शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By वेबदुनिया|

चैत्रागौर व हळदीकुंकू

अजादान :  अजा = शेली. चैत्र मास कोणत्याही शुभ दिवसापासून तीन दिवस भोजन करतात. दुधाने भिजवलेल्या तांदळाच्या पिठाची भाकरी हे भोज्य अन्न समजतात. भोजनापूर्वी चंदनाने पार्वतीची दशभुजा प्रतिमा रेखतात. ज्वालामुखी या नावाने तिची पूजा करतात. तिसर्‍या दिवशी पाच दुधाळ शेळ्या ब्राह्मणास दान देतात. दानाचे फल- मोक्ष.

आनंदव्रत : या व्रतात अयाचित जलदान करावयाचे असते, व्रतावधी चैत्रादी चार महिने. व्रताच्या अंती अन्न, वस्त्र, तिलपात्र व सुवर्ण यांचे दान करावयाचे असते. फल-ब्रह्मलोकाची प्राप्ती व कल्पती राजपद.

तिथीपूजन : प्रतिपदादी प्रत्येक तिथीला तिथीस्वामीची पूजा करून हे व्रत केले जाते. त्याचे विधिविधान असे - प्रात:स्नान उरकून वेदीवर किंवा चौरंगावर लाल वस्त्र पसरून त्यावर अक्षतांचे अष्टदल काढावे. ज्या दिवशी जी तिथी असेल त्या दिवशी त्या तिथीच्या स्वामीची सुवर्णमूर्ती अष्टदलाच्या मध्मभागी स्थापन करून तिची पूजा करावी. निरनिराळ्या तिथीचे स्वामी पुढीलप्रमाणे आहेत.

प्रतिपदा : अग्निदेव, द्वितीया - ब्रह्मा, तृतीया-गौरी, चतुर्थ- गणेश, पंचमी-सर्प, षष्ठी-स्वामी कार्तिक, सप्तमी-सूर्य, अष्टमी- शिव (भैरव), नवमी-दुर्गा, दशमी- अन्तक (यमराज), एकादशी- विश्वेदेवा, द्वादशी-हरी (विषाणू), त्रयोदशी-कामदेव, चतुर्दशी- शिव, पौर्णिमा-चंद्र, अमावस्या-पितर. या तिथीस्वामीचे पूजन त्या त्या तिथीला करावे म्हणजे हर्ष, उत्साह आणि आरोग्य यांची अभिवृद्धी होते.

गौरी तृतीया : हे व्रत चैत्र शु. तृतीयेला करतात. विवाहित स्त्रिया या दिवशी प्रात:स्नान करून उत्तम रंगीत वस्त्र (लाल साडी) परिधान करतात. नंतर शुद्ध व पवित्र अशा जागी 24 अंगूळे लांबीरुंदीची चौरस वेदी किंवा पेढी बनवतात. त्यावर केशर, चंदन आणि कापूर यांचे मंडळ काढून त्यावर सुवर्णाची किंवा चांदीची मूर्ती स्थापन करतात. अनेक प्रकारच्या फल पुष्प दूर्वा गंधादी साहित्याने तिचे पूजन करतात. त्याच ठिकाणी गौरी, उमा, ‍लतिका, सुभगा, भगमालिनी, मनोन्मना, भवानी, कामदा, भोगवर्धिनी आणि अंबिका यांचे गंधपुष्पादींनी पूजन करतात. भोजन म्हणून फक्त एकदा दुग्धपान करतात. असे केल्याने पतिपुत्रादी सौख्याची अखंड प्राप्ती होते.

हे व्रत चै‍त्र शु. भाद्रपद शु. किंवा माघ शु. तृतीयेस करतात.

गौरीविवाह : हे एक व्रत आहे, चैत्र शु. तृतीया, चतुर्थी किंवा पंचमी या तिथीस गौरी व शिव यांच्या मूर्ती करून त्यांचा विवाहसमारंभ करणे, असा या‍चा विधी आहे. मूर्ती करण्यासाठी सोने, चांदी, रत्ने, चंदन इ. पदार्थ वापरतात. फल - उत्तम पतीची प्राप्ती.

गौरीविसर्जन : हे व्रत चैत्र शु. तृतीयेला करतात. होळीच्या दिवशी (फाल्गुन व. प्रतिपदा) ज्या कुमारिका आणि विवाहित बालिका दररोज गणगौरीचे पूजन करतात, त्या चैत्र शु. द्वितीयेला आपल्या पुजा केलेल्या गणगौरी एखाद्या नदी, तलाव किंवा सरोवराकाठी नेऊन त्यांना उदक प्राशन करण्यास देतात आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी त्यांचे विसर्जन करतात. या व्रतापासून विवाहित मुलींना पतिप्रेमाची प्राप्ती होते आणि अविवाहित कन्यकांना उत्तम वराची प्राप्ती होते.

 
चैत्रागौर व हळदीकुंकू : चैत्र. शु. तृतीयेच्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया गौरीला देव्हार्‍यात बसवितात आणि पुढे महिनाभर तिची पूजा करतात. या महिन्यात कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदीकुंकवाचा समारंभ करतात. त्यासाठी गौरीपुढे रांगोळ्या काढतात. गौरीला वस्त्रालंकारांनी नटवतात. तिच्यापुढे रंगीबेरंगी चित्रे, नानाप्रकारची फळे व खाद्यपदार्थ मांडून आरास करतात. असोल्या नारळांना कुंच्या घालून ती बाळे म्हणून गौरीपुढे ठेवतात. कोंकणात हळदी-कुंकवाला आलेल्या सुवासिनिचे व कुमारिकांचे पाय धुऊन त्यांच्या हातांवर चंदानाचे लेप करतात आणि त्यावरून शिरा असलेली शिंप फिरवितात. भिजवलेल्या हरबर्‍यांनी आणि फळांनी त्यांची ओटी भरतात. त्यांना आंब्याची डाळ व पन्हे देतात. गौरीची आरती करताना 'गौरीचे माहेर' नावाचे गाणे म्हणण्याची कोंकणात चाला आहे. या महिन्यांत गौरी आपल्या माहेरी येते, आपल्या आईकडून सर्वप्रकारची कौतुके करून घेते, मैत्रिणीबरोबर खेळते, झोपाळ्यावर बसून झोके घेते आणि अक्षय तृतीयेला परत सासरी जाते, अशी समजूत आहे.

या उत्सवाचा प्रचार विशेषकरून ब्राह्मणांत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महिनाभरातील या उत्सवात सवडीप्रमाणे शुक्रवार, मंगळवार किंवा दुसर्‍या एखाद्या शुभदिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया सुवासिनींना हळदीकुंकवास बोलावतात, तसेच घरोघर जातात, पुरुष आपल्या मित्रमंडळीस त्या निमित्ताने फराळास बोलावतात व परिचय वाढवितात. आणि अशाप्रकारे हा महिना आमोदप्रमोदात जातो.