लाजाहोम व अग्निप्रदक्षिणा विधी
मंगळसूत्र बंधन विधीच्या नंतर लाजाहोमची विधी असते. त्याला विवाहहोम देखील म्हटले जाते.
विवाहहोमाचे पाच देव आहे त्यांना आवाहन करण्यासाठी ही विधी केली जाते. विवाह होम नंतर लाजाहोम केले जाते. या लाजाहोमाचे तीन देव आहे त्यांना आवाहन केले जाते. या होमात लाह्यांची आहुती दिली जाते. लाजाचा अर्थ लाह्या असे आहे.
या विधी मध्ये बोहल्यावर नवरदेव पूर्वीकडे तोंड करून पाटावर बसतो.नववधू त्याच्या उजव्या बाजूला पाटावर बसते. त्यांच्या समोर होमपात्र आणि पाण्याने भरलेला कलश ठेवलेला असतो. होमपात्राच्या पश्चिमेला पाटा व वरवंटा आणि ईशान्येला साळीच्या लाह्या ताटात ठेवतात.
उत्तरेला तांदुळाचे सात पुंजके पूर्व पश्चिम मांडले जाते. वर हातात समिधा घेऊन विवाहहोमाचा संकल्प सोडतो.
हे अग्निदेव मी स्वीकारलेल्या या वधूला भार्यात्व यावे व गृह्याग्नी सिद्ध होण्यासाठी मी लाजाहोम करत आहे. आम्हाला तुम्ही बळ द्या, पुत्र द्या, धन धान्य द्या. असे म्हणून अग्नी प्रज्वलित करतो.
होमात तूप टाकून नवरदेव अग्नये पवमानाय, इदं न मम, असे म्हणतो. गुरुजी अग्नीचे व प्रजापतीचे मंत्र म्हणतात.
नंतर वर पाटावरून उठून वधूच्या उजव्या हाताला आपल्या उजव्या हातात घेऊन मी तुझा पाणिग्रहण करत आहे. त्या प्रमाणे अर्यमा, सविता, भग, पूषा या चार देवांनी आपल्याला गृहस्थाश्रमासाठी एकत्र आणले आहे.
नवरदेव पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसतो. वधू हाताला ताम्हणात स्वच्छ धुवून पाटावर उभे राहून हाताची ओंजळ करते त्या ओंजळीत थोडे तूप आणि दोन मूठ लाह्या वधूचा भाऊ टाकतो. नवरदेव ओंजळीत लाह्यांवर तुपाची धार धरतो आणि मंत्र म्हणतो.
देदिप्यमान अर्यमा तुला मातृकुलातून मुक्त करून माझ्या कुलात समरस होण्याची प्रेरणा देवो. असे म्हणून आपल्या दोन्ही हातांनी वधूची ओंजळ तिरकी करून लाह्या होमात टाकतो. वधूच्या ओंजळीत लाह्या देणारा भाऊ नवरदेवाची उजवे कान धरून पिरगळतो आणि माझ्या बहिणीचा सांभाळ नीट करा असे वराला बजावतो. याला कानपिळीचा विधी म्हणतात. नवरदेव वधूच्या भावाला वस्त्र किंवा पैशाचे पाकीट देऊन त्याला मान देतात. अशा प्रकारे लाजाहोम विधी संपन्न होतो.
नंतर नवरदेव आणि वधू लाजाहोमासाठी पाटावर बसतात त्यांच्या समोर होमकुंड आणि पाण्याने भरलेले कलश ठेवतात. लाह्या होमपात्रात टाकल्यावर वधूचा हात आपल्या हातात घेऊन पाण्याचा कलश आणि अग्नीला प्रदक्षिणा घालतो. तो पुढे चालतो आणि वधू त्याचा हात धरून त्याच्या मागे चालते.
प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर वधू पाटावर किंवा जवळ ठेवलेल्या सहाणीवर पाय ठेऊन उभी राहते नवरदेव मंत्र म्हणतो. हे वधू, तू या पाषाणाप्रमाणे घट्ट हो. आपल्या हितशत्रूंचा सद्वर्तनाने नाश कर. अग्नीच्या भोवती तीनवेळा प्रदक्षिणा घालतात. या विधी द्वारे अग्निब्राह्मणांच्या साक्षीने नवरदेव आणि नववधू लग्नाच्या बंधनात बांधले गेले असे म्हणतात.
Edited By - Priya Dixit