रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: रविवार, 5 नोव्हेंबर 2023 (18:01 IST)

IND vs SA: विराट कोहलीचं शतक, सचिनच्या विक्रमाची बरोबरी

बर्थ डे  बॉय विराट कोहलीनं ईडन गार्डन्सवर शानदार शतक ठोकलं आहे.
 
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकाच्या सामन्यात विराटनं शतकी खेळी केली आणि सचिन तेंडुलकरच्या वन डेत सर्वाधिक 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.
 
35 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या विराटच्या या खेळीनं भारताच्या डावालाही आकार दिला आहे.
 
विराटनं न्यूझीलंडविरुद्ध 5 तर श्रीलंकेविरुद्ध 12 धावांनी शतकाची संधी गमावली होती. तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती.
 
या सामन्यात टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित आणि शुबमननं आक्रमक सुरुवात केली. दोघांनी सलामीला 62 रन्सची भागीदारी रचली.
 
मग कागिसो रबाडानं रोहित शर्माला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. तोवर रोहितनं 24 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 40 धावा केल्या होत्या.
 
मग दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजनंही पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली. त्यानं शुबमन गिलला 23 धावांवर बाद केलं.
 
केशवनं अचूक गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना जखडून ठेवलं.
 
पहिल्या 10 ओव्हर्समध्ये 91 धावा करणाऱ्या टीम इंडियानं पुढील 10 ओव्हर्समध्ये फक्त 35 धावा काढल्या.
 
विराट कोहली आणि श्रेयस अय्यरनं या जोडीनं आणखी पडझड होऊ दिली नाही. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागिदारीही केली.
 
विराट आणि श्रेयसची जमलेली जोडी ल्युंगी एंगिडीनं फोडली. त्यानं श्रेयसला बाद केलं. श्रेयसनं 87 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि दोन षटकारांसह 77 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
 
केएल राहुलला मोठी धावसंख्या रचण्यात अपयश आलं. तो फक्त 8 धावांवर बाद झाला.
 
तर सूर्यकुमार यादव 22 रन्सची छोटी पण स्फोटक खेळी करून माघारी परतला.
 
भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर दुसरिकडं दक्षिण आफ्रिकेनं जेराल्ड कोट्झीच्या जागी तरबेझ शम्सीचा टीममध्ये समावेश केलाय.
भारतानं आत्तापर्यंत सातपैकी सात सामने जिंकले असून गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेनं सातपैकी सहा सामने जिंकले आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
 
भारताचा आत्तापर्यंतचा रनरेट (2.202) हा दक्षिण आफ्रिकेपेक्षा (2.290) कमी आहे. त्यामुळे पाँईट टेबलमध्ये नंबर 1 वर राहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागेल.
 
गोलंदाजांची परीक्षा
टीम इंडियानं उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. आता फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकन फलंदाजीसमोर पाच गोलंदाजांनी खेळणाऱ्या भारतीय टीमची कसोटी लागेल.
 
जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटानं या स्पर्धेत दहशत निर्माण केलीय. या त्रिकुटाच्या गोलंदाजीपुढं मुंबईत झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा संपूर्ण संघ फक्त 55 धावांवर बाद झाला होता.
 
दुसरिकडं दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना पाचही वेळा 350 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकनं चार शतकांसह सात सामन्यात 545 धावा केल्यात.
 
रॅसी वॅन देर ड्यूसेन, एडन मार्काराम, हाईनरीक क्लासेन आणि डेव्हिड मिलर हे आफ्रिकेच्या मधल्या फळीतील सर्वच फलंदाज फॉर्मात आहेत.
 
वेगवान तसंच फिरकी मारा सहज खेळून काढणाऱ्या या सर्वांना रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांना खास रणनीती आखावी लागेल.
या सामन्यासाठी दोन्ही संघ असे आहेत :
 
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
 
दक्षिण आफ्रिका : टेंबा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रॅसी वॅन देर ड्युसेन, एडन मार्काराम, हाईनरीक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, तरबेझ शम्सी, ल्युंगी एंगिडी.
 
 




Published By- Priya DIxit