शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 21 एप्रिल 2021 (14:57 IST)

कोरोनाचे वेगवेगळ्या देशात वेगवेगळे व्हेरियंट कसे आढळत आहेत?

मिशेल रॉबर्ट्स
भारतात 2020 च्या अखेरीस कोरोनाचा नवा व्हेरियंट म्हणजेच नवा प्रकार आढळला, जो त्याआधी यूकेमध्ये आढळला होता.
 
आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या विषाणूतले जनुकीय बदल अधिक संसर्ग करणारे ठरू शकतात. शिवाय, सध्याच्या कोरोना लशी सुद्धा त्यापासून पूर्णपणे सुरक्षा देण्यात कमी पडू शकतात. याबाबत अधिक अभ्यास अर्थातच आवश्यक आहे.
 
भारतातला कोरोना विषाणूचा नवा प्रकार (व्हेरियंट) काय आहे?
कोरोनाचे हजारो प्रकार सध्या अस्तित्वात आहेत.
 
भारतातील कोरोनाच्या व्हेरियंटच्या 100 हून अधिक केसेस यूकेमध्ये आढळले आहेत. या भारतीय व्हेरियंटला B.1.617 असंही म्हटलं जातं. ही मोठी संख्या वाटू शकते. मात्र, यूकेमध्ये ज्या जनुकीय बदलांबाबत विश्लेषण करण्यात आलं, त्या तुलनेत हे एक टक्केच आहेत.
 
इंग्लंडमधील सार्वजनिक आरोग्य विभागानुसार, यातील काही प्रकरणं आंतरराष्ट्रीय केसेसशी संबंधित नाहीत. इथल्या लोकांना त्यांची कशी लागण झाली, याचा शोध सुरू आहे.
 
यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द केला आहे. शिवाय, प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी इंग्लडनं भारताला 'रेड लिस्ट'मध्ये टाकलंय.
मात्र, अद्याप अशी कोणतीही माहिती किंवा आकडेवारी नाहीय, ज्यामुळे असं ठामपणे सांगता येईल की, कोरोनाचा भारतीय व्हेरियंट 'काळजीचं कारण' (Varient of Cocern) आहे. ही संकल्पना यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या व्हेरियंटसाठी वापरण्यात येते आलीय.
 
किंवा, हा व्हेरियंट भारतातील नुकत्याच झालेल्या कोरोनाग्रस्तांमधील वाढीसाठी थेट कारणीभूत आहे, असंही दिसलं नाहीय.
 
यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतील व्हेरियंट काय आहेत?
कोरोनाचे नवीन स्ट्रेन अधिक वेगानं संसर्ग होणारे आणि रोगप्रतिकारक क्षमतेला कमकुवत करणारे सुद्धा असू शकतात.
 
यूके किंवा केंट व्हेरियंट (जो B.1.1.7 म्हणूनही ओळखला जातो) सध्या ब्रिटनमधल्या बऱ्याच भागात दिसून येतो. हाच व्हेरियंट जवळपास 50 हून अधिक देशांमध्ये आढळला असून, तो पुन्हा बदलतही आहे.
दक्षिण आफ्रिकेतील व्हेरियंट (जो B.1.351 म्हणूनही ओळखला जातो) यूकेसह किमान 20 देशांमध्ये सापडलाय.
हे अजिबात अनपेक्षित नाहीय की, नवीन व्हेरियंट तयार झालाय. सर्व विषाणू पसरताना स्वत:चे रुप बदलतात आणि पसरत जातात.
यांच्यातील बहुतांश विषाणूंमधील बदल विसंगत असतात. काही व्हेरियंटच्या अस्तित्त्वालाच धोका असतात, तर काही अधिक संसर्गजन्य, तसंच धोकादायक होतात.
 
नवीन व्हेरियंट्स अधिक धोकादायक आहेत?
नवीन व्हेरियंट्स कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णावर अधिक गंभीर परिणाम करू शकतो, असे कोणतेही पुरावे अद्याप सापडलेले नाहीत.
 
कोरोनाच्या मूळ प्रकारानुसारच, वयस्कर लोकांना आणि इतर आजार असलेल्यांना अधिक त्रासाचा सामना या व्हेरियंट्समध्येही करावा लागू शकतो.
 
यूके व्हेरियंट्सबाबत विचार केल्यास, काही संशोधनांनी असं सूचवलंय की, रुग्णांच्या मृत्यूची भीती 30 टक्क्यांनी वाढू शकते. मात्र, हा पुरावा काही अंतिम निष्कर्ष मानता येणार नाही.
 
