रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2024 (11:24 IST)

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय सोळावा

॥ श्रीगणेशाय नम: ॥
श्रीकृष्णास विनवी राजा धर्म ॥ गौतम ऋषीची भार्या अतिउत्तम ॥ अहिल्या महासती जाण ॥ किमर्थ हें व्रत करी ॥१॥
ती लावण्य पतिव्रता ॥ स्वरुप जिचें पाहतां ॥ शशीसूर्य लाजती तत्वतां ॥ ते कासया व्रत करीत ॥२॥
धर्मास म्हणे नारायण ॥ बरवा उत्तम केला प्रश्न ॥ आतां होई सावधान ॥ सांगतों हे कथा तुजप्रती ॥३॥
कोणे एके दिवशीं अवसरीं जाण ॥ ब्रह्मदेव मनीं विचार करुन ॥ निर्मिता झाला कन्यारत्न ॥ अहिल्याकमतियेची ॥४॥
तिच्या स्वरुपावरून ॥ ओवाळा अप्सरा जाण ॥ रंभा लाजे तिज देखून ॥ उर्वशी खालीं पाहत ॥५॥
पदनखावरुनी सत्य ॥ मेनका ओंवाळावी यथार्थ ॥ मदन स्वस्थकांतज देख ॥ लाजोनियां उगाची ॥६॥
ऐसी ते अहिल्यासती ॥ निर्माण करी सावित्रीचा पती ॥ तिजतुल्य त्रिजगतीं ॥ दुसरी कन्या नसेची ॥७॥
तिचे करावया लग्न ॥ ब्रह्मा करी विचार पूर्ण ॥ इंद्रासह वर्तमान ॥ लग्नालागीं पातले ॥८॥
ऋषीसी पाठविल्या पत्रिका ॥ तेही आले लग्नास देखा ॥ भूपति आणि त्याच्या नाईका ॥ लग्नालागीं सर्व आले ॥९॥
ब्रह्म म्हणे यानें मंडप केला थोर ॥ त्यांत बैसले समग्र ॥ मग ब्रह्मा जोडोनी कर ॥ विनंती करी सर्वांसी ॥१०॥
तुम्ही सकळ मिळोन ॥ जावें पृथ्वी प्रदक्षणा लागोन ॥ जो सत्वर येईल परतोन ॥ त्यासी प्राप्त कन्या हे ॥११॥
ऐसें ऐकतां वचन ॥ तात्काळ सभा उठली संपूर्ण ॥ धांवती वहानी बैसून ॥ पृथ्वी प्रदक्षणा कारणें ॥१२॥
इंद्र बैसला ऐरावतावरी ॥ शिव नंदीवरी निर्धारीं ॥ चक्रपाणी गरुडावरी ॥ बैसोनियां धांवला ॥१३॥
उंदिरावरी बैसून गणपती ॥ यन हेल्यावरी निश्चितीं ॥ बैसोन धांविले निजप्रती ॥ प्रदक्षणा करावया ॥१४॥
पायी चालले ऋषेश्वर ॥ कोणी रथीं बैसले सत्वर ॥ कोणी अश्वावरी साचार ॥ बैसोनियां धांविन्नले ॥१५॥
इंद्र म्हणे आमुचा हत्ती ॥ सत्वर कां न चाले निश्चितीं ॥ यास रोग आला निश्चितीं ॥ म्हणून तांडण करी तया ॥१६॥
यम म्हणे आमुचा हेला ॥ सत्वर न चाले वहिला ॥ कोण यासी रोग आला ॥ न चालेचि सत्वर ॥१७॥
इकडे शिव म्हणे आमुचे ढोर ॥ लवकर न चाले रांडिचोमर ॥ फार तांतडी करी रुद्र ॥ ताडण करीत नंदीतें ॥१८॥
गरूडावरी ह्मणी श्रीहरी ॥ कांरे न चालसी लवकरी ॥ म्हणून रागास आला हरी ॥ गरुडावरी तेधवां ॥१९॥
गणपती म्हणे आमुचा उंदीर ॥ कां न चाले अति सत्वर ॥ याची माती जउ फार ॥ म्हणोनी पामर न चाले ॥२०॥
आणिक देव समस्त ॥ वहनें पिटीत असंख्यात ॥ ताडण करिती क्रोधभरित ॥ वहनालागीं आपुलिया ॥२१॥
