवर्गात येता याची खात्री आधीच करून घ्यावी. जातींचे योग्य प्रमाणपत्र वगैरे असल्याची खात्री बाळगावी. नसल्यास योग्य तजवीज तातडीने करावी.

केंद्राची निवड हा अर्जातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. भरपूर अभ्यास करून , खूप तयारी करून समजा केंद्र चांगले नसेल किंवा केंद्राचे पर्याय टाकताना काही चूक झाली तर त्याचा विपरीत परिणाम परीक्षेच्या वेळेला होऊ शकतो. महाराष्ट्रात 37 केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. पण दिवसेंदिवस स्पर्धकांची संख्या वाढतेय. त्यामुळे आपल्याला हवे ते केंद्र मिळण्यासाठी लवकर अर्ज दाखल करावा. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड अशा महानगरात राहणाऱ्या मुलांनी विशेष काळजी घ्यावी. आपण जिथे राहतो तिथपासून केंद्र किती जवळ आहे याचा विचार करा. उदा. पुण्यातून परीक्षा देणार असाल पुणे शहरात कोणतीही शाळा किंवा कॉलेज मिळू शकतं. त्यापेक्षा आपण आपलं शहर केंद्र म्हणून दिलं तर सोपं पडतं. कारण आपल्या शहराची आपल्याला माहिती असते.
 
केंद्राच्या निवडीबाबत ज्येष्ठ विद्यार्थ्यांशीही चर्चा करा. पुण्या मुंबईतून परीक्षा दिली तरच निवड होते अशा गैरसमजुती मनाशी करून घेऊ नये. त्याला काहीही अर्थ नसतो.
 
फॉर्म अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत नीट भरला आहे की नाही याची नीट खातरजमा करा. आपली शैक्षणिक कारकीर्द, त्यात मिळालेले गुण हे खरंतर पाठच करून ठेवावेत.
 
हे करू नका
आपला अर्ज आपणच भरा. कोणाला दुसऱ्याला हे काम सांगू नका. कारण परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. त्यामुळे त्याचं गांभीर्य तुमच्याशिवाय कोणालाच कळू शकणार नाही. तसंच इतरांचा फॉर्मही तुम्ही भरू नका. मदत नक्कीच करा पण लोकांचा फॉर्म भरू नका. अगदी हृदयाच्या जवळच्या व्यक्तीचाही.
 
गटाने अभ्यास करा पण गटाने अर्ज दाखल करू नका. यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता असते. जात प्रमाणपत्र इत्यादी बाबतीत चालढकल करू नये. नंतर अडचणी वाढू शकतात. परीक्षा आहे म्हणून यासाठी कोणताही शॉर्टकट वापरू नका.  
 
एकाच नावाने दोनदा अर्ज करू नका. वाचायला विनोदी वाटेल पण असं करतात लोक. रजिस्ट्रेशन नंबर जपून ठेवा. तो हरवू नका. पाठ करून ठेवला तरी हरकत नाही. एवढ्या अभ्यासात ही पण गोष्ट पाठ होऊन जाईल.
 
पुन्हा एकदा तेच, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका.तसंच आपण पहिल्या दिवशी फॉर्म भरला म्हणून मदत केंद्र उभारू नका. नाहीतर तुमचा वेळ जाईल. त्यामुळे फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा.
 
अभ्यास कसा करावा?
अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण नक्की ही परीक्षा का देत आहोत याचा स्पष्ट विचार उमेदवारांनी करावा. या परीक्षेसाठी आपण किती काळ घालवणार आहोत याची चाचपणी उमेदवारांनी करावी.
 
एकदा हे सगळं झालं की योग्य मार्गदर्शन घेऊन, आधीच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करावा. प्रश्नांची पद्धत, याची समीक्षा करावी. ही परीक्षा उत्तीर्ण केलेल्या लोकांची भेट घेऊन एक नियोजनबद्ध प्लान आखावा आणि त्याची अंमलबजावणी करावी. मार्गदर्शन घेताना ठराविक लोकांचंच मार्गदर्शन घ्यावं. अन्यथा गोंधळ उडण्याची शक्यता असते.
 
स्पर्धा परीक्षेचा प्रवास हा खूप मोठा असतो. त्यामुळे उमेदवारांनी प्रचंड संयम बाळगण्याची गरज असते. हे करत असताना सगळेच दिवस सारखे नसतात. या प्रवासात नैराश्य येऊ शकतं. त्याचीही तयारी ठेवावी. आपली लोक आसपास ठेवावी.
 
यावर्षीच्या परीक्षेत प्रमोद चौगुले प्रथम आले. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "तयारीच्या काळात कोल्हापुरात पूर आला होता. त्यात कोरोनाची साथ होती. प्रमोद तेव्हा पुण्यात होते. पूर्णपणे एकटे होते. त्याही परिस्थितीत त्यांनी अभ्यास केला." त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात चढ उतार येतात. ते सगळं सांभाळून परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रचंड मानसिक तयारी लागते.
 
पियुष चिवंडे सध्या उपजिल्हाधिकारी म्हणून काम करतात. अभ्यास कसा करावा या विषयावर बोलताना ते म्हणतात, "उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये. मी ग्रामीण भागातला आहे, माझी परिस्थिती चांगली नाही, मला हे जमणार नाही असा कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये.स्पर्धा परीक्षा वेळखाऊ असते. त्यामुळे सकारात्मक विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
 
"या प्रवासात आई वडिल आणि कुटुंबीयांची साथ अत्यावश्यक असते. तसंच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेलच असं नाही. याचा अर्थ आधीचे प्रयत्न वाया गेले असं नाही."

Published By- Priya Dixit