सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 12 जून 2020 (07:55 IST)

भारत डेंजर झोनमध्ये : पुन्हा लागू होऊ शकतो लॉकडाउन

भारतात हळहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत असला, तरी वाढत चालेल्या रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. एका संस्थेनं केलेल्या अभ्यासातून भारताच्या काळजीत भर टाकणारे निष्कर्ष समोर आले आहेत. जपानस्थित सुरक्षेसंबंधित नोमुरा संस्थेनं कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील 45 अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला आहे. यात भारत (डेंजर झोन) मध्ये (धोकायदायक श्रेणी) असल्याचं म्हटलं आहे. भारतात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती असून, लॉकडाउन लागू होऊ शकतो, असं नोमुरानं म्हटलं आहे.
 
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केला होता. अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर देशातून लॉकडाउन शिथिल करण्यात येत आहे. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असताना जपानमधील नोमुरा या संस्थेनं केलेल्या अभ्यासानं भारताच्या चिंतेत भर पडली आहे. नोमुरानं आपल्या संशोधनात जगातील सर्वात मोठ्या 45 अर्थव्यवस्था असणार्‍या देशांची श्रेणीनिहाय विभागणी केली आहे. यात पहिली श्रेणी ऑन ट्रॅक, दुसरी वॉर्निंग साइन व तिसरी डेंजर झोन अशी वर्गवारी करण्यात आली आहे. नोमुरानं केलेल्या अभ्यासानुसार लॉकडाउन हटवल्यानं दोन प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
 
पहिली स्थिती (चांगले संकेत) :लॉकडाउन हटवल्यानंतर लोकांचं कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण वाढेल. दररोज काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढू शकते. पण, लोकांची भीती कमी होईल. त्यामुळे व्यवसाय सुरू होतील, जनजीवन पूर्वपदावर येईल. जसंजशी रुग्णांची संख्या कमी होईल, तसे सकारात्मक परिणाम दिसून येतील.दुसरी स्थिती (वाईट परिणाम) :लॉकडाउन हटवून अर्थव्यवस्थेला चालना देतानाच कोरोनाचं संक्रमण वाढत जाईल. त्याचबरोबर बाधित रुग्णांची संख्याही वाढत जाईल. यामुळे लोकांच्या मनात भीती वाढेल आणि जनजीवन पुन्हा विस्कळीत होईल. अत्यंत गंभीर स्थितीत लॉकडाउन पुन्हा लादला जाऊ शकतो, असा निष्कर्ष नोमुराच्या अभ्यासात मांडण्यात आला आहे.