सर्व ऋषी धांव घेती ॥ राजे आपुले रथ लोटिती ॥ अश्वास एक ताडिती ॥ क्रोध करिती सारथीयावरी ॥२२॥
ऐसें इकडे वर्तत ॥ तों तिकडे काय झाली मात ॥ गौतमऋषी येता झाला निश्चित ॥ ब्रह्मदेवें बोलाविलें ॥२३॥
तंव मार्गी एक गाय जाण ॥ प्रसूत होतां ऋषी पाहे आपण ॥ वत्स किंचित बाहेर निघोन ॥
राहिले ऐसें पाहे मुनी ॥२४॥
ऋषीनें तात्काळ स्नान करुनी ॥ प्रदक्षिणा तीन केल्या तिजलागुनी ॥ नमस्कार साष्टांग घालुनी ॥
येता झाला ब्रह्मलोकी ॥२५॥
ब्रह्मयानें ऋषी देखोन सत्वर ॥ करिता झाला बहुत आदर ॥ पूजा करुनी षोडशोपचारें ॥ ऋषीलागीं बोलत ॥२६॥
अगा गौतमऋषी तुम्हीं जावें पृथ्वी प्रदिक्षणासी ॥ अहिल्या रत्न तेजोरासी ॥ देऊं तुम्हां कारणें ॥२७॥
देव ऋषी राजे समस्त ॥ गेले पृथ्वी प्रदक्षिणा निमित्त ॥ तुम्हीही जावें त्वरित ॥ प्रदक्षणा करावया ॥२८॥
ऋषी म्हणे विरंची ऐक वचन ॥ तीन पृथ्वी प्रदक्षणा करुन ॥ आतांच येथें आलों जाण ॥ अहिल्या देईं मजप्रती ॥२९॥
ब्रह्मा म्हणे सत्वर तुम्ही ॥ प्रदक्षणा कैशा स्वामी ॥ प्रसूत होती गौतमी ॥ प्रदक्षणा म्यां तीन केल्या ॥३०॥
विरंची म्हणे यथार्थ ॥ प्रदक्षणा तुम्ही केल्या सत्य ॥ मग अहिल्या ऋषीलागीं देत ॥ लग्न लाविलें तेसमयीं ॥३१॥
तों देव प्रद्क्षणा करुन ॥ आले येथें धांवोन ॥ तो इकडे झालें लग्न ॥ गौतमास अहिल्या दिधली ॥३२॥
ऐसें देखोन सुरवर ॥ मनीं क्षोमते झाले फार ॥ म्हणती रत्न घेऊन जातो चोर ॥ आम्ही श्रम फार केले ॥३३॥
यथार्थ गोष्ट सांगोन ॥ उगेच राहिले अवघेजन ॥ परि इंद्र क्षोमला दारूण ॥ म्हणे एकदां भोगीन अहिल्येसी ॥३४॥
सोहळा लग्नाचा जाहलीयावरी ॥ अवघे गेले घरोघरीं ॥ ब्रह्मा ऋषीची विनंती करी ॥ इस सहसा विसंबू नको ॥३५॥
ऋषी रात्रंदिवस करी रक्षण ॥ रत्न अमोलिक म्हणून ॥ कोणे एके दिवशीं जाण ॥ इंद्र आला भोगावया ॥३६॥
इकडे स्नान संधेलागुन ॥ ऋषी संधेस तेक्षणी गेला ॥ अहिल्या एकली सदनी ॥ होती तेव्हां आश्रमीच ॥३७॥
इंद्र आला ऋषीवेश धरुन ॥ अहिल्येसी बोले तेव्हा वचन ॥ मजला देई भोगदान ॥ कामें मज व्यापिलें ॥३८॥
येरी म्हणे स्वामीरा या ॥ भोगाचा हा नव्हे समया ॥ येरू म्हणे तूं जाया ॥ आज्ञा प्रमाण माझी तुज ॥३९॥
ते परिव्रता निश्चितीं ॥ आज्ञा स्वामीची झाली वंदिती ॥ भोगा सरत झाली निश्चिती ॥ स्वामी आज्ञेकरोनी ॥४०॥
तो ऋषी स्नान संध्या करुन ॥ आला तेव्हां आश्रमालागोन । तो कपाटें लाऊन दोघे जण ॥ सुरतयुध्द करिताती ॥४१॥
ऋषी बोले क्रोधें करुन ॥ घरांत दुसरा आहे कोण ॥ येरी दचकली ऐकोन ॥ अनर्थ झाला कीं आतां ॥४२॥
