शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : रविवार, 26 एप्रिल 2020 (16:28 IST)

कोरोना व्हायरस: उद्धव ठाकरे यांनी मांडलेले 11 महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अक्षय तृतीया, तसंच रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
 
तसंच, लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वेग संथ ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
विशेष म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांचे आभारही मानले.
 
ते म्हणाले, "नितीन गडकरींना मला धन्यवाद द्यायचे आहेत. केंद्रात, राज्यात एकोपा असताना काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीत राजकारण न करता सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत मिळून काम करावं, हे गडकरींनी आवाहन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो."
 
उद्धव ठाकरे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे :
1. रमजानचा महिना सुरू झाला आहे. मुस्लीम बांधवांनी रस्त्यावर नमाज करण्याची ही वेळ नाही. घरीच प्रार्थना करावी.
 
2. देव आता मंदिरात नाही, आपल्यामध्ये आहे. डॉक्टर, पोलीस यांच्या रुपात देव आला आहे. त्यांचा आदर करणं गरजेचं आहे.
 
3. आपल्या दोन पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना मी सगळ्यांच्या वतीनं आदरांजली वाहतो.
 
4. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वेग संथ ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.
 
5. लॉकडाऊन संपवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. सरकार चहूबाजूंनी काम करत आहे.
 
6. नितीन गडकरींना मला धन्यवाद द्यायचे आहेत. केंद्रात, राज्यात एकोपा असताना काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीत राजकारण न करता सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत मिळून काम करावं, हे गडकरींनी आवाहन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
 
7. मजुरांना लवकर गावी पाठवण्याची सोय करू. पण, अद्याप ट्रेन सुरू करण्यात येणार नाही.
 
8. कोटामध्ये राज्यातील विद्यार्थी आहेत, त्यांना तिथून वापस आणणार आहोत.
 
9. ग्रामीण भागात जिल्ह्याच्या वेशी बंदच राहणार आहेत. जिल्हा अंतर्गत वाहतूक मात्र सुरू राहील.
 
10. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 लाख 8 हजार 972 चाचण्या केल्या आहेत. 1 लाख 1 हजार 162 जणांचे नमुने निगेटिव्ह आलेत. जवळपास 7 हजार 628 नमुने पॉझिटिव्ह आले आणि 323 रुग्णांचा मृत्यू झालाय.
 
11. कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. कृषी माल वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.