कोरोना प्रादुर्भाव वाढला, एकाच गावातील तब्बल २७ जणांचा कोरोना
रत्नागिरीमधील खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असतानाच तालुक्यातील ग्रामीण भागात आंबवली वरवली धुपे वाडीतील तब्बल २७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आर. बी. शेळके यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी रोजी वरवली धुपेवाडीमधील एक रुग्ण आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याचे नमुने घेतले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णाच्या संपर्कातील ४७ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा येथील आरोग्य विभागाला प्राप्त झाला असता त्यामध्ये तब्बल २७ जणांना कोरोनाचा प्रादूर्भाव झाला असल्याची बाब उघड झाली.
वरवली धुपेवाडी लोकसंख्या १५० इतकी असून संपर्कातील वाड्या ठाणकेश्वरवाडी,सुतारवाडी, देऊळवाडी, गावठाणवाडी , धनगरवाडी या वाड्यांचे सर्वेक्षण चे काम हाती घेण्यात आले आहे. सर्व कोरोनाबाधितांना कळबणी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील गावातील अन्य लोकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.