तों अहिल्यापाहे विलोकून ॥ तों पाहिला इंद्र स्वत:  आपण ॥ काय चांडाळा कर्म दारुण ॥ श्रापितील महाराजमुनी ॥४३॥
आतां तरी तात्काळ पळ ॥ मग मांजर झाला तात्काळ ॥ पळूं पाहे तों ऋषीजवळ ॥ उदक मंत्रोनियां शिंपिलें ॥४४॥
तों पाहिला ऋषीनें इंद्र ॥ क्रोधें श्राप देता झाला थोर ॥ म्हणे तुझ्या शरीरीं भगें सहस्त्र ॥ होतीलरे चांडाळा ॥४५॥
त्या भागामाजी कीटक पडती ॥ दुर्गंधी शरिरीं निश्चितीं ॥ ऐसें ऐकू न इंद्र निश्चित ॥ भय अपार पावला ॥४६॥
इंद्रें सेविलें घोर अरण्य ॥ शरिरीं भदे पडिले दारुण ॥ त्यांत कीटक पडिले तेणें ॥ दुर्गंधी बहुत चालत ॥४७॥
मग ऋषी अहिल्येलागून ॥ श्राप देता जाहला दारूण ॥ म्हणे तूं वनीं शिळा गहन ॥ होऊनियां पडेकां ॥४८॥
ते म्हणे महाराजया ॥ माझा अन्याय पाहुनियां ॥ मग मज श्रापावे प्राणप्रिया ॥ अन्या य माझा किंचत नसे ॥४९॥
तुमचें स्वरुप आला घेऊन ॥ म्हणोन वश्य झालें त्यालागुन ॥ न कळतां दोष घडला जाण ॥ विचारुन उश्राप देईजें ॥५०॥
ऋषी बोले तेव्हां गौतम ॥ सूर्यवंशीं अवतरेल राम ॥ त्याचा चरण लागतां उत्तम ॥ उध्दार तुझा होईल ॥५१॥
मग ऋषी गेला अनुष्ठानाप्रती ॥ अहिल्या शिळा झाली निश्चिती ॥ तो श्रीराम दाशरथी ॥ अवतार घेतला तेणें ॥५२॥
तों विश्वामित्राचे आश्रमीं ॥ रम येत यज्ञ रक्षावया लागुनी ॥ तेणीं अहिल्या वन पाहुनी ॥ परम चित्तीं आनंदला ॥५३॥
विश्वामित्र म्हणे रामचंद्रासी ॥ पैल शिळा चरणेंकरुन तिसीं । तो राम म्हणे किं निमित्य तिसी ॥ सांगावें मज
स्वामिया ॥५४॥
मग विश्वामित्र बोलत ॥ हे गौतमाची ललना निश्चित ॥ ईस श्राप देऊनी सत्य ॥ शिळा होती जाहली ॥५५॥
त्या श्रापाचे कारण ॥ तेंही सांगे रामालागुन ॥ राम म्हणे हे सती जाण ॥ ईस मी चरण कैसा लावूं ॥५६॥
विश्वामित्र म्हणी न करावा अनुमान ॥ ईस उश्राप येणेंच करुन ॥ मग राम तेथें जाऊन ॥ चरण स्पर्श करुं म्हणे ॥५७॥
तों उडाली चरणाची धुळी ॥ लागतां उध्दरली ते वेल्हाळी ॥ उभी राहिली दिन बध्दांजुळी ॥ पाहोनी राम विस्मित ॥५८॥
रामचरणीं नमस्कार ॥ करुं पाहे ते सुंद्दर ॥ राम म्हणे हें अनुचित थोर ॥ नमस्कार म्यां तुज करावा ॥५९॥
राम म्हणे विश्वामित्राप्रती ॥ इच्या स्वामीची भेट निश्चितीं ॥ मग विश्वामित्रें तिजहातीं ॥ कोकिळाव्रत करविलें ॥६०॥
तेणें गौतम तो अनुष्ठान सांडून ॥ आला तो अहिल्येपासीं बळें ॥ तेणें राम तेथें पाहिला ॥६१॥
रामाचें करुन दर्शन ॥ देत गौतम अलिंगन ॥ मग अहिल्येसीं हातीं धरुन ॥ बहुत आनंदे तयेकाळी ॥६२॥
इति शीकोकिळामहात्म्ये षोडशदशोऽध्याय: ॥१६॥ ओंवी ॥६२॥
 
॥ अध्याय १६ वा समाप्त