निर्माता : आदित्य चोप्रा दिग्दर्शक : शिमित अमीनि पटकथा-संवाद-गीत : जयदीप साहनी संगीत : सलीम-सुलेमान कलाकार : शाहरुख खान, विद्या माळवदे, अंजन श्रीवास्तव, जावेद खान
हिंदी चित्रपटसृष्टीत खेळ हा विषय एकतर दुर्लक्षित राहिलेला. बरं जे काही चित्रपट निघाले त्यात क्रिकेटवरच जास्त भर दिलेला. इतर खेळांकडे फारसे लक्ष आतापर्यंत कोणत्याही दिग्दर्शकाचे गेले नव्हते. मात्र, आता यशराज फिल्म्सने चक दे इंडियातून हॉकी खेळावर चित्रपट प्रदर्शित केला आहे. चित्रपटाची भट्टीही चांगलीच जमली आहे.
दिग्दर्शक सिमित अमिन याचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी त्याने अब तक छप्पन हा चित्रपट बनवला आहे.
चक दे इंडिया ही कथा आहे एका प्रशिक्षकाची व त्याच्या 16 जणांच्या महिला हॉकी संघाची. कबीर खान (शाहरूख खान) हा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार असतो. तो एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू असतो मात्र पाकिस्तानाविरुद्धच्या एका सामन्यात तो पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी ठरतो व तेव्हापासून पूर्ण देश त्याला गद्दार म्हणू लागतो. त्यामुळे त्याची कारकीर्द तेथेच संपते.
आपल्यावर लागलेला कलंक मिटवणे हे त्याचे उद्दिष्ट असते. म्हणून तो फारसे नाव नसलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारतो. 16 महिला खेळाडूंना तो प्रशिक्षण द्यायला लागतो. त्याच्या पुढे फक्त एकच ध्येय असते ते म्हणजे महिला संघाला हॉकी विश्वचषक मिळवू द्यायचा.
महिला हॉकी संघटनाही महिलांच्या संघाकडे दुर्लक्ष करत असते. त्यामुळे कबीरला प्रथम त्यांच्याशी सामना करावा लागतो. त्यासाठी तो महिलांच्या संघाचा पुरूष हॉकी संघाशी सामना घडवून आणतो.
IFM
IFM
प्रशिक्षण काळातील गमती जमती, गंभीर प्रसंग, सामन्यांमधील उत्कंठता दिग्दर्शकाने चांगलीच रेखाटली आहे. क्रिकेट सोडूनही इतर खेळांमध्येसुद्धा तितकीच उत्कंठता असते हे या चित्रपटात दिग्दर्शक अमिन यांनी दाखवून दिले आहे.
मध्यंतरानंतर ऑस्ट्रेलियातील भारताचे सामने फार छान चित्रित केले आहेत. निवेदनाच्या रूपात चित्रपट पुढे सरकत राहतो. अंतिम सामन्यातही शेवटापर्यंत प्रेक्षक श्वास रोखून पाहत राहतो.
दिग्दर्शकाने चित्रपटाला सुरुवातीपासून जी गती दिली आहे ती शेवटापर्यंत टिकवली आहे, त्यामुळे कुठेही कंटाळा येत नाही. या चित्रपटामुळे हॉकीकडे मुलींचा कल वाढला तर आश्चर्य वाटायला नको.
शाहरुखनेही कबीरच्या भूमिकेत प्राण ओतला आहे. इतरही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे.
चित्रपटातील चक दे इंडिया हे गाणे आकर्षक आहे. सलिम-सुलेमानच्या जोडीने चांगले संगीत दिले आहे.
IFM
IFM
एकंदरीत यश चोप्रा यांनी एक चांगले कथानक घेऊन उत्कृष्ट चित्रपट काढला आहे. आतापर्यंतच्या हिंदी चित्रपटांमध्ये जे काही वेगळे किंवा हटके चित्रपट आहेत त्यात चक दे... चा समावेश करण्यास हरकत नाही.