शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By वेबदुनिया|

रामलीला महोत्सव!

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

नवरात्री आणि दसऱयाच्या निमित्ताने उत्तर भारतात रामलीला महोत्सव साजरा केला जातो. रामलीला म्हणजे राम चरित्राचे नाटयरूपाने सादरीकरण मंदिर परिसरात शंखध्वनी करून ग्राम पुरोहित शास्त्री राम चरित्राचे परायण सुरू करायचा. या पारायणाला साथ प्रत्यक्ष नाटयदर्शनाची असायची. यातूनच पुढे रामलीला हा स्वतंत्र कलाप्रकार रूढ झाला.

रामलीला म्हणजे नृत्य, नृत्य-नाटय, गीत, संवाद, नेपथ्य आदीचा सुंदर मिलाप. रामलीला या कलाप्रकाराला सुमारे ४०० वर्षाची परंपरा आहे. वाराणसी येथे रामलीलाचे अतिशय रंजक दर्शन घडते. संत तुलसीदासाचे रामायण रामलीला प्रसंगी हमखास म्हटले जाते. रामलीला हे भक्तीनाटय असून ते विविध स्थळांवर सादर केले जाते. रामलीलेत पात्रे रंगमंचावर येताना त्याच्यासाठी विविध प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. रामलीला सुरू असताना काही कलावंत माकडे होतात. या माकडांचा सर्वत्र संचार असतो. रामलीलेत मंजिरी, ढोल, पखवाज आदी वांद्यांचा वापर केला जातो. 'व्यास` हा रामलीलेचा दिग्दर्शक असतो. तो धोतर, पांढरे मुंडासे घातलेला असतो. तो रंगमंचावर कलावंतांच्या बाजूला बसून त्यांना संवादाच्या सुचना करीत असतो. रामलीलेतील पात्रांचे संवाद हे 'स्वगत` 'खंडित स्वगत` 'आत्मगत` या स्वरूपाचे असतात. जर एखादा महत्वाचा संवाद पात्राने सादर केला तर त्याच्या पुष्ट्यर्थ 'बोल सीयावर रामचंद्र की जय` असा जयजयकार रामलीलेत केला जातो. कथानक सुरू असतानाच कधी कधी प्रेक्षकांमधून नामघोष सुरू असतो त्यामुळे कलावंतांची एकाग्रता भंग पावत नाही, उलट ते अधिक जोमाने संवाद सुरू ठेवतात.

रामलीलेतील सर्व पात्रे पुरूष मंडळीच साकार करतात. १४ वर्षाखालील मुलगा सीतेचे पात्र साकार करतो. सर्व पात्रे ब्राम्हण मंडळी साकार करतात. रंगभूषा, वेशभूषेला स्वतंत्र स्थान रामलीलेत असते. रावणाचे शीर हे दहा शीरांचा केला जाते. 'रामायणी ` हा स्वतंत्र कलावंत संच रामलीलेत असतो. हा संच माकडे, सैनिक, राक्षस सर्वसामान्य जनता अशी कामे करतात. रामलीलेत एकेकाळी लाऊडस्पीकरचा वापर वर्ज्य समजला जाई. रघुनाथ दत्त शर्मा यांनी रामलीलेत 'व्यास` म्हणून काम केले.

वाराणसी म्हणजेच काशीच्या रामलीलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व आहे. सुमारे १२५ वर्षापूर्वी महाराजा उदिता नारायण सिंह यांनी रामलीला सुरू केली. महाराजा उदिता नारायण सिंह यांची पत्नी आजारी होती. रामलीला सुरू असताना त्यांना सीतेच्या गळयातील हार देण्यात आला. हा हार त्यांनी आजारी पत्नीच्या गळयात घातला त्यामुळे तिची आजारातून मुक्तता झाली. तुलसीदासांच्या रामचरित मानसला बोलीचा लहेजा देत विविध ठिकाणी रामलीला सादर होत असते.