गृहप्रवेश आणि लक्ष्मीपूजन
गृहप्रवेश आणि लक्ष्मीपूजन
झाल झाली की मुलीची सासरी पाठवणी होते. नवीन घरात वधूचा गृहप्रवेश केला जातो. वधूला लक्ष्मी मानतात. म्हणून सासरच्या घरात प्रथम प्रवेश करताना वधू आणि वरावरून दहीभात ओवाळून त्यांची दृष्ट काढतात. नंतर वधूला दारात ठेवलेले माप ओलांडून गृहप्रवेश करायचा असतो. घराच्या उंबरठ्यावर तांदूळ भरून माप ठेवतात.
नववधूने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने हा माप घराच्या आत पाडायचा असतो. नवीन नवरीला लक्ष्मीचे रूप मानतात आणि घरात लक्ष्मी आल्यावर घरात धान्यच्या रूपाने समृद्धी येऊ दे अशी कल्पना असते. नंतर गृहलक्ष्मीचा घरात प्रवेश केल्यावर नववधू आणि नवरदेव देवाच्या पाया पडतात आणि नंतर घरातील वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद घेतात.
नंतर वर आणि वधू कडून लक्ष्मीपूजन केले जाते. नैवेद्यासाठी लक्ष्मीपुढे पेढे ठेवले जातात. लक्ष्मीच्या पुढे एका ताटात तांदुळ पसरवून वर सोन्याच्या अंगठीने वधूचे नाव लिहितो. काही घरांमध्ये वधूचे नाव बदलण्याची पद्धत आहे. नंतर वर पेढे वाटून वधूचे नाव सांगतो. घरातील सर्व उभयतांना नमस्कार करून वर आणि वधू आशीर्वाद घेतात. नंतर वरपक्षाकडून वधूपक्षाचें मानपान करून त्यांची पाठवणी केली जाते.