करार बरोबरीच्या पातळीवर नाही- अडवाणी
सरकारने आघाडी धर्म पाळला नाही
संपुआ सरकारचे हितसंबंध केवळ अणू करारात अडकलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्येकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. सरकारने जनतेबददलची कटीबध्दता आणि आघाडीचा धर्म दोन्हीही पाळलेले नाही. त्यामुळे सरकारची अवस्था आयसीयुमध्ये पडलेल्या एखादया लाचार रुग्णासारखी झाली आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली. संसदेत विश्वास मत प्रस्तावावर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी गेल्या साडे चार वर्षात संपुआ सरकार आणि पंतप्रधान मनमोहन सिंग सर्वच पातळीवर अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेसोबतच्या सध्याच्या प्रारूपमधील अणूकरारास आपला स्पष्ट विरोध असल्याचे सांगत त्यांनी सरकार केवळ अमेरिकेशी हितसंबंध जोपासण्यासाठी करार करीत असल्याचा आरोप केला. अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करणे योग्य मात्र अमेरिकी विचारांची गुलामगिरी सरकार स्वीकारत असल्याने आपला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अणू करार झाल्यास देशाच्या सुरक्षिततेस धोका पोचू शकतो तसेच पोखरणमध्ये पुन्हा अणूचाचणी करण्याची भारताची क्षमता नष्ट होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. करारामुळे भारत अमेरिकेच्या हातचे बाहुले होईल आणि भाजप कधीही ते होउ देणार नाही. करारामुळे देशाच्या परराष्ट्र संबंधांवरही मर्यादा येईल असा आरोपही त्यांनी केला.अडवाणी म्हणाले, की भाजप कधीही अणू उर्जा निर्मितीच्या विरोधात नाही मात्र अमेरिकी बंधनांमधील अणू उर्जा आम्हाला नको. वाजपेयी सरकारच्या कार्यकाळाची स्तुती करताना त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरणमध्ये अणू स्फोट घडवून आणून देशाच्या ताकदीची जगाला जाणीव करून दिल्याची आठवण करून देतानाच याघटनेमुळे जगात देशाची प्रतिष्ठा वाढल्याचेही सांगितले. भाजप सरकारला विश्वासमत प्रस्तावात पराभूत करू इच्छिते सरकार अस्थिर करण्यात आम्हाला स्वारस्य नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.