संसर्ग टाळण्यासाठी आपल्याला हात धुणे, अंतर राखणं, मास्क परिधान करणं याबाबत अधिक जागरूक असणं आवश्यक आहे.
 
नवीन व्हेरियंट्स कसे बदलत आहेत?
यूके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि भारतातील व्हेरियंट्समध्ये त्यांच्या स्पाइक प्रोटीनमध्ये बदल झाला आहे. या विषाणूची माणसाच्या मानवी पेशींना लागण होते.
 
N501Y म्हणून ओळखला जाणारा म्युटेशन विषाणूला पेशींना संसर्ग करण्यास आणि त्यात पसरण्यास अधिक प्रबळ ठरत असल्याचं दिसून आलंय.
 
तज्ज्ञांच्या मते, यूके आणि केंट व्हेरियंट हा 70 टक्क्यांहून अधिक संसर्गजन्य आहे. इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मते, हीच टक्केवारी 30 ते 50 टक्क्यांच्या दरम्यान आहे.
 
दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील व्हेरियंट्स हे स्पाईक प्रोटीनमध्ये बदलण्यासाठी अधिक सक्षम असल्याचे दिसून आले आहेत. यामध्ये E484K नावाचं महत्त्वाचं जनुकीय बदल झालाय. त्यामुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच अँटीबॉडीज ते भेदू शकतात. या अँटीबॉडीज आधीच आपल्याला लागण झाल्यानं किंवा लशीच्या माध्यमातून मिळालेल्या असतात.
 
आधीच्या संसर्गाच्या अनुभवावर किंवा लशीमुळे हे कोरोनाशी लढू शकतात.
 
तज्ज्ञांना काही यूके व्हेरियंटमध्येही अलिकडे हा बदल दिसून आलाय.
 
भारतीय व्हेरियंट्समध्ये (E484Q, L452R and P681R) काही महत्त्वाचे बदल आढळून आले आहेत, ज्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाचू शकते. त्यामुळे तज्ज्ञ सध्या याचा तातडीनं अभ्यास करत आहेत.
 
लस कोरोनाच्या व्हेरियंट्ससोबत लढू शकते?
खरंतर कोरोना लस मूळ विषाणूला डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आलीय. मात्र, नव्या व्हेरियंटबाबत म्हणावी तितकी प्रभावी ठरली नाही, तरी किमान पातळीवर उपयुक्त ठरू शकते, असा विश्वास तज्ज्ञांना वाटतो.
 
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, ब्राझीलियन व्हेरियंट आधीच ज्यांना कोरोना झालाय आणि काही प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती आहे, त्यांच्यातील अँटीबॉडीजना विरोध करू शकतो.
 
काही प्रयोगशाळांचे निष्कर्ष आणि वास्तवातील काही माहिती अशी सूचवते की, फायझर लस नव्या व्हेरियंटवरही परिणामकारक ठरतेय. मात्र, या परिणामकारकतेचं प्रमाण कमीच आहे.
 
ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेका लशीच्या टीमकडून सूचवण्यात आलंय की, ही लस नव्या यूके व्हेरियंटविरोधातही तितकची परिमामकारक आहे. मात्र, ही लस दक्षिण आफ्रिकेच्या व्हेरियंटविरोधात कमी परिणामकारक ठरत असली, तरीही रुग्णांना गंभीर होण्यापासून वाचवते.
 
दक्षिण आफ्रिकेच्या व्हेरियंटविरोधात मॉडर्ना लस परिणामकारक काम करते.
रोगप्रतिकारक प्रतिसाद तितका भक्कम किंवा दीर्घकाळ टिकणारा असू शकत नाही. मात्र, रोगप्रतिकारक प्रतिसाद तितका भक्कम किंवा दीर्घकाळ टिकणारा असू शकत नाही.
 
नोवाव्हॅक्स आणि जॉन्सन या दोन नव्या लशींना अद्याप मंजुरी मिळाली नसली, तरी त्या कोरोनाच्या व्हेरियंट्सपासून बचाव करताना दिसतायेत.
 
तज्ज्ञांच्या मते, नवीन विषाणू जरी बदलत असले, तरी लशीतही त्याप्रमाणे बदल करता येऊ शकतो.
 
यूके सरकारनं अशी घोषणा केलीय की, नव्या व्हेरियंट्सविरोधात लढणारी लस विकसित करण्यासाठी CureVac या बायोफार्मास्युटिकल कंपनीसोबत आधीच एक करार केलाय. शिवाय, 5 कोटी डोसेसची आधीच ऑर्डरही देऊन ठेवलीय.